27 सप्टेंबरला नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबिर; 750 नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

नाशिकमधील राज्यव्यापी शिबिराचा अजेंडा आणि विचारमंथनाची रूपरेषा लवकरच निश्चित करण्यात येणार आहे.

News Photo   2026 08 31T181941.888

राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी (NCP) शिबिर 27 सप्टेंबर 2026 रोजी नाशिकमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत आगामी निवडणुका आणि संघटनात्मक तयारीसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

राज्यव्यापी शिबिरासाठी सुमारे 700 ते 750 प्रमुख नेते, निमंत्रित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. सर्व जिल्हाध्यक्ष तसेच महानगर प्रदेशातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा यात समावेश असेल. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ज्येष्ठ नेते आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यावर मुख्य समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये दौरे करून मर्यादित कालावधीत पक्षबांधणीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

‘छात्रों की गूंज’ नव्हे, झूट की गूंज राहुल गांधींच्या दाव्यांवर फडणवीसांचा थेट हल्लाबोल

DLO आणि SIR संदर्भातील कामकाजासाठी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांची प्रमुख समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, अनिल भाईदास पाटील यांची सहसमन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेबाबत आवश्यक माहिती संकलित करून पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार आहे. अंमलबजावणीत काही त्रुटी राहिल्या असल्यास त्या दूर करून पक्षाची तयारी अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जाणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

नाशिकमधील राज्यव्यापी शिबिराचा अजेंडा आणि विचारमंथनाची रूपरेषा लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. शिबिरातून राज्यातील तरुणाईपर्यंत व्यापक कार्यक्रम घेऊन जाण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल. स्वर्गीय अजितदादा हे तरुणाईमध्ये लोकप्रिय नेते होते, त्यामुळे त्यांचे विचार आणि राजकीय वारसा पुढे नेण्याचा विषय शिबिराच्या अजेंड्यावर निश्चितपणे असेल, असे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

follow us