2027 मध्ये निसर्गाचा प्रकोप? एल निनो ऐतिहासिक उच्चांकाच्या दिशेने, अतिवृष्टी आणि उष्णतेच्या लाटांचा इशारा

डिसेंबर 2026 किंवा जानेवारी 2027 मध्ये एल निनोची तीव्रता सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 28T120450.222

El Niño heading towards a historic high : जगावर पुन्हा एकदा मोठं हवामान संकट घोंघावत आहे. प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान झपाट्याने वाढत असून, यंदाचा एल निनो ऐतिहासिक उच्चांक गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. डिसेंबर 2026 किंवा जानेवारी 2027 मध्ये एल निनोची तीव्रता सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, या एल निनोचा प्रभाव मे 2027 पर्यंत कायम राहू शकतो. ऑस्ट्रेलियाच्या हवामानशास्त्र विभागाच्या दक्षिण गोलार्धातील हवामान निरीक्षण अहवालातून ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

प्रशांत महासागरातील एल निनोची तीव्रता मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निनो 3.4 निर्देशांकात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. 22 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात हा निर्देशांक अधिक 2.67 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला. यंदा या निर्देशांकाने यापूर्वी अधिक 2.88 अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला होता. त्यामुळे सध्याचा एल निनो आतापर्यंतच्या सर्वाधिक तीव्र घटनांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरातील व्यापारी वाऱ्यांचा वेग मंदावणे, काही भागांत त्यांच्या दिशेत बदल होणे आणि ढगांच्या प्रमाणात वाढ होणे, हे एल निनो अधिक सक्रिय होत असल्याचे संकेत मानले जात आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या हवामानशास्त्र विभागासह बहुतांश आंतरराष्ट्रीय हवामान प्रारूपांनी डिसेंबर 2026 किंवा जानेवारी 2027 मध्ये एल निनो तीव्रतेचे शिखर गाठण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मार्च ते मे 2027  या कालावधीतही प्रशांत महासागराचे तापमान एल निनोसाठी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही महिने जागतिक हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत.

पवार कुटुंबीयांच्या टीकेनंतर सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये! पहाटेच बारामतीत उतरल्या, अधिकाऱ्यांना दिला दम

दुसरीकडे, हिंदी महासागरातील सकारात्मक द्विध्रुव म्हणजेच इंडियन ओशन डायपोलची स्थिती कमकुवत होत आहे. 22 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात आयओडी निर्देशांक अधिक 0.53 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला. नोव्हेंबरअखेर त्याची तीव्रता आणखी कमी होऊन डिसेंबरमध्ये तो तटस्थ अवस्थेत येण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी जगभरातील महासागरांचे पृष्ठभागीय तापमानही विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. ऑक्टोबर 2026 मध्ये महासागरांचे जागतिक सरासरी तापमान 1961 ते 1990 या कालावधीतील सरासरीपेक्षा एक अंश सेल्सिअसने अधिक नोंदवण्यात आले. विशेष म्हणजे, जूनपासून प्रत्येक महिन्यात महासागरांच्या तापमानाने त्या-त्या महिन्याचा उच्चांक गाठला आहे.

महासागरांचे वाढते तापमान जागतिक हवामान व्यवस्थेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. समुद्राचे पाणी अधिक गरम झाल्यामुळे वातावरणात आर्द्रता आणि ऊर्जा वाढते. परिणामी, वादळे आणि पाऊस निर्माण करणाऱ्या हवामान प्रणाली अधिक तीव्र होऊ शकतात. यामुळे जगातील काही भागांत अतिवृष्टी, पूरस्थिती आणि तीव्र वादळांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान दीर्घकाळ अधिक राहिल्यास सागरी उष्णतेच्या लाटाही निर्माण होऊ शकतात.

एल निनोचा परिणाम सर्वच प्रदेशांमध्ये सारखा होत नाही. काही भागांमध्ये अतिवृष्टी आणि पुराचा धोका वाढू शकतो, तर काही प्रदेशांमध्ये दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आगामी काळात जगभरातील हवामान विभागांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे. विशेषतः एल निनोचा प्रभाव मे 2027 पर्यंत कायम राहण्याचा अंदाज असल्याने त्याच्या परिणामांवर हवामान शास्त्रज्ञांचे बारकाईने लक्ष असणार आहे. महासागरांचे विक्रमी तापमान आणि एल निनोची वाढती तीव्रता पाहता, 2027 हे वर्ष जागतिक हवामानाच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

follow us