‘रामायणम्’च्या ‘मंगल रंग’ गाण्यातून श्रीराम आणि माता सीतेच्या दिव्य प्रेमाची झलक, मनाला स्पर्श करणारे गाणे प्रदर्शित

हिंदी गीताचे शब्द डॉ. कुमार विश्वास यांचे नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायणम्’मधील सुंदर गाणे ‘मंगल रंग’ प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 26T121247.032

A song that touches the heart has been released : हिंदीमध्ये अरिजित सिंह आणि श्रेया घोषाल, तमिळमध्ये अभय जोधपूरकर आणि सैंधवी, तेलुगूमध्ये राघव कौशिक आणि वैशाली सामंत, कन्नडमध्ये अरमान मलिक आणि बेला शेंडे, तर मल्याळममध्ये नरेश अय्यर आणि अमृता राजन यांनी दिला आवाज; ए. आर. रहमान यांचे संगीत, तर हिंदी गीताचे शब्द डॉ. कुमार विश्वास यांचे नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायणम्’मधील आणखी एक सुंदर गाणे ‘मंगल रंग’ निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. या संगीतमय सादरीकरणातून प्रेक्षकांना केवळ चित्रपटाच्या भव्य विश्वाची झलक पाहायला मिळत नाही, तर भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या सुंदर क्षणांचे दर्शनही घडते. या महाकाव्यावर आधारित चित्रपटातील या दुसऱ्या गाण्यात निसर्गरम्य दृश्ये, भव्य राजवाडे आणि या सुंदर जोडीच्या विवाहाची झलक पाहायला मिळते. या दृश्यांमधून त्यांच्या नात्यातील भावनिक खोली आणि प्रेमाची अनुभूती येते.

या गाण्यात रणबीर कपूर भगवान श्रीराम, तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसत आहेत. हे गाणे टी-सीरिजच्या अधिकृत यूट्यूब चॅनल ‘वर्ल्ड ऑफ रामायणम्’वर उपलब्ध आहे. ‘मंगल रंग’ हे गाणे हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामुळे विविध भाषांतील प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत या गाण्याचा आनंद घेता येणार आहे.

राम आणि सीता यांच्या प्रवासातील विविध भावस्पर्शी क्षण या गाण्यातून उलगडतात. राजवाड्याची भव्यता, विवाहसोहळ्याचे पावित्र्य आणि अयोध्येपासून दूर वनवासात घालवलेले क्षण यांचा यात समावेश आहे. भगवान श्रीराम यांच्या दृश्यांमध्ये त्यांच्या हातात धनुष्यबाण आणि तलवार दिसते. भव्य दृश्यांनी सजलेल्या या विश्वातून महाकाव्यातील कथा एका सुंदर पद्धतीने साकारण्यात आली आहे.

राहुल गांधींना मोठा दिलासा; 2018 च्या मानहानीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता

भव्य दृश्यरचनेसोबतच ‘मंगल रंग’ या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे श्रीराम आणि माता सीता यांच्यातील अतूट नात्याचे भावपूर्ण चित्रण. विवाहाच्या दृश्यांमधून त्यांच्या नात्यातील पावित्र्य आणि आनंदाची अनुभूती मिळते, तर वनवासातील प्रसंग त्यांच्या नात्याचा आणखी एक भावनिक पैलू उलगडतात. राजवाड्यातील सुखसोयींपासून दूर असतानाही श्रीराम आणि माता सीता एकमेकांच्या किती जवळ आहेत, हे या दृश्यांतून दिसून येते. आपले कर्तव्य पार पाडताना त्यांनी केवळ एकमेकांना साथ दिली नाही, तर एकत्रितपणे नव्या जीवनप्रवासालाही सुरुवात केली.

‘रामायणम्’मधील या सुंदर गाण्याला अनेक प्रतिभावान कलाकारांनी एकत्र येऊन आकार दिला आहे. ए. आर. रहमान यांनी या गाण्याला संगीत दिले असून, हिंदी गीताचे शब्द डॉ. कुमार विश्वास यांनी लिहिले आहेत. हिंदी आवृत्तीला अरिजित सिंह आणि श्रेया घोषाल यांच्या सुरेल आवाजाची साथ लाभली आहे. इतर भाषांमधील आवृत्त्यांनाही विविध प्रतिभावान गायक आणि गीतकारांनी सजवले आहे. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून गाण्यातील भावनिक गाभा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.

