Dashami : भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि महिलांवरील लैंगिक अत्याचार यांसारख्या अस्वस्थ करणाऱ्या वास्तवावर भाष्य करणारा ‘दशमी’ व्यवस्थेतील अपयशाचा आणि न्यायासाठीच्या संघर्षाचा गंभीर प्रश्न उपस्थित करतो. अन्यायाविरोधात उभे राहण्याची जिद्द, व्यवस्थेच्या निष्क्रियतेतून निर्माण होणारा संताप आणि सत्याचा शोध घेताना समोर येणारे धक्कादायक वास्तव, अशा अनेक पैलूंची गुंफण या चित्रपटात पाहायला मिळते.
न्याय नाकारला जातो, तेव्हा संघर्ष पेटतो…
एका तरुणीवर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर तिच्या आयुष्यात आणि कुटुंबात मोठे वादळ निर्माण होते. न्याय मिळवण्यासाठी कायद्याचा दरवाजा ठोठावला जातो; मात्र राजकीय दबाव, पोलिसांमधील भ्रष्टाचार आणि व्यवस्थेतील हितसंबंध यांमुळे न्यायाची प्रक्रिया अडखळते. अखेर या अन्यायाविरोधात पीडित तरुणी आणि तिचे कुटुंब स्वतःच संघर्षाचा मार्ग स्वीकारतात. दरम्यान, तपास यंत्रणांच्या हाती एका अज्ञात कबरीशी संबंधित खुनाचा धागा लागतो आणि कथानकाला अनपेक्षित वळण मिळते. या घटनेमागील सत्य शोधण्याचा प्रयत्न सुरू होताच संशय, सत्तेचा गैरवापर आणि गुन्हेगारीचे धागेदोरे उलगडू लागतात. पुढे सत्याचा शोध आणि न्यायासाठीची लढाई यांच्यातून निर्माण होणारा थरार हा चित्रपटाचा महत्त्वाचा भाग ठरतो.
गौरी इंगवलेचा भावनिक संघर्ष; रवी प्रकाश आणि मकरंद अनासपुरे
गौरी इंगवले पीडित तरुणीच्या भूमिकेतून वेदना, असहायता आणि अन्यायाविरोधात उभे राहण्याची जिद्द व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. कथानकातील भावनिक तीव्रता ती देखील अधिक सघनता प्राप्त करून देते. मकरंद अनासपुरे यांची भूमिका विशेष लक्ष वेधून घेते. विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांच्या परिचयाचे असलेले मकरंद अनासपुरे या चित्रपटात गंभीर आणि वास्तववादी छटा असलेली भूमिका साकारताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या अभिनयातील वेगळेपण अनुभवायला मिळते. राज कुंदन आणि दक्षिणेतील अभिनेते रवी प्रकाश यांच्या भूमिकाही कथानकाच्या संघर्षाला आकार देणाऱ्या ठरतात. भाषेच्या सीमेपलीकडे रवी प्रकाश आपली छाप निश्चितच उमटवतात. मुजावर म्हणून त्यांनी साकारलेली तपास अधिकाऱ्याची भूमिका खून सत्रामागील रहस्य उलगडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. योगेश भोसले यांनी नकारात्मक भूमिकेतही आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला आहे. विजय निकम या सिनेमामधील सरप्राईज पॅकेज आहे. आतापर्यंत रंगभूमी आणि सिनेमांमध्ये जाणवलेल्या विजय निकमंपेक्षा इथे आकारलेला मल्हार काका निश्चितच लक्षात राहतो.
दिग्दर्शन आणि पटकथा : विषय प्रभावी, पण वेगात चढ-उतार
योगेश भोसले आणि सुरेश पंडित यांनी भ्रष्ट व्यवस्था आणि न्यायासाठीचा संघर्ष यांसारख्या गंभीर विषयांना थेट भिडण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय दबावाखाली झुकणारी यंत्रणा आणि सामान्य माणसाच्या न्याय मिळवण्याच्या लढ्याचे चित्रण हा चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, गंभीर विषयाचे ओझे सांभाळताना काही प्रसंगांमध्ये कथानकाचा वेग मंदावतो. व्यवस्थेविरोधातील संघर्ष, सूड आणि सत्याचा शोध या प्रकारच्या चित्रपटांमध्ये यापूर्वी पाहिलेल्या काही परिचित मांडणींचा आधार पटकथेत जाणवतो. त्यामुळे काही वळणे अपेक्षित वाटू शकतात. अधिक नेमकी पटकथा आणि प्रसंगांची घट्ट बांधणी असती, तर चित्रपटाचा परिणाम आणखी प्रभावी झाला असता…
तांत्रिक बाजू : थराराला पूरक वातावरण
चित्रपटाची छायाचित्रणशैली कथानकातील तणावपूर्ण वातावरण अधोरेखित करते. पीडित कुटुंबाची असुरक्षितता आणि सत्तेचा प्रभाव असलेल्या व्यक्तींचे वर्चस्व यांमधील विरोधाभास दृश्यांमधून उभा करण्याचा प्रयत्न दिसतो. पार्श्वसंगीत थरारक प्रसंगांची तीव्रता वाढवण्यास मदत करते. लैंगिक हिंसा, अन्याय आणि गुन्हेगारीशी संबंधित विषयांमुळे त्यातील आशय भावनिकदृष्ट्या अस्वस्थ करणारा ठरू शकतो…. पण या अन्यायविरुद्ध न्यायाची असणारी ही लढाई केवळ संघर्ष पुरती न राहता… वर उत्तर शोधण्याचा केलेला प्रयत्न हा यामधलं वेगळेपण अधोरेखित करतो.
