‘मृत्यूचक्र’ या मराठी थ्रिलरमध्ये अभिनेते शशांक शेंडे मुख्य भूमिकेत…

Shashank Shende : शशांक शेंडे यांनी या व्यक्तिरेखेला आपल्या अभिनयाची एक वेगळीच धार दिली आहे. विनोद, सहजपणा आणि रहस्य यांचा सुंदर मिलाफ असलेला जना काका प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करतील.

Shanshank Shende

Shanshank Shende

Shashank Shende : प्रत्येक व्यक्तिरेखा कलाकाराला नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची संधी देत असते. अभिनेते शशांक शेंडे (
Shashank Shende) यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारत आपल्या कलागुणांना वाव दिला आहे. आता ते आणखी एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच ‘मृत्यूचक्र’ या (mrutyuchakra) मराठी थ्रिलर चित्रपटातील शशांक शेंडे यांचा लूक रिव्हील करण्यात आला असून हा लूक विशेष लक्ष वेधून घेत आहे.

श्री महादेव फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत आणि अध्यांश मोशन पिक्चर प्रोडक्शन्स निर्मित ‘मृत्यूचक्र’ या चित्रपटाची निर्मिती प्रणाली उन्मेश वाघमोडे यांनी केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडु-गंगावणे यांनी केलं आहे. अभिनेता शशांक शेंडे यांनी ‘मृत्यूचक्र’मध्ये ‘जना काका’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. गावाकडच्या वातावरणाशी घट्ट जोडलेला, मनमोकळा, आपुलकीचा आणि मिश्कील स्वभावाचा जना काका प्रेक्षकांना अगदी ओळखीचा आणि आपलासा वाटणारा असा आहे. पण ‘मृत्यूचक्र’मध्ये प्रत्येक गोष्ट जशी दिसते तशी नसते… आणि जना काका त्याला अपवाद नाहीत. त्यांच्या सहज बोलण्यात, मिश्कील वागण्यात आणि परिस्थितीकडे पाहण्याच्या नजरेत काहीतरी दडलंय. त्यांच्या भोवती घडणाऱ्या घटना जसजशा गूढ होत जातात, तसतसा जना काकांचा खरा चेहरा जाणून घेण्याची उत्सुकता वाढत जाते.

शशांक शेंडे यांनी या व्यक्तिरेखेला आपल्या अभिनयाची एक वेगळीच धार दिली आहे. विनोद, सहजपणा आणि रहस्य यांचा सुंदर मिलाफ असलेला जना काका प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करतील. पण एक प्रश्न मात्र कायम राहतो… जना काका खरंच इतके साधे आहेत का?
की त्यांच्या शांत चेहऱ्यामागे ‘मृत्यूचक्र’ची एखादी महत्त्वाची कडी दडली आहे? याचं उत्तर शोधण्यासाठी प्रेक्षकांना ‘मृत्यूचक्र’ पाहावंच लागेल. ‘मृत्यूचक्र’ — कारण प्रत्येक चेहरा एक कथा सांगतो… पण प्रत्येक कथा सत्य सांगतेच असं नाही! ‘मृत्यूचक्र’ लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version