Gulkand Movie Review: नात्यांच्या गोडव्याची मुरलेली चव

Gulkand Movie Review: नात्यांच्या गोडव्याची मुरलेली चव

Gulkand Movie Review: नाती उमलतात… नाती फुलतात… अन् बहरतात…पण काही नाती वेळ घेऊन उमजतात… काहींना मुरायला वेळ लागतो… जसं गुलकंद. साखरेत मुरत मुरत तयार होणाऱ्या गुलकंदाची गोडसर चव जशी जिभेवर दीर्घकाळ रेंगाळते, तसंच ‘गुलकंद’ आपल्या मनात घर करतो.. सुरुवातीला खुसखुशीत अन् सावकाशपणे अंतर्मुख करणारा हा सिनेमा म्हणजे प्रेम, नातं आणि भावनांचं तरल मिश्रण आहे. कथानकाची गोडी स्वतःच अधोरेखित करते. प्रेम, मैत्री, समज-गैरसमज, आणि त्यातून उमलणारं खरंखुरं नातं अशा टप्प्यांतून ही कथा फुलत जाते. दोन कुटुंबं, त्यांच्या भिन्न जीवनशैली, मूल्यव्यवस्था आणि या सगळ्यांतून आकाराला येणारी एक जुन्या-नव्या धाटणीची प्रेमकहाणी हा ‘गुलकंद’चा ( Gulkand) गाभा आहे.

हास्यजत्रेच्या ‘सचिन-सचिन’ जोडीचा मोठ्या पडद्यावर प्रवेश

एखाद्या मॅचमध्ये सचिन असेल तर विजय निश्चित असतो, हे समीकरण ठरलेलं आहे इथे तर दोन दोन सचिन बॅटिंग करणार म्हटल्यावर सिनेमावरच्या क्लासचा होऊन जातो. छोट्या पडद्यावर ‘हास्यजत्रे’च्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी जोडी म्हणजे लेखक सचिन मोटे आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी. यांनी यावेळी मोठ्या पडद्यावर कौटुंबिक भावविश्वाला विनोदाची मेजवानी दिली आहे. कथा, पटकथा आणि संवाद यामधील सफाईदारपणा हा या सिनेमाची जमेची बाजू. प्रासंगिक विनोदांमध्ये आवश्यक ती वळणं आणि भावनिक खोली… गहिरेपण यांचा मिलाफ वेगळी रंगत आणते. प्रहसनाच्या… स्किटच्या… चौकटीला लार्जर दान लाइफ 70 mm screen वर सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांनी देखणेपणाने साकारले आहे.


चार पात्रं, दोन प्रवाह-वास्तवाचा मेळ

उत्स्फूर्तता आणि ‘संयमी’ यांची जुगलबंदी रंजकपणे सादर करताना रागिणी माने (ईशा डे) आणि मकरंद ढवळे (समीर चौघुले Samir Choughule) हे धडपडत्या स्वप्नांचं प्रतिनिधित्व करतात. तर नीता ढवळे (सई ताम्हणकर Sai Tamhankar) आणि गिरीश माने (प्रसाद ओक) हे वास्तवाशी समरस होणारी पात्रं. या विविधतेमुळे सिनेमा एका विशिष्ट संतुलनावर उभा राहतो. सई ताम्हणकरची संयमी व्यक्तिरेखा, समीर चौघुलेचं प्रगल्भ विनोदी अभिनय, प्रसाद ओकचा परिपक्व भावविश्वातला वावर आणि ईशा डेची उत्स्फूर्त अभिव्यक्ती ही चौकडी सिनेमाला हृदयस्पर्शी बनवते. विशेषतः समीर आणि सई यांची जोडी पारंपरिक ‘नायक-नायिका’ चौकटीबाहेर जाऊनही मन जिंकते.


गुलकंद : आरसा की कथा?

‘गुलकंद’हा केवळ एक लव्हस्टोरी असलेला कौटुंबिक सिनेमा नाही; तो आजच्या पिढीच्या नात्यांच्या गुंतागुंतीचा आरसा आहे. परंपरेच्या आधारावर उभ्या असलेल्या अपेक्षा, आणि त्यांच्याशी झगडणाऱ्या नव्या विचारधारा. या टोकांत सापडलेल्या माणसांचं सूक्ष्म पण ठसठशीत चित्रण हा सिनेमाचा आत्मा आहे. काही प्रसंग हे इतके आपलेसे वाटतात की, क्षणभर तरी आपण त्या कुटुंबांचा एक भाग बनतो.

गाणी आणि तांत्रिक बाजू

‘चल जाऊ डेटवर’ आणि ‘चंचल’ ही गाणी पूर्वीच लोकप्रिय झाली आहेत. मात्र ‘प्रेमाचा गुलकंद’ हे शीर्षकगीत वेगळेपण अधोरेखित करतात. उदयसिंग मोहिते यांचं छायांकन साधं पण अर्थवाही आहे. रंगसंगती प्रसन्न, संकलन योग्य, आणि कथा प्रवाहाला पूरक आहे. संवाद कुठे कुठे थोडे लांबवले गेले असले, तरी एकूण पटकथेला असलेला भावनिक पोत आणि स्वाभाविक संवादशैली सिनेमाला खऱ्या अर्थाने ‘एंगेजिंग’ बनवते.

‘गुलकंद’ ही फक्त तरुणांच्या प्रेमकथेसंदर्भात नाही; तर आयुष्याच्या मधल्या टप्प्यावर, संयमाने मुरत गेलेल्या प्रेमाबद्दलही आहे. यातील कथा साधी आहे, पण तिच्यातले ट्विस्ट, नात्यांतील अस्पष्ट छटा, आणि प्रेक्षकांच्या मनात उमटणाऱ्या भावना यामुळे तो लक्षात राहतो. जर तुम्ही मुरलेली, गोडसर, आणि वास्तवाशी भिडणारी प्रेमकहाणी अनुभवू इच्छित असाल, तर ‘गुलकंद’ हा अनुभव चुकवू नका.


का पाहावा ? कसदार अभिनय आणि दिग्दर्शनाचा मिलाफ

का टाळावा? हास्यजत्राचे एक्सटेन्शन वाटत असेल तर…

थोडक्यात काय ? मुरलेल्या नात्यांची बहारदार गोष्ट

या सिनेमाला मी देतो चार स्टार्स

अमित भंडारी, चित्रपट समीक्षक

follow us
  • fb
  • instagram
  • youtube