Kiran Mane Post : अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मिडीयावर (Social media) मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. सोशल मिडीयावरील त्यांच्या पोस्ट चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्यांच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर ‘राष्ट्रपिता’ महात्मा गांधी जयंतीनिमित्त अभिनेते किरण माने यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
मानूस दिसायला हडकुळा होता. किरकोळ शरीरयष्टी. छातीचा पिंजरा दिसत होता, पन माझ्या भावा, त्या छातीत असा दम होता की आजबी अख्खं जग त्याला झुकून सलाम करतं ! ही होती फक्त विचारांची ताकद. अमेरीका-इंग्लंड-जर्मनी-कोरीया… पृथ्वीवरच्या कुटल्याबी देशात जा…कुट्ट्टंबी… आज गांधीबाबाच्या विचारांनी प्रभावित झालेली, त्यांच्या पुतळ्यापुढं नतमस्तक झालेली मानसं भेटतील !
आपन कित्तीबी वरडुन बोललो – घसा फाडूफाडून बोललो, तरी आपल्या बोलन्यात ‘सत्याचा अंश’ नसंल तर जगाच्या बाजारात त्या बोलन्याला घंटा किंमत मिळत नसती… त्या महात्म्याचा आवाज खनखनीत नव्हता का चालन्यात रूबाब न्हवता.. वाकून काठी टेकत-टेकत हज्जारो लोकांसमोर त्यो यायचा.. पालथी मांडी घालून बसायचा आन बसक्या आवाजात बोलत र्हायचा… आवाजात चढउतार नायत का टाळीबाज-चटपटीत वाक्य नायत… पन त्याच्या विचारात ‘निर्मळ’पना व्हता – शब्दाशब्दात भारतमातेवरची माया व्हती – रक्ताच्या थेंबाथेंबात आपल्या मातीतल्या गोरगरीबांसाठीची आस व्हती – मानवतेची कास व्हती – ‘सत्याची’ ताकद व्हती..
Kiran Mane: किरण मानेंची ‘बिग बॉस’च्या आठवणीत भावुक पोस्ट; म्हणाले, अजूनबी विश्वास..
गोळ्या घालुन मारला बाबाला… पन तरीबी जित्ता र्हायला.. शत्रूच्या नाकावर टिच्चून. जगातला एकबी देश असा नाय जिथं त्याचा विचार पोचला नाय. खायचं काम नाय गड्याहो…ह्यांच्या हज्जार पिढ्या खपत्याल त्यो ‘विचार’ संपवायला पन ‘गांधी’ उसळी मारून वर येतच र्हानार. सलाम महात्म्या सलाम… कडकडीत सलाम..
किरण माने यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास, ते कलर्स वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची’ या सिरियलमधून सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. या सीरियलमध्ये ते सिधुंताई सकपाळ यांच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. तसेच किरण माने किंग खानचे मोठे चाहते आहेत. जवान सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून त्यांनी किंग खान आणि सिनेमासंबंधित अनेक पोस्ट सोशल मीडियावर केल्या आहेत.