गोंधळ, गंमत आणि ‘मांजर’चं गूढ… ट्रेलरने वाढवली उत्सुकता ! 18 सप्टेंबरला होणार उलगडा

Manjar : सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत आणि भाग्यश्री लिमये यांच्या व्यक्तिरेखांमधून या गंमतीजंमतींचा केंद्रबिंदू उलगडतो.

Manjar Marathi Movie

Manjar Marathi Movie

Manjar Marathi Movie : ‘मांजर’च्या पोस्टरपासूनच या चित्रपटाचं नाव प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या टीझरमधूनही ‘मांजर’च्या नावामागचं रहस्य कायम ठेवण्यात आलं. ‘मांजर’चा या चित्रपटाशी नेमका काय संबंध आहे, याचं उत्तर मिळेल अशी अपेक्षा असतानाच आता ‘मांजर’च्या ट्रेलरने हा प्रश्न आणखीनच गुंतागुंतीचा केला आहे.

ट्रेलरमध्ये चार मित्रांच्या आयुष्यात एका मागोमाग एक घडणाऱ्या भन्नाट प्रसंगांमुळे अक्षरशः उलटापालट होताना दिसत आहे. एखादी गोष्ट सुरळीत करण्याचा प्रयत्न केला की ती आणखी बिघडते आणि त्यातून नवा किस्सा तयार होतो. या सगळ्या प्रसंगांमध्ये निर्माण होणारा विनोद, पात्रांची धावपळ आणि एकमेकांना सावरण्याच्या नादात वाढत जाणारा गोंधळ यामुळे हा चित्रपट फॅमिली एंटरटेनर आहे हे नक्की!

सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत आणि भाग्यश्री लिमये यांच्या व्यक्तिरेखांमधून या गंमतीजंमतींचा केंद्रबिंदू उलगडतो. त्यांच्या स्वभावातील फरक आणि एकत्र आल्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे प्रत्येक प्रसंगाला वेगळीच गंमत निर्माण होते. त्यांच्यासोबत सयाजी शिंदे, अंशुमन विचारे, वैष्णवी अंधाडे आणि अश्विनी काळसेकर यांच्याही भूमिका कथेत रंगत आणताना दिसतात. प्रत्येक पात्र या गोष्टीत काही ना काही भर घालत असल्याने पुढच्या क्षणी काय होणार, याचा अंदाज बांधणं कठीण होतं.

मात्र ट्रेलरमध्येही एक प्रश्न कायम अनुत्तरित राहातो, तो म्हणजे ‘मांजर’चा या सगळ्या गोष्टींशी नेमका संबंध काय? ट्रेलरच्या शेवटी ‘पिक्चरचं नाव ‘मांजर’ जरी असलं ना, तरी तिच्याशी माझा काही संबंध…’ हा संवाद ऐकू येतो आणि ट्रेलर संपतो आणि त्यानंतर ऐकू येतो तो मांजराचा आवाज. त्यामुळे ‘मांजर’चा या सगळ्या गोंधळाशी काही संबंध आहे की नाही, की या नावामागे आणखी काही भन्नाट ट्विस्ट दडला आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आता आणखी वाढली आहे.

दिग्दर्शक सुशील महादेव म्हणतात, “‘मांजर’ हा चित्रपट प्रेक्षकांना मनापासून हसवणारा आणि शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारा चित्रपट आहे. पडद्यावर घडणाऱ्या गंमतीजंमतींचा आनंद घेताना प्रेक्षकांनी स्वतःलाही या प्रवासाचा एक भाग समजावं, हीच आमची इच्छा आहे. हा चित्रपट फॅमिली एंटरटेनर असल्याने प्रेक्षकांनी हा चित्रपट आपल्या कुटुंबासोबत पाहावा.”

एचथ्रीओ मोशन पिक्चर्स आणि जस्ट राईट फिल्म्स प्रस्तुत ‘मांजर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सुशील महादेव यांनी केलं आहे. सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत, भाग्यश्री लिमये, सयाजी शिंदे, अंशुमन विचारे, वैष्णवी आंधळे आणि अश्विनी काळसेकर अशी तगडी स्टारकास्ट यात पाहायला मिळणार आहे. हर्ष, अविनाश शर्मा, हरि राजपूत, बंटी नागी आणि जसबीर नागी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. एए फिल्म्सकडून चित्रपटाचं वितरण करण्यात येणार असून, ‘मांजर’ येत्या १८ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version