Download App

दरवर्षी रंगणार चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सव; सांस्कृतिक कार्यमंत्री शेलारांची घोषणा

जुई बेंडखळे यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यांनतर अभिनेत्री भार्गवी

  • Written By: Last Updated:

Chitrapataka Marathi Film Festival : चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन  २१ एप्रिल १९१३ रोजी गिरगाव येथील ऑलिम्पिया थिएटर येथे झालं होतं. त्या घटनेला काल ११२ वर्ष पूर्ण झाली आहेत. (Film) या दिवसाचे महत्त्व लक्षात घेत दरवर्षी याच काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपताका या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. तसंच, तंत्रज्ञानावरील आव्हानांवर मात करण्यासाठी मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांना राज्य सरकारकडून आर्थिक पाठबळ देण्यात येणार असल्याचंही शेलार यांनी जाहीर केलं आहे.

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन सोमवारी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्या हस्ते मुहूर्ताचा क्लॅप देऊन करण्यात आले. यावेळी चित्रपताका महोत्सवाच्या शीर्षकगीताचे लोकार्पण करण्यात आलं.

सातासमुद्रापार मराठीचा डंका! या चार मराठी चित्रपटांची कान्स महोत्सवाच्या चित्रपट बाजारासाठी निवड

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रवींद्र नाट्य मंदिर सभागृहामध्ये झालेल्या या भव्य दिव्य सोहळ्याला ज्येष्ठ चित्रपट निर्माते किरण शांताराम, ज्येष्ठ चित्रपटकर्मी जब्बार पटेल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर आणि महोत्सवाचे संचालक पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी आपल्याला कलाकार म्हणून मोठे करणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानले. राज्याच्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात सगळ्या मान्यवरांसमोर आपला सत्कार झाल्याबद्दल त्यांनी आभार मानले. प्रेक्षकांना आनंद मिळेपर्यंत काम करत राहणार, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्याच बरोबर सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासारख्या द्रष्ट्या मंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली ज्या योजना सुरू होत आहेत, त्याचा मराठी कलाकारांना भविष्यात निश्चित फायदा होणार आहे, असा विश्वासही सराफ यांनी व्यक्त केला. रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट यावेळी महोत्सवाचा उद्घाटनाचा चित्रपट म्हणून दाखवण्यात आला.

विशेष सांस्कृतिक कार्यक्रम

जुई बेंडखळे यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यांनतर अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गाण्यावर नृत्य सादर केले. प्रसिध्द अभिनेत्री श्रेय बुगडे हिच्या निवेदनात रंगलेल्या या कार्यक्रमात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने विविध गाण्यांवर नृत्य सादर केले. प्रसिध्द संगीतकार अजय अतुल यांच्या गाण्यावर अभिनेत्री मीरा जोशी यांनी नृत्य सादर केले. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया या गाण्यावर अभिनेत्री अनुष्का सरकटे हिने नृत्य सादर केले.

राज्य सरकारची नवोदित कलाकारांसाठी ऑडिशन योजना

राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे महोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे नवोदित कलाकारांसाठी ऑडिशन योजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणाऱ्या अभिनेता सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांनी दिली. पुढचे चार दिवस ही योजना मोफत असून त्यानंतर नाममात्र दरात ही योजना सुरू राहणार आहे. इच्छुक नवोदित कलाकारांनी अकादमी येथे येऊन ऑडिशन द्यायची. या ऑडिशनमधून निर्माते दिग्दर्शक यांना कलाकारांची निवड करता येणार आहे.

चित्रपताका महोत्सवात उद्या काय पाहाल

चित्रपताका महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी २२ एप्रिलला दुपारी १२ वाजता ‘काल आज आणि उद्याचे मराठी चित्रपट – गीत, संगीत, शब्द, सूर आणि तंत्र’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे सूत्रसंचलन संगीतकार कौशल इनामदार करणार आहेत. दुपारी ३ वाजता प्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांची मुलाखत अभिनेते, गीतकार किशोर कदम घेणार आहेत. सायंकाळी ६ वाजता चित्रपटाचे तंत्र आणि त्यातील सध्याच्या संधी या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात उज्ज्वल निरगुडकर, पंकज सोनावणे, सुप्रिया पाटणकर सहभागी होणार असून सूत्रसंचलन सौमित्र पोटे करणार आहेत.

follow us

संबंधित बातम्या