‘मी केटरिंग सेवेचा विस्तार केलाय!’ रॉबर्ट डाउनी ज्युनियरचा ‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे’च्या सेटवरील मजेशीर किस्सा
रॉबर्ट डाउनी ज्युनियर म्हणाला, ‘मी माझ्या केटरिंग सेवेचा विस्तार केला आहे.’ अभिनेत्री लेटिशियानेही डाउनीच्या या आदरातिथ्याची पुष्टी केली.
A fun anecdote from the set of ‘Avengers: Doomsday’ : हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियर पुन्हा एकदा मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये परतत आहे. मात्र, यावेळी तो सुपरहिरो नव्हे, तर धोकादायक खलनायक डॉक्टर डूमच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे’ या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता असतानाच चित्रपटाच्या सेटवरील काही मजेशीर गोष्टी समोर आल्या आहेत.
चित्रपटात पडद्यावर मोठी लढाई पाहायला मिळणार असली, तरी सेटवर मात्र जेवण, खेळ आणि मस्तीचे वातावरण होते. अभिनेता पॉल रुडने एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला. अँट-मॅनची भूमिका साकारणाऱ्या पॉलने सांगितले की, रॉबर्ट डाउनी ज्युनियरने सेटवर सर्वांसाठी खास जेवणाची व्यवस्था केली होती. त्यामुळे कलाकार आणि टीममधील सदस्य एकत्र वेळ घालवू शकत होते. सेटवरील वातावरण अगदी कुटुंबासारखे होते आणि सर्वजण या क्षणांचा आनंद घेत होते, असेही त्याने सांगितले.
यावर मिश्कील प्रतिक्रिया देताना रॉबर्ट डाउनी ज्युनियर म्हणाला, ‘मी माझ्या केटरिंग सेवेचा विस्तार केला आहे.’ अभिनेत्री लेटिशिया राइटनेही डाउनीच्या या आदरातिथ्याची पुष्टी केली. एवढेच नाही, तर सेटवर पॅक-मॅनसारख्या व्हिडिओ गेम्सचीही व्यवस्था असल्याचे तिने सांगितले.
डिलिमेटेशनवरून आघाडीत नाराजी? लंके म्हणाले, चुकीच्या पोस्ट करू नका…
म्हणजेच, पडद्यावर डॉक्टर डूम अॅव्हेंजर्स, एक्स-मेन, थंडरबोल्ट्स आणि फॅन्टास्टिक फोर यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करणार असला, तरी पडद्यामागे रॉबर्ट डाउनी ज्युनियर आपल्या सहकलाकारांसाठी जेवण, खेळ आणि धमाल यांची खास व्यवस्था करत होता. विशेष म्हणजे, मार्व्हलच्या याआधीच्या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यानही डाउनी कलाकारांसाठी अशा प्रकारे जेवणाचे आयोजन करत असे.
दरम्यान, मार्व्हल स्टुडिओजचा ‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे’ हा चित्रपट भारतात 17 डिसेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेतील प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच भारतीय प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येणार आहे. इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होईल. तसेच इन्फिनिटी व्हिजनसह अन्य प्रीमियम फॉरमॅटमध्येही चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.