Download App

सॅनहोजेत जुलैमध्ये दुसरा ‘नाफा’ चित्रपट महोत्सव; अमेरिकेत दिसणार मराठी सिनेमांची जादू

यावर्षी 25, 26 आणि 27 जुलै 2025 ला दुसरा नाफा महोत्सव हॉलिवूडच्या धर्तीवर सॅनहोजे येथे संपन्न होणार आहे.

Mumbai News : ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या चित्रपटांचे निर्माते, सुवर्णकमळ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अभिजीत घोलप यांच्या संकल्पनेतून ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन’ची (नाफा) स्थापना गेल्यावर्षी करण्यात आली होती. मराठी चित्रपट, कला संस्कृतीच्या माध्यमातून दरवर्षी अमेरिकेत मराठी चित्रपटांचा भव्य सोहळा सॅनहोजे येथे आयोजित करण्यात येतो. गेल्यावर्षी प्रथम म्हणजे 2024 च्या 27 आणि 28 जुलै रोजी हा सोहळा कॅलिफोर्नियामध्ये अमेरिका, कॅनडामध्ये स्थायिक असलेल्या भारतीयांच्या उपस्थितीत पहिला भव्यदिव्य महोत्सव संपन्न झाला होता. यावर्षी 25, 26 आणि 27 जुलै 2025 ला दुसरा नाफा महोत्सव हॉलिवूडच्या धर्तीवर सॅनहोजे येथे संपन्न होणार असल्याची घोषणा नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप यांनी नुकतीच प्रसिद्धीपत्रकाद्वारे मुंबईत केली.

उत्तर अमेरिकेत आणि कॅनडामध्ये वास्तव्यास असणाऱ्या जवळपास साडेपाच लाख मराठी, भारतीयांपर्यंत मराठी चित्रपट पोहचविण्याची धडपड अभिजित घोलप ‘नाफा’च्या माध्यमातून करीत आहेत. दर महिन्याला एक मराठी चित्रपट ‘उत्तर अमेरिका – कॅनडा’मध्ये 2024 पासून प्रदर्शित होत आहेत. ‘गुलकंद’, ‘सुजित सुशीला’, ‘संगीत मानापमान’, ‘चिकीचीकी बुबुम्बुम’, ‘पाणी’, ‘गुलाबी’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘अशी ही जमवा जमावी’, ‘स्थळ’, ‘सलतात रेशीम गाठी’ इत्यादी चित्रपट आतापर्यंत अमेरिकेत आणि कॅनडामध्ये नाफाद्वारे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाले. अमेरिकेत या सर्व चित्रपटांना प्रतिसाद मिळत आहे.

मोठी बातमी! आता शेतीत दरवर्षी 5 हजार कोटींची भांडवली गुंतवणूक; कृषिमंत्री कोकाटेंची घोषणा

अमेरिकेत हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून अभिजित घोलप नाफाची कार्यप्रणाली विकसित करत आहेत. ते म्हणाले. “‘देऊळ’ या माझ्या चित्रपटाला राष्ट्रीय सुवर्णकमळ पुरस्कार मिळाल्यानंतर नॉर्थ अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टी स्थापन करावी असा विचार मनात होता. माझ्या या विचाराशी सहमत असलेले पाचशेहून अधिक सदस्य अल्पावधीतच या कामाशी जोडले गेले. वर्षाअखेरीस दोन लघुपटाची निर्मिती करण्याचं ध्येय ठेवून ‘फिल्म क्लब’च्या तयारीला लागलो.

अनेक कलावंत, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक, गायक, कवी, सिनेमॅटोग्राफर्स, संकलक यांनी फिल्म क्लबमध्ये नोंदणी केली. त्यासाठी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची कार्यशाळा आयोजित केली. याशिवाय टॉक शोज, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, डॉ. सलील कुलकर्णी, सचिन खेडेकर, समीर चौघुले, अभिजीत देशपांडे यांच्या कार्यशाळा, चर्चासत्रांच्या माध्यमातून कार्यविस्तार होत आहे. विविध क्षेत्रात आघाडी घेतल्यानंतर अमेरिकेतल्या भारतीयांना मनोरंजन क्षेत्रात आपली कला दाखवण्याची संधी मिळणार आहे. गेल्यावर्षीच नाफाने या दिशेने पहिले पाऊल टाकले. अमेरिकेत सातासमुद्रापार मराठी चित्रपटसृष्टी उभारणीचं स्वप्न सत्यात उतरण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या सर्व कलावंत आणि तंत्रज्ञाच्या साथीने लवकरच ते पूर्णत्वास जाईल.”

‘नाफा 2024’ महोत्सवामध्ये जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, महेश मांजरेकर, सुबोध भावे, दिग्दर्शक जब्बार पटेल, उमेश कुलकर्णी, डॉ. सलील कुलकर्णी, प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी, मेधा मांजरेकर इत्यादी उपस्थित होते.

मुंबईला हायअलर्ट! अतिमुसळधार पावसाचा इशारा, मान्सून लवकरच महाराष्ट्रात धडकणार…

यावर्षी NAFA फिल्म फेस्टिव्हल 25, 26, 27 जुलै 2025 रोजी, कॅलिफोर्नियातील सॅनहोजे येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवात डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, महेश कोठारे, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी (ज्येष्ठ), अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर या प्रमुख सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. नाफा महोत्सवासाठी अमेरिकेतील ‘बीएमएम’च्या 57 महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य लाभले आहे.

follow us