तमिळ आवृत्तीला अभय जोधपूरकर आणि सैंधवी यांनी आवाज दिला असून, या गीताचे शब्द कार्तिक नेथा यांनी लिहिले आहेत. तेलुगू आवृत्ती राघव कौशिक आणि वैशाली सामंत यांनी गायली असून, तिचे शब्द राकेंदु मौली यांनी लिहिले आहेत. कन्नड आवृत्तीत अरमान मलिक आणि बेला शेंडे यांचे स्वर आहेत, तर गीताचे शब्द कार्तिक सरागुर यांनी लिहिले आहेत. मल्याळम आवृत्ती नरेश अय्यर आणि अमृता राजन यांनी गायली असून, तिचे शब्द विनायक शशी कुमार यांनी लिहिले आहेत.

शिवसेना कोणाची? ठाकरे की शिंदे? धनुष्यबाणाचा फैसला कधी होणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी तारीख

नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायणम्’मधील ‘मंगल रंग’ या गाण्याबद्दल बोलताना संगीतकार ए. आर. रहमान म्हणतात

“रामायण ही अशी कथा आहे, जी अनेक पिढ्यांपासून लोकांच्या मनात घर करून आहे. संगीताच्या माध्यमातून या कथेला स्पर्श करण्याचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत खास होता. श्रीराम आणि सीता यांच्या नात्यात एक विलक्षण पावित्र्य आणि सौम्यता आहे, जी मला संगीतामध्ये जपायची होती. ‘मंगल रंग’च्या माध्यमातून श्रोत्यांना प्रेमाची ऊब आणि भक्तीभाव अनुभवता येईल, अशी मला आशा आहे. या सुरावटीत त्यांना आपलेपणाची भावना जाणवेल. कारण काही कथा शब्दांतून समजावून सांगण्याची गरज नसते; त्या केवळ मनापासून अनुभवायच्या असतात.”

नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायणम्’चा भाग होण्यापासून ते ‘मंगल रंग’ला आपला आवाज देण्यापर्यंतच्या अनुभवाबद्दल बोलताना अरिजित सिंह म्हणतात

“रामायण ही केवळ एक कथा किंवा महाकाव्य नाही, तर ती आपल्या जीवनाशी, अंतर्मनाशी आणि आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीशी असलेले आपले नाते अधोरेखित करते. ए. आर. रहमान सरांनी संगीतबद्ध केलेल्या ‘मंगल रंग’च्या सुरावटीने मला शब्दांच्या पलीकडच्या एका अशा विश्वात नेले, जिथे प्रेम आपल्या सर्वांत सुंदर रूपात फुलते. भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या अतूट नात्यातील प्रामाणिकपणा आणि कोमलता मला वारंवार त्या प्रेमाची आठवण करून देत राहिली, जे आपल्याला एकमेकांशी जोडते आणि आपल्यातील भेदांच्या पलीकडे घेऊन जाते. या सुरावटीचा भाग होणे हा माझ्यासाठी आयुष्य बदलून टाकणारा अनुभव होता. नमित सर आणि त्यांची टीम साकारत असलेल्या या स्वप्नाचा भाग होण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. हे गाणे ऐकणाऱ्या प्रत्येकापर्यंत प्रेम, कृतज्ञता आणि भक्तीभावाची तीच अनुभूती पोहोचेल, अशी मला आशा आहे, जी हे गाणे गाताना मला जाणवली.”

‘मंगल रंग’च्या माध्यमातून श्रीराम आणि माता सीता यांच्या पवित्र प्रेमकथेशी जोडले जाण्याबद्दल श्रेया घोषाल म्हणतात

“राम आणि सीता यांच्या प्रेमाला इतके सुंदर बनवणारी गोष्ट म्हणजे त्यांचे नाते केवळ एकत्र असण्याच्या आनंदापुरते मर्यादित नाही. त्यांच्या नात्यात श्रद्धा, परस्परांची समजूत आणि एक शांत, पण विलक्षण सामर्थ्य आहे, जे मनाला खोलवर स्पर्श करते. ‘मंगल रंग’ हे गाणे गाताना मला या कोमल भावनांशी जोडले जाण्याची संधी मिळाली आणि मी ते मनात भरपूर प्रेम ठेवून गायले. इतक्या लोकांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या कथेशी जोडले जाणे, ही माझ्यासाठी खरोखरच कृतज्ञतेची भावना आहे. हे गाणे ऐकणाऱ्यांना प्रेमाची ऊब आणि मनःशांती देईल, तसेच प्रत्येकाला आपल्या पद्धतीने राम आणि सीता यांच्या नात्याचे सौंदर्य अनुभवता येईल, अशी मला आशा आहे.”

