निवडणुकीपुरते हिंदुत्व वापरण्याऐवजी खऱ्या राष्ट्रीयत्वावर भर देण्याची गरज असल्याचं राज ठाकरेंकडून स्पष्ट
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी विविध संवेदनशील प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडत केंद्र आणि राज्य सरकारवर केली जोरदार टीका.
Thackeray brothers’ joint interview creates a stir in Maharashtra politics : ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली असून, आगामी काळात राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध संवेदनशील प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मुंबई, महाराष्ट्राची अस्मिता, विकासाची दिशा, हिंदुत्व, मराठी माणसाचे भवितव्य आणि महापालिका निवडणुका या मुद्द्यांवर ठाकरे बंधू एकाच सूरात बोलताना दिसले.
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे कारस्थान दिल्लीत सुरू असल्याचा गंभीर आरोप ठाकरे बंधूंनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यांवर फारसा विश्वास ठेवता येणार नाही, कारण निर्णायक सत्ताकेंद्र दिल्लीमध्ये असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. “मुख्यमंत्र्यांच्या हातात फारसे काही नाही. दिल्लीहून जे सांगितले जाईल तेच त्यांना करावे लागते,” असे म्हणत त्यांनी केंद्रातील नेतृत्वावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले.
उद्धव ठाकरे यांनी मुंबईची भौगोलिक फाळणी शक्य नसली तरी सांस्कृतिक आणि भाषिक अस्मिता संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चिंता व्यक्त केली. “मुंबईत हिंदीची सक्ती, मराठी भाषेला दुय्यम वागणूक आणि गुजराती भाषा या भागाची भाषा असल्याचे दावे हे मराठी संस्कृतीवर आघात आहेत,” असे ते म्हणाले. केवळ नावालाच मुंबई महाराष्ट्रात ठेवून तिचा आत्मा हिरावून घेतला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुंबईतील मोठ्या विकास प्रकल्पांवर बोलताना ठाकरे बंधूंनी उद्योगपतींच्या वाढत्या प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विमानतळ, बंदरे, एमएमआर क्षेत्रातील प्रकल्प आणि झोपडपट्टी पुनर्विकास योजनांच्या माध्यमातून मुंबईची जमीन आणि संपत्ती विशिष्ट उद्योगसमूहांच्या घशात घातली जात असल्याचा आरोप करण्यात आला. “झोपडपट्टीमुक्तीच्या नावाखाली मुंबई अदानीयुक्त केली जात आहे,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. धारावी पुनर्विकास, मिठागरे, मदर डेअरीसारख्या मोक्याच्या जागांवर होत असलेल्या निर्णयांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
राज ठाकरे यांनी एमएमआर परिसरात सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांकडे लक्ष वेधत, मुंबईला हळूहळू महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा ‘स्ट्रॅटेजिक प्लॅन’ राबवला जात असल्याचा आरोप केला. बुलेट ट्रेन, वाढवण बंदर, नवी मुंबई विमानतळ आणि त्यासोबतची नियोजन प्रक्रिया संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. “हा धोका याआधी कधीच इतका मोठा नव्हता,” असा इशाराही त्यांनी दिला.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना ठाकरे बंधूंनी भाजपवर सोयीस्कर हिंदुत्वाचा आरोप केला. “मराठी म्हणजे हिंदूच आहे. भाजप मराठी आणि हिंदू यांची कृत्रिम फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा संदर्भ देत मराठी माणसाने दिलेल्या बलिदानाची आठवण करून दिली. राज ठाकरे यांनीही निवडणुकीपुरते हिंदुत्व वापरण्याऐवजी खऱ्या राष्ट्रीयत्वावर भर देण्याची गरज असल्याचे सांगितले.
हिंदुत्वावरून टीका करणाऱ्या भाजपवर उद्धव ठाकरेंचा पलटवार; ‘सामना’तून जोरदार फटकेबाजी
विकासाच्या मुद्द्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळातील कामगिरी अधोरेखित केली. कोस्टल रोड, आरोग्य सुविधा, शाळा, बेस्ट सेवा आणि कोरोनाच्या काळातील ‘मुंबई मॉडेल’चा त्यांनी उल्लेख केला. “मुंबई मॉडेलवर निवडणूक आयोगाने बंदी घातली असली तरी आम्ही केलेल्या कामांची सत्यता बदलत नाही,” असे ते म्हणाले.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी मराठी माणसाने एकत्र येण्याचे आवाहन केले. “आता ठाकरे विरुद्ध ठाकरे नाही, तर महाराष्ट्रासाठी ठाकरे आणि ठाकरे,” असा स्पष्ट संदेश देत त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवण्याची गरज अधोरेखित केली. मराठी अस्मिता जपण्यासाठी आणि मुंबई-महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वधर्मीय, सर्व समाजघटकांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या संयुक्त मुलाखतीमुळे ठाकरे बंधूंच्या राजकीय जवळकीवर शिक्कामोर्तब झाले असून, आगामी महापालिका निवडणुका आणि राज्याच्या राजकारणात याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
