मोठी बातमी : महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांच्या पीआरओचा मृत्यू
Ashish Mete
Aditi Tatkare PRO Death : महिला व बाकल्याणमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांचा पीआरओ म्हणून काम करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. आशिष मेटे (Ashish Mete) असे या मृत तरुणाचे नाव आहे. मुंबईतील भांडुपमध्ये इमारतीच्या आवारात चालताना आशिष मेटे अचानक खाली कोसळले. यावेळी मेटे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. एका खासगी एजन्सीकडून आशिष मेटे यांची तटकरे यांच्याकडे पीआरओ म्हणून नियुक्ती झाली होती.
आशिष मेटे हे मंत्री अदिती तटकरे यांच्यासोबत थेट सरकारी सेवेत नव्हते. एका पब्लिक रिलेशन कंपनीच्या माध्यमातून ते पीआरओ म्हणून नियुक्तीला होते. त्यांच्या कार्यालयाशी संबंधित प्रसिद्धी, जनसंपर्क विषयक कामे ते हाताळत होते. आशिष मेटे मेटे यांच्याप्रकरणी भांडूप पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मेटे यांचा मृतदेह पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवण्यात आला आहे.
भांडूप परिसरातील एका इमारतीच्या आवारात जेवण झाल्यानंतर ते फिरत होते. त्याचवेळी आशिष मेटे अचानक जमिनीवर कोसळले. खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
(बातमी अपडेट होत आहे)