5 वर्षे व्हेगन डाएट केल्यानंतर बेअर ग्रिल्स यांनी बदलला आहार, मांसाहार सुरू करण्यामागे नेमकं काय घडलं?

‘मंगल रंग’च्या माध्यमातून ‘रामायणम्’च्या संगीतमय प्रवासाचा भाग होण्याबद्दल अभय जोधपूरकर म्हणतात

“रामायण ही अशी कथा आहे, जी अनेक पिढ्यांपासून आपल्या जीवनाचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिली आहे. ‘मंगल रंग’ला आवाज देणे हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक अनुभव होता. विशेषतः हे गाणे भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या प्रेमाचे आणि एकमेकांना दिलेल्या सुंदर साथीचे चित्रण करते. त्यांच्या नात्यातील प्रामाणिकपणा त्याला कायमस्वरूपी खास बनवतो. माझ्या गायकीतून हीच भावना व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला आहे. या सुंदर संगीतमय सादरीकरणाचा भाग होऊन ही कथा तमिळ भाषेतूनही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.”

‘मंगल रंग’च्या तेलुगू आवृत्तीच्या माध्यमातून ‘रामायणम्’चा भाग होण्याबद्दल वैशाली सामंत म्हणतात

“‘मंगल रंग’चा भाग होणे हा माझ्यासाठी अत्यंत खास अनुभव होता. श्रीराम आणि माता सीता यांच्या नात्यात प्रेम, विश्वास आणि भक्तीची खोल भावना आहे. या गाण्यात त्यांची कथा ज्या सुंदर आणि हळुवार पद्धतीने उलगडते, ती मनाला स्पर्श करणारी आहे. हे गाणे गाताना त्यातील भावना पूर्णपणे अनुभवण्याचा मी प्रयत्न केला, जेणेकरून त्यामागील भावार्थ योग्य प्रकारे व्यक्त करता येईल. संगीताच्या माध्यमातून ही सुंदर कथा तेलुगू भाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे.”

‘रामायणम्’सोबत काम करण्याच्या आणि ‘मंगल रंग’च्या कन्नड आवृत्तीला आवाज देण्याच्या अनुभवाबद्दल अरमान मलिक म्हणतात

“रामायण ही अशी कथा आहे, जी अनेक पिढ्यांपासून लोकांच्या हृदयाशी जोडलेली आहे. या चित्रपटाच्या संगीतमय प्रवासाचा भाग होणे, ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. ‘मंगल रंग’मध्ये श्रीराम आणि माता सीता यांचे प्रेम अत्यंत सुंदर आणि मनाला स्पर्श करणाऱ्या पद्धतीने साकारले आहे. माझ्या गायकीतून त्या भावना व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला, जेणेकरून सुरावट स्वतःच आपली भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचवेल. कन्नड आवृत्तीही श्रोत्यांच्या मनाला भिडेल आणि त्यांना या चिरंतन नात्याचे सौंदर्य अधिक जवळून अनुभवता येईल, अशी मला आशा आहे.”

महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट, बंगालच्या उपसागरात मोठ्या घडामोडी, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत बरसणार पाऊस

‘मंगल रंग’ची कन्नड आवृत्ती गाताना श्रीराम आणि माता सीता यांच्या नात्यातील भावनिक अनुभूतीबद्दल बेला शेंडे म्हणतात

“श्रीराम आणि माता सीता यांच्यातील प्रेम मनाला स्पर्श करणारे आहे. त्यांचे नाते विश्वास, परस्परांना समजून घेण्याची भावना आणि आयुष्यातील प्रत्येक वळणावर अधिक दृढ होत जाणाऱ्या बंधावर आधारलेले आहे. ‘मंगल रंग’ हे गाणे गाताना मला या भावनांशी जोडले जाण्याची संधी मिळाली आणि मी ते अत्यंत प्रेमाने आणि श्रद्धेने गायले. हे गाणे ऐकणाऱ्यांनाही तेच समाधान आणि आपलेपणाची भावना अनुभवता येईल, जी मला हे गाणे गाताना जाणवली, अशी आशा आहे.”

