Sunetra Pawar : एका स्त्रीच्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय हा तिचा स्वतःचा असतोच असं नाही. कधी कुटुंब, कधी नाती, कधी समाज आणि कधी परिस्थिती तिच्यासाठी काही निर्णय घेते. पण जेव्हा तीच स्त्री ‘आता पुरे!’ म्हणत स्वतःच्या आयुष्याची सूत्रं आपल्या हातात घेते, तेव्हा सुरू होतो तिचा खरा बंड. अशाच सहा स्त्रियांच्या आयुष्यातील संघर्ष, त्यांचे निर्णय आणि त्यामागची कारणं उलगडणारा महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘बंडखोर’चा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या ट्रेलर लाँच सोहळ्याने चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. या सोहळ्यात महाराष्ट्रातील काही स्वतःच्या अस्तित्वासाठी बंडखोरी करणाऱ्या स्त्रियांचा सन्मानही करण्यात आला.
ट्रेलरमध्ये छाया कदम, प्रियदर्शनी इंदलकर, मृणाल कुलकर्णी, पूजा कातुर्डे, तितिक्षा तावडे आणि नित्यश्री ज्ञानलक्ष्मी साकारत असलेल्या सहाही व्यक्तिरेखांची अधिक स्पष्ट ओळख होते. या सहा जणींची आयुष्यं वेगवेगळी असली तरी त्यांच्या वाटेला आलेली परिस्थिती त्यांना एका समान बिंदूवर आणून उभी करते. आपल्यावर लादलेलं आयुष्य जगण्यापेक्षा स्वतःच्या अस्तित्वासाठी प्रश्न विचारण्याची आणि त्याची उत्तरं शोधण्याची वेळ त्यांच्यावर येते. त्यामुळे या सहा जणींचं ‘बंडखोर’ होणं ही केवळ एका क्षणाची प्रतिक्रिया नसून, त्यामागे दडलेल्या अनेक भावनांची आणि अनुभवांची गोष्ट आहे.
ट्रेलरमधील संवाद, प्रसंग आणि व्यक्तिरेखांमधील नातेसंबंध या कथेला अधिक प्रभावी बनवत आहेत. सहा स्त्रिया नेमक्या कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, त्यांच्या आयुष्यातील कोणत्या घटना त्यांना निर्णय घेण्यास भाग पाडतात आणि त्या निर्णयांची किंमत त्यांना काय मोजावी लागते, याची उत्सुकता ट्रेलर निर्माण करतो. विशेष म्हणजे या सहाही व्यक्तिरेखा एकमेकींपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असूनही त्यांच्या संघर्षाचा सूर एकच आहे, तो म्हणजे स्वतःसाठी उभं राहाण्याचा.
ट्रेलर लाँच सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, ‘’ ‘बंडखोर’मधील या सहा स्त्रिया अनेक महिलांना नक्कीच प्रेरणा देतील. माझ्या मते, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या खऱ्या अर्थाने बंडखोर होत्या. त्यांनी ज्या परिस्थितीत समाजाचा सामना करत स्त्रियांसाठी शिक्षणाची दारं खुली केली, त्याचाच परिणाम म्हणून आज आपण इथे आहोत. त्यांचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधून समाजातील प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अनेक प्रश्न मांडलेले दिसतात. आपल्या मतांवर ठाम राहून अन्यायाविरोधात उभं राहाण्याची प्रेरणा हा चित्रपट देईल. महेश मांजरेकर यांनी नेहमीच वेगळे विषय प्रेक्षकांसमोर आणले आहेत आणि त्यांच्या चित्रपटांची आम्ही चाहते आहोत. ‘बंडखोर’च्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन आणि मला आवर्जून बोलवल्याबद्दल धन्यवाद.’’
ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणाले, ‘’ ‘बंडखोर’चा ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. माझ्या आयुष्यातील ‘बंडखोर’ स्त्रीबद्दल सांगायचे तर माझी आई आहे. माझ्या जडणघडणीत माझ्या आईचा मोठा वाटा आहे. माझ्या क्रिकेटच्या कारकिर्दीबाबत आणि शिक्षणाबाबत तिने नेहमीच पुढाकार घेतला. त्या काळात क्रिकेट हे फारसं सुरक्षित करिअर मानलं जात नव्हतं, परंतु माझी क्रिकेटमधली आवड ओळखून तिने मला प्रोत्साहन दिलं आणि त्याचबरोबर शिक्षणाचं महत्त्वही समजावून सांगितलं. ज्या पद्धतीने तिने मला घडवलं, त्यासाठी मी तिचा कायम ऋणी राहीन आणि मला आयुष्यात साथ देणाऱ्या माझ्या पत्नीचाही आजवरच्या वाटचालीत मोठा वाटा आहे. माझ्या आयुष्यातल्या या दोन्ही स्त्रियांमुळेच मी आज इथे आहे.’’
भारतासाठी दिलासा, स्टार खेळाडू करणार अफगाणिस्तानविरुद्ध पुनरागमन-
या सोहळ्याबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, ‘’‘बंडखोर’ हा शब्द आपण अनेकदा नकारात्मक अर्थाने वापरतो, परंतु माझ्यासाठी बंडखोर म्हणजे अन्यायाविरोधात आवाज उठवणारी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी ठामपणे उभी राहाणारी स्त्री. म्हणूनच सुनेत्रा अजित पवार यांना या चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्यानिमित्त आवर्जून बोलावलं. त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीला त्या ज्या खंबीरपणे सामोरं गेल्या आहेत. त्यातून त्यांच्यातली बंडखोर वृत्ती दिसते. माझी मोठी मुलगी खऱ्या अर्थाने बंडखोर आहे आणि तिच्यामुळेच या चित्रपटाची कल्पना सुचली. माझ्या आयुष्यात माझी आई, माझ्या पत्नी आणि मुली यांनी मला घडवलं आहे. मी आज जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे. वेगवेगळ्या स्त्रियांच्या आयुष्यात पाहिलेल्या संघर्षातून ‘बंडखोर’ची कथा आकाराला आली. हा चित्रपट मला घडवणाऱ्या आणि मला प्रेरणा देणाऱ्या प्रत्येक स्त्रीला वाहिलेली आदरांजली आहे.’’ संजय शेटये, विनसन ग्राफिक प्रोडक्शन निर्मित आणि सत्यसाई फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे संवाद लेखन सिद्धार्थ साळवी आणि इरावती कर्णिक यांनी केले आहे. ‘बंडखोर’ हा सहा स्त्रियांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या संघर्षांची आणि स्वतःसाठी घेतलेल्या निर्णयांची गोष्ट येत्या 24 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
