Omkar Bhojane Defamation Notice : अभिनेता ओंकार भोजने आणि ‘आफराताफरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद झुंबर कवडे यांच्यातील वाद आता कायदेशीर पातळीवर पोहोचला आहे. कवडे यांनी एका मुलाखतीत केलेल्या विधानांमुळे आपली बदनामी झाल्याचा आरोप करत ओंकार भोजने यांनी त्यांना 50 लाख रुपयांची मानहानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांच्यामार्फत ही नोटीस पाठवण्यात आली असून, संबंधित विधानांबद्दल जाहीर माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे.
एका डिजिटल माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत मिलिंद कवडे यांनी ओंकार भोजने यांच्यावर चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सहकार्य न केल्याचा आरोप केला होता. यावेळी त्यांनी भोजने यांची तुलना ‘सराईत पाकीटमार’ आणि ‘सराईत खोटारडा’ अशा शब्दांत केली होती. मुलाखतीतील ही विधाने आणि त्यांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने भोजने यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती असीम सरोदे यांनी दिली.
दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखांमध्ये निर्मात्यांकडून वारंवार बदल करण्यात आल्याने प्रसिद्धीच्या नियोजनावर परिणाम झाल्याचे ओंकार भोजने यांच्या बाजूने सांगण्यात आले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण झाले होते. त्यानंतर प्रदर्शनाची तारीख आधी 3 सप्टेंबर आणि नंतर 9 ऑक्टोबर 2026 अशी बदलण्यात आली. भोजने यांचे आधीपासून ठरलेले व्यावसायिक कार्यक्रम असल्याने अचानक बदललेल्या काही प्रसिद्धी कार्यक्रमांना उपस्थित राहणे शक्य झाले नाही. मात्र, त्यांनी दोन माध्यमांना मुलाखती देऊन चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सहकार्य केले होते. स्वतःचे वैयक्तिक सोशल मीडिया खाते नसतानाही सुमारे 130 संपर्कांना टीझर, ट्रेलर आणि गाणी पाठवून चित्रपटाचा प्रचार केल्याचेही नोटिशीत म्हटले आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनावर परिणाम होऊ नये, यासाठी ओंकार भोजने यांनी चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत कायदेशीर नोटीस पाठवणे टाळले होते. आता भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 356 अंतर्गत मानहानीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मिलिंद कवडे यांनी मुलाखतीतील विधाने मागे घ्यावीत, जाहीर बिनशर्त माफी मागावी, भविष्यात अशी विधाने करू नयेत आणि 50 लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशा मागण्या नोटिशीत करण्यात आल्या आहेत. दिवाळीनंतर दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात दाद मागितली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दुसरीकडे, मिलिंद कवडे यांनीही आपल्या वकील ॲड. दीपाली आर. बोहरा यांच्यामार्फत 30 पानांचे कायदेशीर प्रत्युत्तर पाठवून मानहानीचे आरोप फेटाळले आहेत. आपण कोणतीही द्वेषभावनेतून किंवा बदनामी करण्याच्या उद्देशाने विधाने केली नसून, चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या उपलब्धतेमुळे निर्माते आणि दिग्दर्शकांना येणाऱ्या अडचणींबाबत व्यावसायिक अनुभवातून बोललो होतो, असा दावा त्यांनी केला आहे. मुलाखतीतील ‘सराईत पाकीटमार’ हा शब्द ओंकार भोजने यांना उद्देशून वापरला नव्हता, तर सर्वसामान्य संदर्भात त्याचा उल्लेख केला होता, असा खुलासाही कवडे यांनी केला आहे.
याशिवाय चित्रीकरण आणि डबिंगदरम्यान ओंकार भोजने यांनी वारंवार विलंब केल्याने चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे वेळापत्रक बिघडल्याचा आरोप कवडे यांनी प्रत्युत्तरात केला आहे. पोस्टर शूटसाठी भोजने उपलब्ध न झाल्याने अखेर एआयच्या मदतीने पोस्टर तयार करावे लागले, तसेच प्रसिद्धीसाठी मागितलेला 30 सेकंदांचा सेल्फी व्हिडिओही त्यांनी पाठवला नसल्याचे कवडे यांनी म्हटले आहे. 28 सप्टेंबर रोजी पुण्यात आयोजित प्रसिद्धी दौऱ्यासाठी ऐनवेळी केवळ चार तास उपलब्ध असल्याचे सांगितल्याने तो दौरा रद्द करावा लागल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे ओंकार भोजने यांनी केलेली मानहानीची मागणी आणि मिलिंद कवडे यांनी दिलेले प्रत्युत्तर यामुळे ‘आफराताफरी’ चित्रपटाभोवतीचा वाद आता अधिक चर्चेत आला आहे.
