भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत FDA ची अचानक ‘एन्ट्री’; जेवणाचे सॅम्पल घेतल्याने चर्चेला उधाण
एफडीएकडून कारवाईचा धडाका सुरू असतानाच भाजपच्या या महत्वाच्या बैठकीच्या ठिकाणी देखील पथक पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
FDA makes a surprise entry into the BJP state executive committee : पुण्यात सुरू असलेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक एंट्री करत जेवणाची तपासणी केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यभरात भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधात एफडीएकडून कारवाईचा धडाका सुरू असतानाच भाजपच्या या महत्वाच्या बैठकीच्या ठिकाणी देखील पथक पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, एफडीए अधिकाऱ्यांनी बैठकीच्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या जेवणाची पाहणी करत काही अन्नपदार्थांचे नमुने देखील तपासणीसाठी घेतले आहेत.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी राज्यभरातून पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि नेते पुण्यात दाखल झाले आहेत. या पदाधिकाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. याच ठिकाणी FDA च्या पथकाने अचानक भेट देत जेवण आणि इतर अन्नपदार्थांची तपासणी केली. अधिकाऱ्यांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची पाहणी करण्यासोबतच काही पदार्थांचे नमुने घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत होणाऱ्या राजकीय आणि संघटनात्मक चर्चांबरोबरच आता FDA ने घेतलेल्या ‘जेवणाच्या सॅम्पल’चीही जोरदार चर्चा रंगली आहे.
‘200 मंडळांचा DJ ला नकार, पण एका संस्थेनं गौतमी पाटीलला बोलावलं’; मेधा कुलकर्णींचं वक्तव्य
भाजपचे राज्य प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी FDA चे अधिकारी बैठकीच्या ठिकाणी येऊन तपासणी करून गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. FDA चे अधिकारी आले होते. त्यांनी अन्नपदार्थांची तपासणी केली आणि काही नमुने घेतले. तपासणीदरम्यान त्यांना काहीही आक्षेपार्ह आढळले नाही, असा दावा आंबेकर यांनी केला. FDA च्या पथकाने ही तपासणी नियमित प्रक्रियेचा भाग म्हणून केली की त्यामागे अन्य काही कारण होते, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात गेल्या काही काळापासून भेसळयुक्त अन्नपदार्थांचा मुद्दा चर्चेत असून FDA कडून विविध ठिकाणी तपासणी आणि कारवाई केली जात आहे. खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध आस्थापनांमधून नमुने घेऊन त्यांची तपासणी केली जात आहे. अशातच सत्ताधारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतही FDA पथक पोहोचल्याने या तपासणीने विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
शिंदेंकडे गुदगुली करण्याचे गुण, जरांगेंना 100 टक्के त्यांचाच पाठिंबा; सदावर्तेंचा पुन्हा गंभीर आरोप
दरम्यान, भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेली ही पहिलीच प्रदेश कार्यकारिणीची बैठक आहे. त्यामुळे या बैठकीला राजकीय आणि संघटनात्मकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षाची आगामी रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि विविध राजकीय मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होत असतानाच FDA पथकाच्या अचानक झालेल्या भेटीने वेगळीच चर्चा सुरू झाली.
एकीकडे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाच्या राजकीय विषयांवर विचारमंथन सुरू असताना दुसरीकडे FDA अधिकाऱ्यांनी जेवणाची तपासणी करून नमुने घेतल्याने सर्वांचे लक्ष या घटनेकडे वळले. तपासणीदरम्यान प्राथमिक स्वरूपात काही आक्षेपार्ह आढळले नसल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला असला, तरी घेतलेल्या नमुन्यांच्या तपासणीबाबत पुढे काय माहिती समोर येते, याकडेही लक्ष लागले आहे. त्यामुळे सध्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीतील राजकीय चर्चांइतकीच FDA च्या ‘एन्ट्री’ची आणि जेवणाच्या सॅम्पलची चर्चा रंगताना दिसत आहे.