‘200 मंडळांचा DJ ला नकार, पण एका संस्थेनं गौतमी पाटीलला बोलावलं’; मेधा कुलकर्णींचं वक्तव्य

भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनीही डीजेच्या दणदणाटाला विरोध करत पारंपरिक आणि सांस्कृतिक गणेशोत्सवावर भर देण्याची भूमिका मांडली आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 08 31T141046.643

Medha Kulkarni’s statement : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून राज्यभरात बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. मात्र, पुण्यात यंदा गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. पुणे महापालिकेच्या बैठकीत विद्याधर बापट यांनी डीजेच्या दणदणाटाला विरोध केल्यानंतर त्यांना बैठकीतून बाहेर काढण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. आता भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनीही डीजेच्या दणदणाटाला विरोध करत पारंपरिक आणि सांस्कृतिक गणेशोत्सवावर भर देण्याची भूमिका मांडली आहे.

उत्सव धार्मिक पद्धतीने साजरा झाला पाहिजे. पुण्यातील सुमारे 200 मंडळांनी डीजेचा वापर करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. मात्र, एका संस्थेने गौतमी पाटील यांना बोलावले आहे. गणेशोत्सवाला आलेले हे स्वरूप योग्य नाही, असे मेधा कुलकर्णी म्हणाल्या. मोठ्या आवाजातील आणि आक्षेपार्ह गाण्यांमुळे नागरिकांना त्रास होतो, वाहतूक कोंडी होते. त्यामुळे न्यायालयाने निश्चित केलेल्या डेसिबल मर्यादांचे काटेकोर पालन झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

‘12 तारखेपूर्वी मुंबईत पोहोचा, आझाद मैदानावर मात्र जाऊ नका’; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

सहन करण्याची पातळी ओलांडली गेली आहे. घरात आजारी व्यक्ती असेल तर त्यांना मोठ्या आवाजाचा त्रास होतो. उत्सवासाठी लोकांनी घर सोडून जायचे का? असा सवालही कुलकर्णी यांनी उपस्थित केला. प्रत्येकाला उत्सव साजरा करण्याचे स्वातंत्र्य आहे, मात्र आपल्या अधिकारामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. धांगडधिंगा करण्याऐवजी गणेशोत्सवात प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनीही डीजेच्या दणदणाटाला विरोध करत भाजपवर टीका केली. पुण्याने देशाला गणेशोत्सवाचे वैभव आणि समाजाला एकत्र आणणाऱ्या उत्सवाची परंपरा दिली. मात्र, परंपरेच्या नावाखाली राजकीय आशीर्वादाने सुरू असलेल्या डीजेच्या दणदणाटामुळे पुण्याचा गणेशोत्सव बदनाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मोठ्या आवाजामुळे वृद्ध, नवजात बालके, विशेष गरजा असलेली मुले आणि मुक्या प्राण्यांना त्रास होत असल्याचे जगताप म्हणाले. डीजेला विरोध करणाऱ्या नागरिकांबाबत भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केलेल्या कथित वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. ज्या नागरिकांनी भाजपला गल्लीतून दिल्लीपर्यंत नेले, तेच नागरिक भाजपला पुन्हा दिल्लीतून गल्लीत आणतील, असा इशाराही प्रशांत जगताप यांनी दिला.

follow us