Download App

‘वेल डन आई’ चित्रपटाचे आकर्षक पोस्टर प्रदर्शित! 14 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Well Done Aai Marathi Movie Will Be Released on November 14th : ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी…’ हे आपण सर्वजण बालपणापासूनच ऐकत आलो आहोत. आजवर अनेक लेखक-कवींनी लेख-कवनांद्वारे आपापल्या परीने आईची महती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही अद्याप कोणाला आईरूपी दैवताला शब्दांत गुंफणे नीटसे जमलेले नाही. निर्माता-दिग्दर्शकांनीही चित्रपटांद्वारे आईचे विविध पैलू उलगडण्याचे काम केले आहे. ‘वेल डन आई’ (Well Done Aai) हा आगामी मराठी चित्रपटही आईला केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात आला आहे. काळ बदलला तरी आई आणि आईची ममता (Marathi Movie) तसूभरही बदललेली नाही. अशाच एका प्रेमळ पण कणखर आईची कहाणी सांगणाऱ्या ‘वेल डन आई’ या विनोदी मराठी चित्रपटाचे आकर्षक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हा चित्रपट (Entertainment News) 14 नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

‘वेल डन आई’ चित्रपटाची प्रस्तुती दीपाली प्रोडक्शनने केली असून, निर्मिती सुधीर पाटील यांनी केली आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शंकर अर्चना बापू धुलगुडे यांनी केले आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संदीप गचांडे आणि शंकर धुलगुडे यांनी लिहिले आहेत. घोषणा झाल्यापासून हा चित्रपट शीर्षक भूमिकेत असलेल्या कॅामेडी क्वीन विशाखा सुभेदारमुळे चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या घरोघरी लोकप्रिय असलेल्या विशाखाने या चित्रपटात साकारलेली आई पाहण्यासाठी रसिक उत्सुक झाले आहे. त्यात भर टाकण्यासाठी ‘वेल डन आई’ चित्रपटाचे आकर्षक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टरवर आईच्या भूमिकेत आपली व्यक्तिरेखा एन्जॅाय करणारी विशाखा लक्ष वेधून घेते. जणू रसिकांना थम्स-अप करत ती सिनेमा पाहण्यासाठी आमंत्रितच करत आहे. तिच्या एका बाजूला विजय निकम तर दुसऱ्या बाजूला जयवंत वाडकर आहेत. याखेरीज आयुष पाटील, सिमरन खेडकर, बीना सिद्धार्थ, तन्वी धुरी, विपुल खंडाळे आदी कलाकारांपैकी काही कलाकारांचे चेहरे पोस्टरवर पाहायला मिळतात. या चित्रपटातील आई आजच्या काळातील असल्याचे पोस्टर पाहिल्यावर जाणवते. मध्यमवर्गीय कुटुंबातील ही आई आपल्या मुलासाठी आणि त्याच्या सुखासाठी काय-काय करते ते ‘वेल डन आई’मध्ये पाहायला मिळणार आहे.

गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका! मनोज जरांगेंवर आंबेडकरांचा संताप, सोशल मीडियावर पोस्टची चर्चा

याबाबत शंकर अर्चना बापू धुलगुडे म्हणाले की, ‘वेल डन आई’मधील आई रसिकांना आजवर कधीही चित्रपटात पाहायला मिळालेली नाही. या चित्रपटाची पटकथा रसिकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी असून, यातील आई परिपूर्ण मनोरंजन करणारी आहे. गीत-संगीत आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या आधारे या चित्रपटाच्या रूपात मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज प्रेक्षकांसमोर सादर करण्याचे काम ‘वेल डन आई’च्या टिमने यशस्वीपणे केले असल्याचेही ते म्हणाले.

पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस! कोकण, मध्य महाराष्ट्र अन् विदर्भाला अलर्ट जारी…

गीतकार संदीप गचांडे यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार निशाद गोलांबरे यांनी संगीतसाज चढवला आहे. छायांकन रंजीत साहू यांनी केले असून संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. राज्यपाल सिंह यांनी कार्यकारी निर्मात्याची भूमिका चोख बजावली असून काफिल अन्सारी यांनी प्रोडक्शन हेड म्हणून काम पाहिले आहे. सिनेपोलीस या चित्रपटाचे वितरण करणार आहे. ऍग्नेल रोमन यांनी पार्श्वसंगीत, तर देवेंद्र तावडे यांनी कलादिग्दर्शन केले आहे. चिनी चेतन यांनी नृत्य दिग्दर्शन केले असून, मयुरी बस्तावडेकर यांनी केशभूषा केली आहे. वेशभूषा प्रतिभा गायकवाड यांनी केली असून, रंगभूषा माधव म्हापणकर यांची आहे. मानस रेडकर या चित्रपटाचे सह दिग्दर्शक असून, आय फोकस स्टुडिओ (विजय दिनेश) यांनी पोस्ट प्रोडक्शन केले आहे. प्रेमांकुर बोस यांनी विज्युअल प्रमोशनचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.

 

follow us