Anurag Kashyap On Phule Film: राज्यात औरंगजेब, वाघ्या कुत्र्यानंतर आता फुले चित्रपटावरुन राजकारण चांगलेचं तापले आहे. या चित्रपटावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. तर आता या चित्रपटावरुन निर्माते अनुराग कश्यप यांनी ब्राह्मण संघटनांवर टीका केली आहे. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.
समाजसुधारक ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ हा चित्रपट 11 एप्रिलला प्रदर्शित होणार होता मात्र या चित्रपटावरुन सुरु असणाऱ्या वादामुळे हा चित्रपट 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनात येणाऱ्या अडथळ्यांवर अनुराग कश्यप यांनी टीका करत केली आहे. तसेच त्यांनी सेन्सॉरशिप प्रक्रियेला “कुजलेली व्यवस्था” म्हटले आहे.
या चित्रपटामध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने अनेक बदल करण्याची मागणी केली आहे. राज्यातील काही ब्राम्हण संघटनांनी या चित्रपटातील भागावर आक्षेप घेतल्याने राज्यात नवीन वादाला तोंड फुटले आहे.
अनुराग कश्यप यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की, “माझ्या आयुष्यातील पहिले नाटक ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर होते. जर या देशात जातीयवाद नसता तर त्यांना लढण्याची काय गरज होती?” सेन्सॉरशिप सिस्टीमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले, “जेव्हा एखादा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे जातो तेव्हा तिथे फक्त चार लोक असतात. मग या संघटना आणि ग्रुप चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो कसा पाहतात? ही संपूर्ण व्यवस्थाच कुजलेली आहे.”
चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनीही या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, ट्रेलरनंतर काही गैरसमज निर्माण झाले होते, जे दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी असेही सांगितले की, चित्रपटात ब्राह्मण समाजातील लोक देखील दाखवले आहेत ज्यांनी ज्योतिबा फुले यांच्या शाळा आणि सत्यशोधक समाज यासारख्या कामांमध्ये त्यांना पाठिंबा दिला होता. अनुराग कश्यप यांची पोस्ट सध्या व्हायरल झाली असून काही लोक त्यांच्या समर्थन करत आहे तर काही लोक त्यांच्या विरोध करताना दिसत आहे.