Gulkand Movie : एव्हरेस्ट एंटरटेनमेंट (Everest Entertainment) प्रस्तुत आणि वेटक्लाऊड प्रोडक्शन निर्मित ‘गुलकंद’ (Gulkand) हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या 1 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच रसिकांचे लक्ष वेधले आहे. ‘चल जाऊ डेटवर’ आणि ‘चंचल’ यांसारख्या गाण्यांनी आणि दमदार ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये एक विशेष उत्सुकता निर्माण केली असतानाच आता या चित्रपटातील ‘प्रेमाचा गुलकंद’ हे बहारदार शीर्षकगीत संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. खरंतर या चित्रपटातील प्रत्येक गाणे वेगळ्या धाटणीचे असून यात भावना, उत्साह आहे. आता या यादीत प्रेमाच्या गुलकंदाची चव चाखवणाऱ्या ‘प्रेमाचा गुलकंद’ने अधिकच भर टाकली आहे.
‘प्रेमाचा गुलकंद’ हे रंगतदार आणि बहारदार गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून रोहित राऊत, सावनी रवींद्र आणि आशिष कुलकर्णी यांच्या सुमधुर आवाजाने यात अधिकच रंगत आणली आहे. अमीर हडकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे सचिन मोटे गीतकार आहेत. तर राजेश बिडवे यांचे नृत्यदिग्दर्शन या गाण्याला लाभले आहे.
‘प्रेमाचा गुलकंद’मध्ये सर्व कलाकारांचे एनर्जीने भरलेले धमाल नृत्य पाहायला मिळतेय. या सगळ्या कलाकारांमुळे गाण्यात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली असून कलरफुल सादरीकरणामुळे आणि गुलकंदाचा गोडवा चाखवणाऱ्या गोड शब्दांमुळे हे गाणे रसिकांच्या मनात एक खास स्थान मिळवणार हे, नक्की.
दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी म्हणतात, “आजच्या काळात प्रेक्षक फक्त कन्टेन्ट नाही तर एक नवा अनुभव शोधत असतात. आम्ही ‘गुलकंद’मधून त्यांच्या रोजच्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि हलकीफुलकी मजा घेऊन येण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट आमच्यासाठी फक्त एक प्रोजेक्ट नसून एक भावनिक प्रवास आहे. ‘मुरलेल्या प्रेमाचा गुलकंद’ या गाण्यात कलाकारांचा धमाल डान्स, आनंददायी वातावरण आणि अर्थपूर्ण शब्द यामुळे हे गाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”
निर्माते, गीतकार सचिन मोटे म्हणतात, ‘’ ‘गुलकंद’ हा मधुर असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात मधुरता आणणारे शब्द गाण्यात पेरण्याचा मी प्रयत्न केला आहे. नाते जेवढे मुरते तेवढे ते अधिक बहरत जाते आणि त्यात गोडवा आपसुकच येतो, हेच या गाण्यातून दाखवण्यात आले आहे.’’
निर्माते संजय चाब्रिया म्हणतात, “आम्ही नेहमीच मनोरंजनात्मक चित्रपट रसिकांसाठी घेऊन येत असतो. ‘गुलकंद’हा देखील त्याच्याच एक गोड भाग आहे. ‘प्रेमाचा गुलकंद’ हे गाणे म्हणजे त्या भावना, आठवणी आणि मजेशीर क्षणांची गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे न कुठे असतेच. आयुष्यात अशा मुरलेल्या नात्यांचा गोडवा अनोखाच असतो. हेच या गाण्यातून दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
फालतू याचिका दाखल करु नका, सर्वोच्च न्यायालयाने वकिलाला ठोठावला तब्बल 5 लाखांचा दंड, कारण काय?
सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांच्या प्रमुख भूमिका असून सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.