‘रामायणम्’च्या संगीतमय प्रवासाचा भाग होण्याबद्दल आणि ‘मंगल रंग’च्या मल्याळम आवृत्तीला आवाज देण्याबद्दल नरेश अय्यर म्हणतात

“‘रामायणम्’साठी गाणे ही माझ्यासाठी एक विशेष जबाबदारी आहे, कारण ही कथा अनेक लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ‘मंगल रंग’चे सर्वांत सुंदर वैशिष्ट्य म्हणजे त्याची सुरावट श्रीराम आणि माता सीता यांच्या नात्यातील कोमलता अत्यंत सुंदर आणि कायम स्मरणात राहील अशा पद्धतीने व्यक्त करते. या गाण्यातील भावना नैसर्गिकरीत्या व्यक्त व्हाव्यात, यासाठी मी ते पूर्ण प्रामाणिकपणे गाण्याचा प्रयत्न केला. मल्याळम आवृत्ती लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचेल आणि त्यांना आपलीशी वाटेल, अशी मला आशा आहे.”

‘रामायणम्’मधील ‘मंगल रंग’ या गाण्याचे शब्द लिहिण्याच्या अनुभवाबद्दल डॉ. कुमार विश्वास म्हणतात

“भगवान श्रीराम यांच्या दिव्य विवाहाचा उत्सव साजरा करणारे गाणे लिहिण्यासाठी मी अनेकदा प्रयत्न केले. मात्र, प्रत्येक वेळी काही ओळी लिहून त्या पुन्हा वाचताना मला असे वाटायचे की, परमपित्याच्या विवाहाची भव्यता मी लिहिलेल्या शब्दांपेक्षा हजारो पटींनी अधिक आहे. अखेरीस, जेव्हा मला माझ्या शब्दांबद्दल समाधान वाटेनासे झाले, तेव्हा मी माँ सरस्वतीची प्रार्थना केली. आज ही रचना ज्या स्वरूपात आपल्यासमोर आली आहे, ती त्यांचीच कृपा आहे, असे मला वाटते.

भगवान श्रीराम आणि माता सीता यांचे नाते अनेक जन्मांशी जोडलेले आहे. ते केवळ एका युगापुरते मर्यादित ठेवता येणार नाही. भगवान श्रीराम यांचा जन्म सूर्यवंशात झाला, तर माता सीता भूमातेच्या कुशीतून प्रकट झाल्या. सूर्य हा राजसत्ता आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे, ज्याचा प्रकाश पृथ्वीला उजळवतो. तर पृथ्वी ही शेती आणि पोषणशक्तीचे प्रतीक आहे. ती सूर्यप्रकाश ग्रहण करून त्याचे धान्य, हिरवळ आणि जीवनात रूपांतर करते. त्यामुळे श्रीराम आणि माता सीता यांचे मिलन केवळ नियतीने ठरवलेले नव्हते, तर जीवनाचे चक्र निरंतर सुरू राहण्यासाठीही ते अत्यंत आवश्यक होते.”

या गाण्यासाठी पाच भाषांतील नामवंत कलाकार एकत्र येणे, ही स्वतःमध्येच एक विशेष बाब आहे. या सर्वांच्या योगदानामुळे चित्रपटातील दृश्ये आणि श्रीराम व माता सीता यांच्या प्रेमाने भरलेल्या प्रवासाला अधिक सुंदर रूप मिळाले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, या गाण्यामुळे विविध प्रांतांतील प्रेक्षकांना आपल्या मातृभाषेत या सुंदर संगीतमय अनुभवाचा आनंद घेता येणार आहे. जगातील सर्वाधिक पूजल्या जाणाऱ्या महाकाव्यांपैकी एक असलेल्या ‘रामायणम्’ची भव्य कथा आता मोठ्या पडद्यावर साकारली जात आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम, साई पल्लवी माता सीता, रॉकिंग स्टार यश रावण, सनी देओल हनुमान आणि रवि दुबे लक्ष्मण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘रामायणम्’ची निर्मिती नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओजने आठ ऑस्कर पुरस्कार विजेत्या DNEG आणि यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्ससोबत मिळून केली आहे. हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग 5 नोव्हेंबर 2026 रोजी, तर दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भारताबाहेरील जगभरातील वितरणाची जबाबदारी सोनी पिक्चर्स सांभाळणार असून, हिंदी भाषिक बाजारपेठेत धर्मा प्रॉडक्शन्स वितरक म्हणून काम पाहणार आहे. हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये IMAX स्वरूपातही प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील गाणी टी-सीरिजच्या लेबलअंतर्गत प्रदर्शित केली जाणार आहेत.

follow us