एखादी व्यक्ती जिद्द, मेहनत आणि प्रेमाच्या जोरावर ध्यानीमनी नसलेलं ध्येय साध्य करते. अशी हटके कहाणी तुम्हाला फुलराणी या चित्रपटात पाहायला मिळते. विश्वास जोशी दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आणि सुबोध भावे मुख्य भूमिका साकारत आहेत. प्रियदर्शनी या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत मुख्य भूमिका साकारत पदार्पण करतेय. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून तिने याआधी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलय.
या चित्रपटाची कथा रंजक आहे.
शेवंता तांडेल जी फुलं विकणारी फुलवाली आहे. आपल्या वडिलांसोबत चाळीत राहणारी शेवंता बिनधास्त आणि मनमौजी आहे. तर दुसरीकडे आहेत विक्रम राज्याध्यक्ष जे मॉडेलिंग क्षेत्रातील मोठं नाव आहे. अनेक ब्युटी क्विन्स आणि मॉडेल्सना घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मात्र विक्रमचा पत्रकार मित्र सौरभ एके दिवशी त्याच्यासोबत पैज लावतो. शेवंतासारख्या फुलवालीला ब्युटी क्विन बनवण्याची ही पैज विक्रम स्विकारतो आणि त्यानंतर चित्रपटाचा रंजक प्रवास सुरु होतो. विक्रम ही पैज जिंकतो का ? शेवंता ब्युटी क्विन स्पर्धा जिंकते का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.
Chitragandha singh : निखळ सौंदर्याचा झरा…
या चित्रपटाची कहाणी लक्ष वेधून घेणारी आहे जी शेवटपर्यंत खिळवून ठेवते. विश्वास जोशी आणि गुरु ठाकूर यांनी याचं लेखन केलय. विश्वास जोशी यांनी प्रत्येक पात्राला ठळकपणे अधोरेखीत करत प्रभावी बनवलय. प्रियदर्शनीला शेवंताच्या भूमिकेत आणताना तिच्यातील अभिनयकौशल्य उत्तम सादर केलय.
शेवंताच्या भूमिकेत प्रियदर्शनी चोख काम करताना दिसते. आगरी भाषेतील संवाद, लकब तिने उत्तम सादर केलीय. फुलवाली शेवंता ते ब्युटी कॉन्टेस्टमधील स्पर्धक असा तिचा प्रवास आणि त्यातील वैविध्य प्रियदर्शनीने सहज सादर केलेत.
शेवंताचा खास डायलॉग प्रियदर्शनी प्रत्येकवेळी जबरदस्त ऊर्जा आणि हटके शैलीने सादर करते. तर विक्रम राज्याध्यक्षच्या भूमिकेत सुबोध भावे भाव खाऊन जातो. ग्लॅमर आणि मॉडेलिंग विश्वात काम करणाऱ्या विक्रमचं पात्र लक्ष वेधून घेतं. सुबोध भावेने पुन्हा एकदा उत्तम अभिनयशैलीने मनं जिंकली आहेत. पत्रकार सैरभच्या भूमिकेत सुशांत शेलारने उत्तम बारकावे सादर केलेत. याशिवाय मिलिंद शिंदे, सायली संजीव, गौरव घाटणेकर, अश्विनी कुलकर्णी, दिपाली जाधव, गौरव मालवणकर, वैष्णवी आंधळे यांचंही छान काम झालय.
प्रियदर्शनी आणि सुबोध भावे यांची केमिस्ट्री कमाल वाटते. दोघांचे एकत्र सीन छान खुलले आहेत. स्वर्गिय विक्रम गोखले यांना या चित्रपटातून ब्रिगेडियरच्या भूमिकेत पाहणं एक ट्रीट ठरतेय. विक्रम गोखले यांनी पडद्यावर ही भूमिका जिवंत केलीय. या भूमिकेतील विविध पैलू सुखद धक्के देतात.
केदार गायकवाड यांचं छायांकन छान झालय. चित्रपटाच्या कलर ग्रेडिंगने एक फ्रेश लूक दिलाय. आदित्य बेडेकरचं पार्श्वसंगीत कथेला न्याय देणारं आहे. बालकवी, गुरु ठाकूर, मंदार चोळकर यांचे गीत आणि निलेश मोहरीर, वरुण लिखाते यांचे संगीतही छान झालय.
या चित्रपटात काही त्रुटी देखील जाणवतात. चित्रपटातील ‘चढवीला पट्टा कमरेवरी’ या गाण्याच्या चित्रीकरणात आणखी वेगळेपण आणण्यासाठी वाव असल्याचं जाणवतं. या गाण्यातून प्रियदर्शनीचा सोलो परफॉर्मन्स पाहणं महत्त्वाचं ठरलं असतं. विक्रमच्या भूमिकेतील सुबोध भावेचा लुक खटकतोय. त्यांच्या भूमिकेतील रंगभूषा आणि वेशभुषेत त्रुटी जाणवतात. चित्रपटाचा क्लायमॅक्सच्या सादरीकरणात प्रभाव जाणवत नाहीत. संकलनात काही ठिकाणी सीनमधील सलगता हरवलेली जाणवते.
हा चित्रपट मात्र कलाकारांचे उत्तम अभिनय, हटके कथा यामुळे शेवटपर्यंत लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतोय. त्यामुळे या चित्रपटाचा प्रवास रंजक ठरतो.
रेटिंग – 3 स्टार्स
प्रेरणा, चित्रपट समीक्षक