वास्तवाचा आरसा की सूडाची परिचित कहाणी…
‘दशमी’ हा केवळ गुन्हेगारी आणि सूडाच्या संघर्षाची कथा सांगण्यापुरता मर्यादित राहत नाही; तर व्यवस्था जेव्हा न्याय देण्यात अपयशी ठरते, तेव्हा निर्माण होणाऱ्या संतापाकडेही लक्ष वेधतो. कलाकारांचा गंभीर अभिनय, विषयाची सामाजिक प्रासंगिकता आणि थरारक वातावरण ही चित्रपटाची बलस्थाने आहेत. दुसरीकडे, पटकथेतील काही अपेक्षित वळणे आणि कथानकाच्या वेगातील चढ-उतार यांमुळे त्याचा प्रभाव काही ठिकाणी कमी होतो. एकंदरीत, गंभीर सामाजिक विषयांवर आधारित क्राइम थ्रिलर पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘दशमी’ हा विचार करायला लावणारा पर्याय ठरू शकतो.
⭐⭐⭐✨ (3.5/5)
अमित भंडारी, चित्रपट समीक्षक
दशमी
का पाहावा ?
सस्पेन्स क्राइम थ्रिलर आवडत असेल तर
भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि न्यायासाठीचा संघर्ष या विषयांमध्ये रस असेल.
गौरी इंगवले, रवी प्रकाश आणि मकरंद अनासपुरे यांचा वेगळ्या धाटणीतील अभिनय पाहायचा असेल.
का टाळावा ?
पटकथेतील अपेक्षित वळणे
थोडक्यात काय?
क्राईम थ्रिलर, गंभीर विषय, कलाकारांचा दंमदार अभिनय, व्यवस्थेविरोधातील संघर्ष
केएनके बॉक्स प्रस्तुत
निर्मिती -दिग्दर्शन- योगेश पांडुरंग भोसले
कथा, पटकथा, संगीत – सुरेश पंडित
संवादलेखन- ऋषिकेश गुप्ते आणि अमित बेंद्रे, सुरेश पंडित
गीतलेखन- वैभव देशमुख आणि सुरेश पंडित
छायांकन- विकास सिंग,
कला दिग्दर्शन- आनंद साठे,
संकलन- विनय शिंदे,
पार्श्वसंगीत- अवि लोहार,
ध्वनी संकल्पना / ध्वनी आरेखन – निखिल लांजेकर
नृत्यदिग्दर्शन- सुजित कुमार आणि फुलवा खामकर,
साहस दृश्य दिग्दर्शन- अजय आणि कार्तिक डांगरी,
वेशभूषा – स्नेहल नार्वेकर,
मेकअप- डिझाईन सुजित सुरवसे,
डीआय व कलर ग्रेडिंग- किरण कुमार कोठा,
व्हीएफएक्स- प्रवीण अनारसे
कार्यकारी निर्माती – राणी विश्वकर्मा
लाईन प्रोड्यूसर्स – राजाराम गोरे, सचिन दुबळे पाटील आणि आकाश सोनकांबळे
निर्मिती व्यवस्थापक- विष्णू घोरपडे
आणि ए. के. प्रोडक्शन कास्टिंग, निर्मिती
कलाकार
महेश मांजरेकर -आमदार म्हात्रे
मकरंद अनासपुरे – प्रभाकर देसाई
अभिनेत्री गौरी इंगवले -लक्ष्मी
रवि प्रकाश -‘एसीपी आसिफ मुजावर’
विजय निकम – मल्हार शिंदे
प्रसन्न केतकर- सुधेंदु रॉय
देवेंद्र गायकवाड – इन्स्पेक्टर जवळकर
शाम माशाळकर – दिनेश मेहता
राज कुंदन – वासू कलशेट्टी
योगेश भोसले – बंटी म्हात्रे
