Shraddha went beyond mere dance workshops to truly understand Lavani For Eetha : आगामी ‘ईठा’ चित्रपटातील ‘जी जी रे जी’ या गाण्याच्या दिमाखदार लॉन्च सोहळ्यात श्रद्धा कपूरने चित्रपटासाठी लावणी शिकण्याचा तिचा अनुभव मनमोकळेपणाने सांगितला. विशेष म्हणजे, या चित्रपटाशी जोडली गेली तेव्हा पारंपरिक लावणी नृत्यशैलीबद्दल तिला फारशी माहिती नव्हती. मात्र, अनेक वर्कशॉप्सना हजेरी लावण्यापासून ते लावणी आणि तमाशा कलाकारांच्या भेटीगाठी घेण्यापर्यंत, तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज शकुंतला जी यांच्याकडून शिकण्यापर्यंत, श्रद्धाने या कलाप्रकाराचा बारकाईने अभ्यास केला. लावणीमागची संस्कृती, भावना आणि तिचे वेगळेपण समजून घेण्यासाठी तिने स्वतःला पूर्णपणे झोकून दिले.
तिच्या तयारीबद्दल बोलताना श्रद्धाने सांगितले की, शकुंतला जी यांच्यासोबतच्या संवादातून तिला लावणीचा खरा अर्थ उमगला. लावणी म्हणजे केवळ नृत्याचे ठुमके किंवा तालावर थिरकणे नव्हे, तर चेहऱ्यावरच्या हावभावांतून भावना व्यक्त करण्याचीही ती एक प्रभावी कला आहे. तमाशा कलाकारांचे आयुष्य त्यांच्या सादरीकरणातून कसे उमटते, त्यांच्या कलेत सुख-दुःखाचे किती सुंदर मिश्रण असते, हे शकुंतला जी यांनी तिला समजावून सांगितले. त्यांच्यासोबतचा अनुभव आठवताना श्रद्धा म्हणाली, “त्या म्हणाल्या, ‘नाचणं तर होईलच. पायात घुंगरू बांधशील आणि सरावही करशील. पण चेहऱ्यावरून ज्या भावना व्यक्त करायच्या आहेत, त्या आधी तुला समजून घ्याव्या लागतील.’
सातारानंतर सांगलीतही भाजपला धक्का; जिल्हा बँकेवर काँग्रेसचा झेंडा, महेंद्र लाड अध्यक्षपदी
श्रद्धाची मेहनत वर्कशॉप्सपुरतीच मर्यादित नव्हती. प्रत्येक पायात तब्बल ४ किलोचे घुंगरू बांधून तिने कठोर सराव केला. लावणीतील प्रत्येक हालचाल, ठेका आणि बारकावे अचूकपणे आत्मसात करण्यासाठी तिने तासनतास मेहनत घेतली. या संपूर्ण प्रवासात दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्माते दिनेश विजन तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. महत्त्वाच्या गाण्याच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाली, तरीही त्यांनी तिला सातत्याने पाठिंबा दिला.
श्रद्धाच्या या मेहनतीची झलक ‘जी जी रे जी’ या गाण्यात स्पष्टपणे पाहायला मिळतेय. तिचे दमदार एक्स्प्रेशन्स, अस्सल लावणीचा अंदाज आणि नजाकतीने भरलेल्या अदांनी नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. तिच्या खास अदा आणि रंगमंचावरची जबरदस्त पकड यामुळे या गाण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे.
संजय राऊतांची दोन शब्दांत प्रतिक्रिया; शायना एनसींच्या कृतीवर संताप व्यक्त करत म्हणाले…
‘जी जी रे जी’ या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध, अरेंज, कंडक्ट आणि निर्मित केले आहे. अमिताभ भट्टाचार्य यांचे शब्द आणि श्रेया घोषाल यांचा सुरेल आवाज या गाण्याला लाभला आहे. ताकद, जिद्द आणि एका दंतकथेच्या घडण्याचा उत्सव असलेल्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन वैभवी मर्चंट यांनी केले आहे. आपल्या लयबद्ध हालचाली आणि दमदार सादरीकरणातून श्रद्धा प्रेक्षकांना ‘ईठा’च्या दुनियेत घेऊन जाते. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि दिनेश विजन, लक्ष्मण उतेकर व करिश्मा शर्मा निर्मित ‘ईठा’ हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
