Ramayanas triumphant run worldwide; becomes the seventh highest-grossing Indian film : नमित मल्होत्रा यांचा भव्यदिव्य चित्रपट ‘रामायण: राइज ऑफ अ लिजेंड’ची जगभरातील बॉक्स ऑफिसवरची घोडदौड सुरूच आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या ११ दिवसांत या चित्रपटाने जगभरात तब्बल १४७.५ दशलक्ष डॉलरची कमाई केली आहे. या कमाईसह हा चित्रपट जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत सातव्या स्थानावर पोहोचला आहे.
‘जिजाई’च्या ट्रेलरवर बॉलिवूडकरांची कौतुकाची थाप! रिंकू राजगुरूच्या भूमिकेलने वेधले लक्ष
जागतिक स्तरावर भारतीय सिनेमासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला जगभरात ५५.७ दशलक्ष डॉलरची कमाई केली होती. भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील दिवाळीच्या सुट्टीत मिळालेली ही सर्वात मोठी ओपनिंग ठरली.
सोनिया गांधींच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ पुस्तकाचे प्रकाशन; अनेक आठवणींचा उलगडा!
पहिल्या वीकेंडला मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतरही चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील पकड कायम आहे. दुसऱ्या वीकेंडला या चित्रपटाने जगभरात ३८.१ दशलक्ष डॉलरची कमाई केली. विशेष म्हणजे, पहिल्या वीकेंडच्या तुलनेत ही कमाई केवळ ३४ टक्क्यांनी कमी झाली आहे. आठवड्याच्या मधल्या दिवसांतही चित्रपटाने चांगली कमाई केली. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि समीक्षकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियांमुळे चित्रपटाची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे.
भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न
भारतातील प्रदर्शनाव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सोनी पिक्चर्सकडे आहे. ‘रामायण: राइज ऑफ अ लिजेंड’ जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोनी पिक्चर्सकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात व्यापक आणि महत्त्वाकांक्षी आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांपैकी हे एक मानले जात आहे. जगातील १३० हून अधिक देशांमध्ये आणि १७ वेगवेगळ्या डब भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सुरुवातीला ३७ आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा विस्तार आता ४३ देशांपर्यंत झाला आहे. मागील वीकेंडला आणखी सहा देशांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. इंडोनेशिया, कंबोडिया आणि मेक्सिकोमध्ये या चित्रपटाने भारतीय चित्रपटांसाठी आतापर्यंतचे विक्रमी ओपनिंग कलेक्शन नोंदवले आहे. इंडोनेशियामध्ये ५७३ हजार डॉलर, तर कंबोडियामध्ये २८६ हजार डॉलरची कमाई झाली आहे. यावरून भारतीय चित्रपटांच्या कथानकाबद्दल आणि आशयाबद्दल आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांमध्ये वाढत असलेली उत्सुकता दिसून येते.
जगभरातील प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये २४ दशलक्ष डॉलर, ब्रिटनमध्ये ५.५ दशलक्ष डॉलर, संयुक्त अरब अमिरातीमध्ये ४.७ दशलक्ष डॉलर, ऑस्ट्रेलियामध्ये ४.२ दशलक्ष डॉलर, थायलंडमध्ये १.५ दशलक्ष डॉलर, मलेशियामध्ये १.४ दशलक्ष डॉलर आणि जर्मनीमध्ये १.१ दशलक्ष डॉलरची कमाई या चित्रपटाने केली आहे.
आणखी देशांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार
‘रामायण: राइज ऑफ अ लिजेंड’चा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचा प्रवास अद्याप सुरूच आहे. येत्या १९ नोव्हेंबरला ब्राझील, इटली, युक्रेन आणि हंगेरीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर २० नोव्हेंबरला पोलंडमध्ये, तर २६ नोव्हेंबरला अर्जेंटिना, मध्य अमेरिका, कोलंबिया, इक्वेडोर, पेरू आणि झेकिया या देशांमध्ये चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. याशिवाय चीन, जपान आणि दक्षिण कोरियासारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे चित्रपटाची जागतिक पोहोच आणखी वाढण्याची शक्यता आहे.
विक्रमी ओपनिंग, बॉक्स ऑफिसवरील सातत्यपूर्ण कमाई आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील वाढता विस्तार यामुळे ‘रामायण: राइज ऑफ अ लिजेंड’ भारतीय सिनेमाच्या जागतिक प्रवासात नवा मापदंड निर्माण करत आहे. भारतातील अत्यंत लोकप्रिय आणि श्रद्धेचा विषय असलेले रामायण हे महाकाव्य जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात हा चित्रपट महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ‘रामायण: राइज ऑफ अ लिजेंड’ हा चित्रपट प्राइम फोकस स्टुडिओजने मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स आणि डीएनईजी यांच्या सहकार्याने सादर केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये या चित्रपटाचे वितरण सोनी पिक्चर्स रिलीजिंगकडून करण्यात येत आहे.
