PIFF Updates : पुणे फिल्म फाउंडेशन (Pune Film Foundation), सांस्कृतिक कार्य विभाग (महाराष्ट्र शासन) आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (Pune International Film Festival) नुकतीच घोषणा करण्यात आली. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५ यंदा १३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत पीव्हीआर, पॅव्हिलियन मॉल, आयनॉक्स – बंडगार्डन आणि सिनेपोलीस-औंध येथे ११ स्क्रीनस मध्ये आयोजित करण्यात आला आहे.
नगरकर हुशार…काम करणाऱ्यालाच पुन्हा संधी; आमदार जगतापांची विरोधकांवर टोलेबाजी
या चित्रपट महोत्सवात जागतिक व मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग आणि अन्य विभाग यांमध्ये सुमारे १५० हून अधिक देशी विदेशी चित्रपट रसिक प्रेक्षकांना बघता येतील. शोमैन राज कपूर यांची १००वी जयंती ही या वर्षीची थीम असणार आहे. सर्वांसाठी कॅटलॉग फी ८००/- असून याची नाव नोंदणी www.piffindia.com यावर दि. १५ जानेवारी पासून सुरु होत आहे, अशी माहिती ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि पुणे फिल्म फाउंडेशनचे चेअरमन डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषेदत दिली. याप्रसंगी ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आणि चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, विश्वस्त डॉ. मोहन आगाशे, विश्वस्त डॉ. सतीश आळेकर, चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजीत रणदिवे, उपसंचालक विशाल शिंदे (प्रोग्रॅम व फिल्म), उपसंचालक अदिती अक्कलकोटकर (आंतरराष्ट्रीय संपर्क व समन्वय) उपस्थित होते.
जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागात यंदा १०७ देशांमधील १०५० हून अधिक चित्रपटांनी सहभाग नोंदवला होता. परीक्षक मंडळाने हे सर्व चित्रपट बघून त्यातील १४ चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड केली आहे. अंतरराष्ट्रीय ज्युरींमार्फत अंतिम फेरीतील हे १४ चित्रपट बघून सर्वोत्कृष्ट आंतराष्ट्रीय चित्रपट निवडला जाईल. त्यास ‘महाराष्ट्र शासन संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ – १० लाख रुपये देऊन समारोप कार्यक्रमात गौरवले जाईल.
यंदा जागतिक चित्रपट स्पर्धा विभागात निवडण्यात आलेल्या चित्रपटांची यादी-
१. डार्केस्ट मीरियम, दिग्दर्शक – नाओमी जये, कॅनडा
२. ऑन द इन्वेंशन ऑफ स्पीशीज़, दिग्दर्शक – तानिया हरमीड, इक्वाडोर, क्यूबा
३. टू अ लँड अननोन, दिग्दर्शक – मह्दी फ्लेफेल, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ग्रीस, कतार, सौदी अरेबिया, पॅलेस्टाईन
४. ग्रैंड टूर, दिग्दर्शक – मिगुएल गोम्स, पोर्तुगाल, इटली, फ्रान्स
५. अरमंड, दिग्दर्शक – हलफदान उल्लमांन तोंडेल, नॉर्वे, नेदरलँड, जर्मनी, स्वीडन
६. सेक्स, दिग्दर्शक – डॅग जोहान हाउगेरूड, नॉर्वे
७. इलेक्ट्रिक फील्ड्स, दिग्दर्शक – लिसा गेर्ट्सच, स्वित्झर्लंड
८. अंडर द वोल्केनो, दिग्दर्शक – डेमियन कोकूर, पोलंड
९. ए ट्रॉवेलर्स नीड्स, दिग्दर्शक – हाँग सांगसू , दक्षिण कोरिया
१०. ब्लैक टी, दिग्दर्शक – अब्दर्रहमान सिसाको, फ्रान्स, मॉरिटानिया, लक्झेंबर्ग, तैवान, आयव्हरी कोस्ट
११. सम रेन मस्ट फॉल, दिग्दर्शक – यांग क्यू, चीन, अमेरिका, फ्रान्स, सिंगापूर
१२. एप्रिल, दिग्दर्शक – डी कुलुंबेगश्वील, फ्रान्स, इटली, जॉर्जिया
१३. थ्री किलोमीटर्स टू द एंड ऑफ द वर्ल्ड्स, दिग्दर्शक – एमानुअल पर्वू , रोमानिया
१४. इन रिट्रीट, दिग्दर्शक – मैसम अली, इंडिया