साताऱ्यातील अदानींच्या वीज प्रकल्पाला स्थगिती; राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या मंजुरीशिवाय काम सुरू केल्याने वनविभागाची नोटीस

Adani Tarali Pumped Storage Project: वनविभागाने अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडला कारणे दाखवा नोटीस बजावत प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश दिले.

Adani Tarali Pumped Storage Project

Adani Tarali Pumped Storage Project: सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात उभारण्यात येत असलेल्या अदानी समूहाच्या तारळी पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाचा (Tarali Pumped Storage Project) वाद आता चांगलाच तापला आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची (NBWL) आवश्यक पूर्वपरवानगी न घेताच प्रकल्पाचे काम सुरू केल्याचे वनविभागाच्या तपासणीत समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत पाटण वनविभागाने अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडला कारणे दाखवा नोटीस बजावत प्रकल्पाचे सर्व काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तीन दिवसांच्या आत परवानग्यांची कागदपत्रे आणि काम सुरू करण्यामागील कारणांचा खुलासा करण्यास सांगितले आहे.

‘रोहित पवार म्हणजे डोक्यावर उलटा पडलेला अन् मड्यावरच्या टाळूचं लोणी खाणारा माणूस’, राजेंद्र राऊतांची जहरी टीका

राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी नसल्याचा ठपका

पाटण वनपरिक्षेत्र कार्यालयाने 13 नोव्हेंबर 2026 रोजी अदानी ग्रीन एनर्जीच्या प्रकल्पाच्या अधिकृत स्वाक्षरीदाराला नोटीस पाठवली. तारळी परिसरात प्रकल्पाचे काम सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने केलेल्या तपासणीत राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची अनिवार्य पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आले. ही बाब वन आणि वन्यजीव कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणारी असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे सक्षम प्राधिकरण आणि राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची रीतसर परवानगी मिळेपर्यंत प्रकल्पाच्या ठिकाणी सुरू असलेली सर्व कामे बंद ठेवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. तसेच परवानगी नसताना कोणत्या आधारावर काम सुरू करण्यात आले, याचा सविस्तर लेखी खुलासा नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

वृक्षतोडीच्या परवानग्यांसह कागदपत्रे मागवली

वनविभागाने केवळ काम थांबवण्याचे आदेश दिले नाहीत, तर प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीबाबतही स्पष्टीकरण मागितले आहे. प्रकल्प परिसरातील झाडे तोडण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेतली आहे का, किती झाडे तोडण्यास मंजुरी मिळाली आहे, याची माहिती देण्याचे निर्देश आहेत. यासोबतच वृक्षतोडीची मूळ किंवा साक्षांकित परवानगीपत्रे, इतर वैधानिक मंजुरीची कागदपत्रे आणि संबंधित नकाशे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

राहुल गांधींसह इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगाला घेरण्याचा प्रयत्न; मुख्य निवडणूक आयुक्तांसाठी 48 प्रश्नांची सरबत्ती

दिलेल्या तीन दिवसांच्या मुदतीत समाधानकारक खुलासा आणि आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास किंवा प्रत्यक्षात काम सुरू असल्याचे आढळल्यास वन कायद्यानुसार कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही वनविभागाने दिला आहे.

नेमका काय आहे तारळी पंप्ड स्टोरेज प्रकल्प?

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात तारळी नदीच्या खोऱ्यात अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडकडून हा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता 1500 मेगावाट इतकी प्रस्तावित आहे. हा प्रकल्प पारंपरिक जलविद्युत प्रकल्पापेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करतो.

पंप्ड स्टोरेज तंत्रज्ञानामध्ये विजेची मागणी जास्त असताना उंचावरील जलाशयातील पाणी खालच्या जलाशयात सोडले जाते. या प्रक्रियेत टर्बाइनच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते. तर विजेची मागणी कमी असताना उपलब्ध अतिरिक्त विजेचा वापर करून पाणी पुन्हा खालच्या जलाशयातून वरच्या जलाशयात पंप केले जाते. अशा प्रकारे पाण्याचा पुनर्वापर करून गरजेच्या वेळी वीज उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

पुण्यात AIRHOSTESS, दिवाळीसाठी माहेरी; वर्षाची गोंदियात हत्या! मित्र अन् मेहुण्याची चौकशी, नेमकं काय घडलं?

मात्र, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची पूर्वपरवानगी आणि वृक्षतोडीसह इतर वैधानिक मंजुरींचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. वनविभागाच्या नोटिशीनंतर अदानी ग्रीन एनर्जी प्रशासनाकडून काय खुलासा केला जातो आणि प्रकल्पाच्या कामाबाबत पुढे काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us