Priya Bapat : मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी, अभिनयाच्या विविध छटांमध्ये रसिकांची मनं जिंकणारी प्रिया बापट (Priya Bapat) आता एका नव्या आणि थरारक अविष्कारात दिसणार आहे. अमेझॉन प्राईमवर (Amazon Prime) लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘अंधेरा’ या हॉरर सिरीजमध्ये ती एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.
नुकताच या सिरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला असून, त्याने प्रेक्षकांमध्ये एकाच वेळी भीती आणि उत्सुकता निर्माण केली आहे. या सिरीजमधून प्रियाने हॉरर जॉनरमध्ये पदार्पण केले असून यात ती पहिल्यांदाच पोलिसाची भूमिका साकारत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बाब आहे.
या अनुभवाबद्दल प्रिया बापट म्हणते, ”मी पहिल्यांदाच हॉरर जॉनरमध्ये काम करतेय आणि हा अनुभव खरोखरच वेगळा ठरला. खूप नाईट शिफ्ट्समध्ये शूटिंग केलं, परंतु स्क्रिप्ट इतकी इंटरेस्टिंग होती की, काम करताना काहीच जाणवले नाही. जेव्हा हे स्क्रिप्ट मला मिळालं, तेव्हा वाचून एकच विचार मनात आला, तो म्हणजे सध्या वाचलेल्या स्क्रिप्ट्सपैकी हे सर्वात उत्तम होतं. ही कथा फार वेगवेगळ्या पद्धतीने उलगडते आणि म्हणूनच ती अभिनयाच्या दृष्टीने खूपच आव्हानात्मक ठरली. यात अॅक्शन सिक्वेन्सेस आहेत, भीतीदायक हॉरर सीन आहेत. त्यामुळे कलाकार म्हणून ही भूमिका करताना एक वेगळीच मजा आली. आतापर्यंत मी राजकारणी, वकील यांसारख्या विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र, या सिरीजमध्ये मी एका पूर्णतः वेगळ्या प्रोफेशनमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिले तर अजितदादांचा पक्ष संपेल; जरांगे पाटांलाचा इशारा
मराठीत मला जसं प्रेम मिळालं, तसंच प्रेम मला हिंदी प्रोजेक्ट्ससाठीही मिळालं, याचा खूप आनंद आहे. आता हॉरर जॉनरमधून मी प्रेक्षकांचं मन कसं जिंकू शकेन, याचीच उत्सुकता लागली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा प्रतिसाद बघायला मी प्रचंड उत्सुक आहे. आशा आहे, प्रेक्षक या भूमिकेलाही तितकंच प्रेम देतील.” ‘अंधेरा’चं ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कथानक काय आहे? हे रहस्य नेमकं कुठं घेऊन जाणार आहे? मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत, परंतु तोपर्यंत ‘अंधेरा’ची ही थरारक झलक आणि प्रिया बापटचं हॉरर शैलीतील पदार्पण यामुळे ही सिरीज चर्चेचा विषय ठरली आहे.