Singer Raju Punjabi Death: ‘देसी देसी ना बोल्या कर छोरी’ या गाण्याचे प्रसिद्ध गायक राजू पंजाबी यांनी आज (२२ ऑगस्ट) अखेरचा श्वास घेतला आहे. (Raju Punjabi) वयाच्या ४०व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून राजू यांना हिस्सार येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजू पंजाबी यांना काळी कावीळ झाल्याची माहिती समोर आली आहे. या आजारामुळे त्यांच्या यकृत आणि फुफ्फुसात संसर्ग झाला होता. त्याची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु उपचाराच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ४ वाजेच्या सुमारास सिंगर राजू पंजाबी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. हरियाणवी गायक राजू पंजाबी 40 वर्षांचे होते. राजूला कावीळ झाली होती आणि यामुळे सुमारे 10 दिवसापासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तसेच रावतशर, जिल्हा हनुमानगढ, राजस्थान येथे मूळ गावी राजू यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते हिस्सारच्या आझादनगरमध्ये राहत होते. सध्या त्यांचे चाहते आणि नातेवाईक मोठ्या संख्येने त्यांच्या घरी जात आहेत.
राजू केवळ हरियाणामध्येच नाही तर पंजाबमध्ये देखील खूप लोकप्रिय होता. त्यांची गाणी तरुणाईला खूप आवडतात आणि सपना चौधरीबरोबर त्यांची जोडी खूप प्रसिद्ध होती. ‘देसी देसी’ व्यतिरिक्त त्यांची ‘सँडल’, ‘सॉलिड बॉडी’, ‘तू चीज लाजवाब’, ‘थडा भरतर’, ‘स्वीटी’ ही गाणी देखील खूप गाजली होती.