Maharashtra Epstein Files Movie: नाशिक मधील कथित अशोक खरात प्रकरण आणि भोंदूगिरीच्या विषयावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या मराठी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पुण्यातील ‘लेमन ट्री प्रीमियर’ हॉटेलमध्ये या चित्रपटाचा पोस्टर लॉन्च आणि कलाकारांच्या भूमिकांचा उलगडा करणारा सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटातील सर्वात महत्त्वाचं पात्र असलेल्या भोंदू बाबाची भूमिका कोण साकारणार, याचा खुलासा करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी (Manoj Joshi) या भूमिकेत दिसणार आहेत.
लंडनमधून परतली, कुटुंबीयांपासून संपर्क तुटला; पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅटमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह
हा चित्रपट 20 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील कलाकारांची नावं आणि त्यांचे लूक समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्येही उत्सुकता वाढली आहे.
या चित्रपटात मनोज जोशी भोंदू बाबाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर अभिनेत्री दीपाली सय्यद एका राजकीय नेत्याशी साधर्म्य असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. अभिनेता सुबोध भावे यांचाही वेगळा राजकीय लूक पाहायला मिळणार आहे. अक्षय टंकसाळे एका अशा व्यक्तीची भूमिका साकारत आहेत, जी भोंदू बाबाच्या फसवणुकीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करते. याशिवाय उदय टिकेकर यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.
MIM प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी; अहिल्यानगरमधून आले पत्र!
चित्रपटाची कथा भोंदू बाबांचं साम्राज्य, त्यांचे राजकीय संबंध आणि अंधश्रद्धेचा फायदा घेऊन केलं जाणारं शोषण या विषयांभोवती फिरते. कथित अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या विषयाकडे चित्रपटातून पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वरूप बी. सावंत यांनी केलं आहे. आनंदी पिक्चर्स अमरावती आणि सचिन थोडे पाटील यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती मातोश्री एंटरटेनमेंट वर्ल्ड प्रॉडक्शन आणि फ्लॅमिगो क्रिएशन यांनी केली आहे. देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे हे निर्माते आहेत. चित्रपटाची मूळ संकल्पना आणि कथा सागरकुमार एस. जैन यांची असून पटकथा आणि संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. संगीत रोहित नागभिडे यांचं, तर छायाचित्रणाची जबाबदारी आकाश काकडे यांनी सांभाळली आहे.
रामराजे निंबाळकर अन् जयकुमार गोरेंचं जुळलं; जुनं वैर विसरले की नवा राजकीय डाव?
मनोज जोशी यांचा भोंदू बाबाचा लूक आणि सुबोध भावे यांची राजकीय भूमिकेतील झलक यामुळे ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’बाबतची उत्सुकता वाढली आहे. आता 20 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
