Trupti Bhoir’s film ‘Paro’ : महिलांची खरेदी-विक्री करून त्यांना लग्नासाठी विकत घेण्याची धक्कादायक प्रथा आजही देशातील काही भागांत सुरू आहे. विशेषतः हरियाणातील मेवात परिसरात आढळणाऱ्या या प्रथेला स्थानिक भाषेत ‘पारो’ असे म्हटले जाते. याच गंभीर सामाजिक वास्तवावर प्रकाश टाकणारा ‘पारो : द अनटोल्ड स्टोरी ऑफ ब्राइड स्लेव्हरी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. 57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीच्या ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत अभिनेत्री आणि निर्मात्या तृप्ती भोईर यांनी चित्रपटाच्या निर्मितीमागील प्रवास उलगडला. या विषयावर संशोधन करण्यासाठी तब्बल साडेचार वर्षे खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, ऑस्करच्या यादीत स्थान मिळवणारा हा त्यांचा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटात तृप्ती यांनी निर्माती, पटकथालेखिका आणि मुख्य अभिनेत्री अशा तिन्ही जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
महिलांच्या प्रश्नांवर आधारित चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तृप्ती भोईर यांना माहितीपट आणि प्रसारमाध्यमांमधून वधू खरेदी-विक्रीच्या प्रथेची माहिती मिळाली. त्यानंतर या विषयाचा सखोल अभ्यास करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने तृप्ती आणि त्यांच्या आईने पत्रकारांचा वेश धारण करून संबंधित गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी वधू गुलामगिरीला बळी पडलेल्या सुमारे 62 ते 63 महिलांशी संवाद साधला. या महिला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिशा, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि दिल्ली अशा विविध राज्यांमधून आलेल्या होत्या.
डिलिमिटेशन व्हायलाच हवं, पण सरकारची पद्धत चुकीची; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे स्पष्टच बोलले!
तृप्ती यांच्या मते, महिलांची खरेदी-विक्री करण्यामागे लिंगभेद आणि गरिबी ही प्रमुख कारणे आहेत. ही समस्या केवळ हरियाणापुरती मर्यादित नसून देशातील अनेक राज्यांमधील महिला आणि मुलींना या प्रथेचा सामना करावा लागत आहे. संशोधनादरम्यान समोर आलेल्या घटनांपैकी एका घटनेने तृप्ती भोईर यांना सर्वाधिक अस्वस्थ केले. साधारण 11 ते 13 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीची अत्यंत किरकोळ रकमेत विक्री करण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली. याच मुलीच्या कहाणीवरून चित्रपटातील मुख्य पात्राची संकल्पना आकाराला आली.
चित्रपटात हे मुख्य पात्र तृप्ती भोईर यांनीच साकारले आहे. या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून वधू गुलामगिरीला बळी पडलेल्या असंख्य महिलांचे दुःख, असहायता आणि त्यांच्यावर होणारे शोषण प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या आणि ज्यांच्या वेदनांना अनेकदा आवाज मिळत नाही, अशा महिलांच्या कहाण्या जगासमोर आणणे हा या चित्रपटाचा मुख्य उद्देश आहे.
‘पारो’ या चित्रपटाचे महत्त्व केवळ सामाजिक विषय मांडण्यापुरते मर्यादित नाही. या समस्येविरोधात प्रत्यक्ष पातळीवरही प्रयत्न सुरू असल्याची माहिती तृप्ती यांनी दिली. शेल्टर फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने वधू गुलामगिरीच्या बळी ठरलेल्या सुमारे 2 हजार महिलांची माहिती संकलित केली आहे.
टाटा समूहातील सत्तासंघर्ष चव्हाट्यावर! नोएल टाटा विरुद्ध चंद्रशेखरन वाद न्यायालयात, हायकोर्टाचा मोठा निर्णय
ही माहिती सुमारे एक वर्ष आणि तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडे सादर करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तथ्यशोधन समिती स्थापन केली आहे. याबाबत बोलताना तृप्ती भोईर म्हणाल्या की, या समस्येची दखल घेऊन त्यावर पावले उचलणाऱ्या सरकारचे मी अभिनंदन करते. हा चित्रपट बनवण्यामागील हे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे.
महिला आणि मुली बेपत्ता होणे, लैंगिक हिंसाचार आणि मानवी तस्करी या समस्या केवळ भारतापुरत्या मर्यादित नसल्याचेही तृप्ती यांनी नमूद केले. गेल्या 15 ते 20 वर्षांत मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाबाबत जागरूकता वाढली असली, तरी लग्नाच्या नावाखाली महिलांची खरेदी-विक्री आणि वधू गुलामगिरी या गंभीर समस्यांकडे तुलनेने कमी लक्ष दिले जात आहे.
जगभरातील चित्रपट महोत्सव आणि विविध संस्थांमधील चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान प्रेक्षकांशी झालेल्या संवादातून या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अधिक चर्चा होण्याची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले. एकूणच, ‘पारो : द अनटोल्ड स्टोरी ऑफ ब्राइड स्लेव्हरी’ हा चित्रपट मनोरंजनापलीकडे जाऊन समाजातील एका दुर्लक्षित आणि अस्वस्थ करणाऱ्या वास्तवाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतो. महिलांचे हक्क, सन्मान, लिंगसमानता आणि वधू गुलामगिरी यांसारख्या मुद्द्यांवर व्यापक चर्चा घडवून आणण्याची आशा तृप्ती भोईर यांनी व्यक्त केली आहे.
