Raigad’s Shama Shah to create history : 50 लाखांचा प्रश्न आणि एक कोटीच्या स्वप्नाकडे आणखी एक पाऊल! सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’च्या आगामी भागात खेळाची उत्कंठा शिगेला पोहोचणार आहे. या पर्वात पहिल्यांदाच माधुरी दीक्षित रायगडची स्पर्धक शमा शहाला पन्नास लाख रुपयांचा प्रश्न विचारणार असून, आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर इथवर पोहोचलेली शमा आता हा महत्त्वाचा टप्पा पार करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या पर्वाला तिच्या रूपानं पहिली करोडपती मिळणार का? याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
अवघड प्रश्नांचा विचारपूर्वक सामना करत शमानं आपल्या खेळाची छाप पाडली आहे. तिचा आत्मविश्वास, प्रसंगावधान आणि प्रश्न सोडवण्याची हातोटी याच कौतुक होत आहे. आता तिच्यासमोर असणार आहे तब्बल 50 लाखांचा प्रश्न! या प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन ती एक कोटीच्या दिशेनं आगेकूच करणार की याच टप्प्यावर खेळाला वेगळं वळण मिळणार, याची उत्सुकता आगामी भागात रंगणार आहे.
या भागात, शमानं केवळ आपल्या ज्ञानानंच नव्हे, तर मनमोकळ्या अंदाजानं ही माधुरीचं मन जिंकलं आहे. माधुरीसाठी खास शायरी सादर करत तिनं या भेटीला आणखी खास बनवलं. तिची मिमिक्री पाहून तर माधुरीही हसू आवरू शकली नाही. शमाच्या वडिलांकडे पाहत माधुरीने हसत म्हटले, “फुल एंटरटेनमेंट है आपके घर में!”
अजितदादांच्या त्या एका निर्णयाने अमित शहांनाही बसला होता धक्का; नेमकं काय घडलं होतं?, शहांनी सांगितला किस्सा
या हसऱ्या गप्पांमध्ये वडिलांनी सांगितलेली एक आठवण मनाला स्पर्शून जाणारी ठरली. शमाचा जन्म झाला तेव्हा त्यांनी आनंदाने पाच किलो लाडू वाटले होते. त्यावर मित्रांनी त्यांना चिडवत, अब्जाधीश झालात का, अशी विचारणा केली होती. मुलगी झाल्यामुळे आपण अब्जाधीशापेक्षाही श्रीमंत झाल्याची भावना त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. लेकीबद्दलचा त्यांचा अभिमान ऐकून माधुरीच्याही तोंडून “अरे वाह!” अशी उत्स्फूर्त दाद आली.
याच गप्पांच्या ओघात माधुरीनंही आपल्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा दिला. मातृत्व आणि करिअर यांचा समतोल साधताना कुटुंबानं दिलेली साथ याविषयी बोलताना, माधुरीनं आपल्या पहिल्या कमाईबद्दलही एक खास आठवण उलगडली. गप्पा, हशा आणि भावनिक क्षणांनी रंगलेल्या या भागात आता खरी कसोटी असेल ती शमाच्या ज्ञानाची. 50 लाखांच्या प्रश्नाचं उत्तर देत रायगडची ही लेक करोडपती होण्याच्या स्वप्नाजवळ पोहोचणार का?
पहात रहा, ‘कोण होणार करोडपती’, मंगळवारचा भाग रात्री 9 वाजता, सोनी मराठी आणि सोनी लिव वर.
