प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर (Manjarekar) यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री मेधा मांजरेकर यांना एका गंभीर आजाराचं निदान झालं आहे. मेधा मांजरेकर यांनी स्वतः सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत त्यांना कॅन्सर झाल्याचं आणि त्यावरील उपचारांचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे.
या कठीण प्रवासात कुटुंब, मित्रपरिवार आणि देवाने दिलेली साथ याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. मेधा मांजरेकर यांच्या या पोस्टनंतर मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांकडून त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली जात आहे. अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी काही गोष्टी मांडल्या आहेत.
आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात, कॅन्सरचे निदान, त्यानंतर झालेली शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशनपेक्षा या अत्यंत कठीण काळात मला लोकांकडून मिळालेले प्रेम, साथ आणि आशीर्वाद याचीच मला जास्त आठवण आहे. मी आता पुढे पाऊल टाकू शकत नाही, असे ज्या ज्या वेळी मला वाटले, त्या त्या वेळी कुणीतरी माझ्या मदतीला धावून आलं. देवानेच माझा हात धरून मला मोठा आधार दिला आहे असं त्या म्हणाल्या आहेत.
राम मंदिरातील चोरीवर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या वक्तव्याने नवा वाद, ट्रोलरला दिलं हे उत्तर
त्यांनी पुढं लिहिलं की, या कठीण काळात आपण कधीच एकटे नव्हतो, देवाने विविध व्यक्तींच्या रूपाने मला साथ दिली. मी हा प्रवास कधीच एकटीने केला नाही. तर माझे गुरू, डॉक्टर्स, परिचारिका, कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी आणि माझे पती महेश मांजरेकर यांच्या भक्कम पाठिंब्यामुळं मला हा कठीण प्रवास पार करता आला. या शब्दांत त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.
आपल्या भावना मांडताना मेधा मांजरेकर यांनी सांगितलं की, माझ्याच बाबतीत असं का घडलं? असा नकारात्मक प्रश्न विचारण्याऐवजी देवावर पूर्ण विश्वास ठेवत प्रत्येक संकटामागं काहीतरी चांगला उद्देश असतो, हे आपण या प्रवासात शिकलो आहोत. या आजारपणाच्या काळात मुलींनी आईचा हात धरून दिलेली सोबत हा आपल्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि ताकद देणारा अनुभव होता, असंही त्यांनी नमूद केलं.
उपचारादरम्यान मित्रपरिवाराने घेतलेली छोटी-छोटी काळजी, आवडीचे पदार्थ आणून देणे, सतत आनंदी ठेवणं आणि खचू न देता मानसिक आधार देणं यामुळं हा वेदनादायी प्रवास खूप सोपा झाला. शेवटी, केवळ निस्सीम प्रेम, विश्वास आणि माणसांची खंबीर साथ यांच्यामुळंच आपल्याला या गंभीर आजाराशी लढण्याची ताकद मिळाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
