Dhananjay Savalkar : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी डॉ. धनंजय सावळकर यांची सरकारकडून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतंच त्यांनी पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी ते महानिर्मिती कंपनीच्या कार्यकारी संचालक ( मानव संसाधन ) या पदावर कार्यरत होते.
प्रशासनाचा गाढा अनुभव असणारे डॉ. सावळकर हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात अतिरिक्त जिल्हाधिकारी या मूळ पदाचे अधिकारी आहेत. 1998 साली विक्रीकर निरीक्षक म्हणून त्यांनी शासकीय सेवेत प्रवेश केला. त्यानंतर 2001 साली त्यांची उप जिल्हाधिकारी म्हणून निवड झाली. सुरुवातीला रायगड येथे परीविक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्यानंतर 2003 ते 2005 या कालावधीत उप जिल्हाधिकारी ( अतिक्रमण ) भांडूप, 2005 ते 2007 उप विभागीय अधिकारी अलिबाग, 2007 ते 2009 उप जिल्हाधिकारी ( संजय गांधी योजना व करमणूक कर ) मुंबई उपनगर, 2009 ते 2013 उप जिल्हाधिकारी ( अतिक्रमण ) चेंबूर, 2013 ते 2016 उपविभागीय अधिकारी कल्याण, 2019 ते 2022 सह व्यवस्थापकीय संचालक पर्यटन आदी पदावर त्यांनी सेवा बजावली आहे.
2016 ते 2019 या काळात त्यांनी तत्कालीन सामान्य प्रशासन आणि उर्जा विभागाच्या राज्यमंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणूनही यशस्वीपणे काम पाहिले आहे. साधारण 27 वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळात डॉ. सावळकर यांनी जुलै 2005 मध्ये महापूर परिस्थितीदरम्यान नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कामकाज, केद्रीय लोकसेवा आणि राज्य लोकसेवा, परिक्षांचा समन्वय अधिकारी म्हणून काम, महसूल संबधित न्यायालयीन प्रशासकीय कामकाज, कोठडीतील मृत्यू, अपघात, चकमक ई.न्यायालयीन चौकशीचे कामकाज, संजय गांधी योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना यासारख्या सामाजिक योजनांची अंमलबजावणी कामकाज सेतू सुविधा केंद्र ( नागरी सुविधा केंद्र ) महा-ई सेवाकेंद्र यांच्यावर पर्यवेक्षणाचे काम, विक्रीकर, जमीन महसूल, करमणूक कर बाबत कामकाज, लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक इत्यादी विषयक निवडणूकीचे कामकाज त्यांनी केले आहे.
सलमानसोबत लग्न करायचंय…; फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली
त्यांनी पर्यटन विभागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उप राष्ट्रपती यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले होते. डॉ. सावळकर हे उच्च विद्याविभूषित असून त्यांनी पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशु संगोपन पदव्युत्तर शिक्षणासोबत कायद्याची पदवी संपादित केली आहे. त्याचबरोबर रियल इस्टेट व्यवस्थापन पदविका शिक्षणदेखील पूर्ण केले आहे.