Saleel Kulkarni Poem on Social Media Trolling : गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी हे त्यांच्या आशयपुर्ण गाणे आणि कवितांसाठी ओळखले जातात. त्यात आता त्यांनी थेट सोशल मिडीयावर कलाकारांसह इतरांना ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना कवितेच्या माध्यमातून खडेबोल सुनावले आहेत. त्यांनी त्याच्या फेसबुक अकाऊंटवर या कवितेचा व्हिडीओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे.
निळवंडे लाभक्षेत्रातील डाव्या आणि उजव्या कालव्यांना उन्हाळी हंगामातील आवर्तन सुरू
अनेकदा कलाकारांना त्यांच्या भूमिकांवरून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरून प्रचंड ट्रोल केले जाते. मात्र त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. उलट अनेकदा अशा प्रकारच्या ट्रोलिंगमुळे मानसिक खच्चीकरण होते. अनेकदा कमजोर मनाचे लोक तणावाखाली जाण्याची शक्यता असते. त्यावरून सलील कुलकर्णी यांनी परखड टीका केली आहे. त्यांनी या पोस्ट मध्ये लिहिले आहे की, एक निरीक्षण… अशा निनावी , आणि चेहरे नसलेल्या माणसांचं.. कुठून येतात ही माणसं ? कुठून येते ही वृत्ती ? कोणाविषयीच आदर न वाटणारी .. ते एखादंच वाईट वाक्य बोलतात .. पण जो ऐकत असतो ,त्याने ऐकलेलं त्या दिवसातले १०० वे वाईट वाक्य असेल आणि त्याचा तोल ढळला तर ? तो जगण्यावर रुसला तर ? अशी भीती सुद्धा वाटत नाही ह्यांना ? या वृत्तीच्या माणसांच्या मनातल्या अंधारात डोकावून पाहायचा प्रयत्न करतांना ही कविता सुचली.
काय आहे सलील कुलकर्णी यांची कविता?
नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो
रोज वेगळं नाव लावून, लपून लपून भुंकीन म्हणतो …
याच्यासाठी काही म्हणजे काही सुद्धा लागत नाही…
कुणी तुमच्याकडे डीग्री वगैरे मागत नाही
कष्ट नको, ज्ञान नको विषयाचीही जाण नको
आपण नक्की कोण कुठले याचे सुद्धा भान नको
खुप सारी जळजळ हवी विचारांची मळमळ हवी
दिशाहीन त्वेष हवा, विनाकारण द्वेष हवा
चालव बोटे धारदार शब्दांमधून डंख मार
घेरून घेरून एखाद्याला वेडा करून टाकीन म्हणतो
खाटेवरती पडल्या पडल्या जगभर चिखल उडव
ज्याला वाटेलजसे वाटेल धरून धरून खुशाल बडव
आपल्यासारखे आहेत खूप खोटी नावे फसवे रूप
धावून धावून जाऊ सारे चावून चावून खाऊ सारे
जो पर्यंत तुटत नाही, धीर त्याचा सुटत नाही तो पर्यंत टोचत राहू
त्याच्या डोळ्यात बोचत राहू, धाय मोकलून रडेल तो
तेवढ्यात कोणी दुसरे दिसेल, त्याच्या सोबत कोणी नसेल
आता त्याचा ताबा घेऊ त्याच्यावरती राज्य देऊ
मग घेऊन नवीन नाव नवा फोटो नवा डाव
त्याच शिव्या त्याच शाप, त्याच शिड्या तेच साप
वय, मान, आदर, श्रद्धा सगळ गाडीन म्हणतो
जरा कोणी उडले उंच त्याला खाली पाडीन म्हणतो
थोडा डेटा खूप मजा छंद कीती स्वस्त आहे
एका वाक्यात खचते कोणी फिलींग किती मस्त आहे
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी मराठीसह हिंदीतील देखील अनेक कलाकारांना प्रचंड प्रमाणात ट्रोलिंग सामना करावा लागत आहे. त्यात हेमांगी कवी, क्षिती जोग संतोष जुवेकर, चिन्मय मांडलेकर यांना त्यांच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यावरून प्रचंड ट्रोल केले गेले. अनेकदा त्यांचे सहकलाकार त्यांची बाजू घेतात. मात्र लगेचच त्यांना देखील ट्रोलिंगला सामोरे जोवे लागते. त्यावरच भाष्य करणारी ही कविता कुलकर्णी यांनी लिहीली आहे.