Stellar cast to unfold the story of Khagras shrouded in mystery Film’s title poster released : गूढ वातावरण, आकाशात सूर्याला झाकोळणारा चंद्र आणि त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता… ‘जेव्हा चंद्र सूर्याला झाकतो, तेव्हा सावली रक्ताने भरते’ या गूढ करणाऱ्या ओळींसह आगामी मराठी चित्रपट ‘खग्रास’चे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. नावापासूनच उत्सुकता वाढवणाऱ्या या चित्रपटात मराठी मनोरंजनविश्वातील एकापेक्षा एक उत्तम कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे रहस्य आणि उत्कंठेने भरलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच चित्रपटाची कथा काय असेल? या कथेत कोणते रहस्य दडले आहे, कोणत्या घटनांची उकल होणार आणि या सगळ्याचा एकमेकांशी काय संबंध असेल, याची ही उत्सुकता आता वाढली आहे.
राज्य सरकारला MPSC अध्यक्षांना हटवता येत नाही मग चौकशी कशी? विजय कुंभारांनी सांगितला कायदेशीर पेच
सिद्धार्थ मेनन, संस्कृती बालगुडे, क्षितीश दाते, स्वानंदी टिकेकर, राहुल पेठे, सायली पाठक, अनन्या जावळे, सुबोध भावे अशी दमदार कलाकारांची मांदियाळी ‘खग्रास’च्या निमित्ताने एकत्र आली आहे. प्रत्येक कलाकाराची वेगळी ओळख आणि अभिनयाची स्वतंत्र शैली यामुळे या चित्रपटातील व्यक्तिरेखा कशा असतील, त्यांचे एकमेकांशी काय नाते असेल याची उत्सुकता वाढली आहे. आकाश पेंढारकर आणि पराग मेहता प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन देवेश व्ही. कामत यांनी केले आहे. राकेश जावळे, किरण जावळे, कीर्ती जावळे आणि आशुतोष शर्मा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. स्वप्नेश सावंत, फ्लाइंग बुलेट पिक्चर्स आणि शोटॅड मोशन पिक्चर्स सहनिर्माते आहेत.
दिग्दर्शक देवेश व्ही. कामत म्हणतात, “रहस्यपटाची खरी ताकद ही प्रेक्षकांना प्रत्येक टप्प्यावर विचार करायला लावण्यात असते. ‘खग्रास’मध्ये कथा, व्यक्तिरेखा आणि त्यांच्याभोवती निर्माण होणारे गूढ यांचा असा मेळ साधण्याचा प्रयत्न केला आहे की, प्रेक्षकांना प्रत्येक क्षणी पुढे काय घडणार, याची उत्सुकता वाटत राहील. या कथेसाठी इतके उत्तम कलाकार एकत्र येणे ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. पोस्टरमधून निर्माण झालेली उत्सुकता चित्रपट पाहताना नक्कीच अधिक वाढेल, अशी आशा आहे.”
जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा मात्र ‘त्या’ मुद्द्यावरून ओबीसी संघटना आक्रमक होणार?
निर्माते राकेश जावळे म्हणतात, खग्रास’सारखी गूढ आणि वेगळ्या धाटणीची कथा प्रेक्षकांसमोर आणताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. या चित्रपटासाठी एकत्र आलेली कलाकारांची फळी ही त्याची मोठी ताकद आहे. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेतून कथेला वेगळे परिमाण दिले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत. रहस्याची चाहूल देणाऱ्या या टायटल पोस्टरनंतर आता ‘खग्रास’च्या कथेत नेमके काय दडले आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट ५ फेब्रुवारी २०२७ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
