ग्राहकांना 23 रुपयांचा फटका, दुसरीकडे ATM कंपन्यांना मोठा दिलासा; RBI चा नवा नियम!
ATM Withdrawals Rules रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एटीएम व्यवहार आणि व्हाइट लेबल एटीएमच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.
RBI Major Change For ATM Withdrawals : एटीएममधून पैसे काढणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एटीएम व्यवहार आणि व्हाइट लेबल एटीएमच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, महिन्याला मिळणाऱ्या मोफत एटीएम व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी ग्राहकांना 23 रुपये शुल्क आणि त्यावर जीएसटी भरावा लागणार आहे.
दुसरीकडे, एटीएम चालवणाऱ्या खासगी कंपन्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. आता या कंपन्यांना एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी केवळ एका बँकेवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्या इतर व्यावसायिक बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांकडूनही रोख रक्कम घेऊ शकणार आहेत. त्यामुळे एटीएममधील रोख रकमेचा पुरवठा अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
फ्री लिमिट संपताच प्रत्येक व्यवहारासाठी 23 रुपये शुल्क
RBI च्या नव्या नियमांनुसार, एटीएममधून पैसे काढण्याच्या मोफत व्यवहारांच्या मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बचत खातेदारांना स्वतःच्या बँकेच्या एटीएममधून दर महिन्याला पाच व्यवहार मोफत करता येणार आहेत. यामध्ये पैसे काढण्यासोबतच बॅलन्स तपासणे आणि मिनी स्टेटमेंट काढणे यांसारख्या गैर-वित्तीय व्यवहारांचाही समावेश आहे. इतर बँकांच्या एटीएममधून मेट्रो शहरांमध्ये महिन्याला तीन, तर नॉन-मेट्रो शहरांमध्ये पाच व्यवहार मोफत करता येतील. ही मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी 23 रुपये शुल्क आकारले जाईल. याशिवाय या शुल्कावर जीएसटीही भरावा लागणार आहे. मात्र, एटीएममधील एखादा व्यवहार तांत्रिक कारणामुळे अयशस्वी झाल्यास त्यासाठी ग्राहकांकडून शुल्क आकारले जाणार नाही.
भारतीय रिज़र्व बैंक (डिजिटल भुगतान – कार्ड-आधारित लेनदेन) निदेश , 2026
Reserve Bank of India (Digital Payments – Card-based transaction) Directions, 2026
https://t.co/QjlaAnfC4c— ReserveBankOfIndia (@RBI) November 27, 2026
व्हाइट लेबल एटीएम कंपन्यांना मोठा दिलासा
RBI ने व्हाइट लेबल एटीएम (WLA) चालवणाऱ्या कंपन्यांसाठीही नियमांमध्ये बदल केले आहेत. यापूर्वी या कंपन्यांना एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी प्रामुख्याने त्यांच्या स्पॉन्सर बँकेवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, नव्या नियमानुसार आता त्यांना स्पॉन्सर बँकेव्यतिरिक्त इतर व्यावसायिक बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांकडूनही रोख रक्कम घेता येणार आहे. एवढेच नाही, तर कंपन्यांना एकापेक्षा अधिक स्पॉन्सर बँकांसोबत करार करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.
थेट RBI कडूनही खरेदी करता येणार नोटा
नव्या नियमानुसार व्हाइट लेबल एटीएम ऑपरेटरना RBI च्या इश्यू ऑफिस आणि करन्सी चेस्टमधून थेट मोठ्या प्रमाणात नोटा खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी किमान एक लाख नोटांची खरेदी करावी लागेल. कंपन्यांना एक लाख, दोन लाख किंवा तीन लाख नोटा खरेदी करता येतील. यासाठी संपूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. संबंधित कंपन्यांना त्यांच्या एटीएमच्या ठिकाणांची यादीही RBI कडे द्यावी लागेल, जेणेकरून रोख रकमेच्या पुरवठ्याचे नियोजन करता येईल.
भारतीय रिज़र्व बैंक (व्हाइट लेबल एटीएम ऑपरेटर) निदेश , 2026
Reserve Bank of India (White Label ATM Operators) Directions, 2026
https://t.co/Av6YHDxxtB— ReserveBankOfIndia (@RBI) November 27, 2026
ग्राहकांना एटीएम शुल्काची माहिती देणे बँकांना बंधनकारक
नव्या नियमांनुसार बँकांना ग्राहकांना मोफत एटीएम व्यवहारांची मर्यादा आणि मर्यादा संपल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या शुल्काची स्पष्ट माहिती द्यावी लागणार आहे. कोणते एटीएम मेट्रो शहरांमध्ये आहेत आणि कोणते नॉन-मेट्रो शहरांमध्ये आहेत, याची माहितीही एटीएमबाहेर स्टिकर किंवा पोस्टरच्या माध्यमातून द्यावी लागेल. तसेच प्रत्येक एटीएमच्या ठिकाणाची अचूक माहिती बँकांच्या डेटाबेसमध्ये ठेवणे आवश्यक असेल. यामुळे ग्राहकांना व्यवहारांवरील शुल्क समजणे सोपे होणार आहे.
ग्राहकांसाठी नेमका काय परिणाम?
एकीकडे मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर ग्राहकांना प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी 23 रुपये आणि जीएसटी मोजावा लागणार आहे. त्यामुळे वारंवार एटीएममधून पैसे काढणाऱ्यांच्या खिशाला फटका बसू शकतो. दुसरीकडे, व्हाइट लेबल एटीएम कंपन्यांना अनेक बँका आणि थेट RBI कडून रोख रक्कम मिळवण्याचा पर्याय उपलब्ध झाल्याने एटीएममध्ये पैसे उपलब्ध ठेवण्याची प्रक्रिया अधिक लवचिक होऊ शकते. मात्र, या बदलामुळे ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क कमी होईल, अशी कोणतीही हमी नव्या नियमांत देण्यात आलेली नाही.