लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या प्रीमियरनंतर ‘रामायण: राइज ऑफ अ लेजेंड’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून शानदार प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांनी सोशल मीडियावर चित्रपटाची भव्यता, कलाकारांचे अभिनय आणि अप्रतिम व्हिज्युअल्सचे भरभरून कौतुक केले आहे. चित्रपटातील उत्कृष्ट व्हीएफएक्स, प्रभावी पार्श्वसंगीत आणि पवित्र महाकाव्याला आदरपूर्वक मोठ्या पडद्यावर सादर करण्याच्या पद्धतीने प्रेक्षक विशेष प्रभावित झाले आहेत. साई पल्लवीचे सौंदर्य, तिच्या चेहऱ्यावरील भाव आणि पडद्यावरील तिची प्रभावी उपस्थिती यांचेही विशेष कौतुक होत आहे. त्याचबरोबर रणबीर कपूर आणि यश यांच्या अभिनयालाही प्रेक्षकांकडून दाद मिळत आहे.
प्रेक्षक या चित्रपटाला ‘एक भव्य सिनेमॅटिक अनुभव’ असे संबोधत आहेत. त्यांच्या मते, हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वात अप्रतिम सिनेमॅटिक अनुभवांपैकी एक ठरणार असून, जागतिक स्तरावर भारतीय सिनेमाला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्याची क्षमता त्याच्यात आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित महाकाव्यांपैकी एक असलेल्या रामायणाची भव्य कथा मोठ्या पडद्यावर साकारण्यात आली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम, साई पल्लवी माता सीता, रॉकिंग स्टार यश रावण, सनी देओल हनुमान आणि रवी दुबे लक्ष्मण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
‘वंदे मातरम्’च्या अवमानाचा आरोप, भालचंद्र मुणगेकरांना एशियाटिक सोसायटीची कारणे दाखवा नोटीस
नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओजने आठ वेळा ऑस्कर पुरस्कार जिंकलेल्या डीएनईजी (DNEG) आणि यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या सहकार्याने केली आहे. ‘रामायण’ दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग 5 नोव्हेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल, तर दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. हा चित्रपट भारतात हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
हा चित्रपट आयमॅक्स (IMAX) फॉरमॅटमध्येही प्रदर्शित होणार आहे. भारत वगळता जगभरातील चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सोनी पिक्चर्स सांभाळणार आहे, तर हिंदी भाषिक बाजारपेठेत धर्मा प्रॉडक्शन्स या चित्रपटाचे वितरण करणार आहे.
