Download App

Letsupp Special : मराठी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार मिळविण्यात कमी का पडतात? ठाकूर, मतकरी यांची रोखठोक मतं

Dilip Thakur: परंतु आज सुद्धा एकाच मराठी चित्रपटाची नोंद घेतली गेली. इतर भाषिक चित्रपटाच्या स्पर्धेमध्ये यावर लक्ष देणं गरजेचे आहे.

  • Written By: Last Updated:

Dilip Thakur and Ganesh Matkari on 70th National Film Awards: नितीन मोरे, मुंबई : 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या (70th National Film Awards)विजेत्यांची आज घोषणा करण्यात आलीय. यामध्ये अनेक हिंदी, मल्याळम्, गुजराती, तामिळ या भाषेमधील चित्रपटांना पुरस्कार मिळाले. यासोबत मराठी सिनेमादेखील तेवढ्याच ताकदीने पुढे आहे. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘वाळवी’ चित्रपट हा सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून घोषित करण्यात आला आहे. या चित्रपटाने तीन डॉक्युमेंट्री फिल्म्सला मागे टाकले आहे. याचसोबत ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ या मराठी चित्रपटाला नॉन फीचर पुरस्कार विभागातील सर्वोत्कृष्ट माहितीपट आणि सर्वोत्कृष्ट कथन आणि आवाज पुरस्कार जाहीर करण्यात आलेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सोहिल वैद्य यांनी केले आहे. याबरोबरच ‘वारसा’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कला आणि सांस्कृतिक चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली. आणखी एक ‘मोहेंजो दारो’ ला लघुपटाला बेस्ट बायोग्राफिकल हिस्टोरिकल कम्पायलेशन फिल्म कॅटेगरीत अवॉर्ड मिळाला आहे.

राष्ट्रीय पुरस्कारात हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांचा डंका; मराठी चित्रपटसृष्टीकडून घोर निराशा

या सगळ्या यशामध्ये मराठी चित्रपटाचा डंका आहेच. परंतु एक खंत सुद्धा आहे आणि ती म्हणजे यावेळी 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीमधून फक्त एकाच चित्रपटाला मानाचे स्थान मिळाले. याखेरीज मल्याळम् ,तामिळ, कन्नड , हरयाणवी , गुजराती या भाषेतील चित्रपटांच वर्चस्व दिसून आले. पुरस्कार मिळविण्यात मराठी चित्रपट कुठे कमी पडतात, याबाबत चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर म्हणाले, कोरोना काळामध्ये सुद्धा मराठी चित्रपटांची संख्या चांगली होती. परंतु आज सुद्धा एकाच मराठी चित्रपटाची नोंद घेतली गेली. इतर भाषिक चित्रपटाच्या स्पर्धेमध्ये यावर लक्ष देणं गरजेचे आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅनारामामध्ये काही वर्षांपूर्वी एकही मराठी चित्रपट नव्हता. आणि यावेळी सुद्धा मराठी चित्रपट सृष्टीमधून कोणाचीच काहीच प्रतिक्रिया नव्हती आली. या सगळ्यावर मराठी प्रेक्षकांमध्ये एक संभ्रम तयार होतो की आज सुद्धा फक्त मराठी चित्रपटांची संख्या वाढत आहे. चित्रपटाचा दर्जा नाही आणि म्हणूनच या गोष्टीकडे वेळीच लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

70th National Film Award: ‘कांतारा’ची यशस्वी घोडदौड! दोन राष्ट्रीय पुरस्कारावर उमटवली मोहोर


स्वतंत्र फिल्ममेकर्सवरचा अन्याय तर वाटतोच

याचसोबत चित्रपट विश्लेषक गणेश मतकरी यांनी सुद्धा त्यांचे मत मांडले ते अस म्हणतात, मला वाटतं आपल्याकडे राष्ट्रीय किंवा कोणत्याही महत्वाच्या पुरस्कारांना सिम्प्लिफाय करुन टाकण्याची एक पद्धत आहे. मराठी चित्रपटसृष्टीने ठसा उमटवला, मोहोर उमटवली, अथवा तसे झाले नाही, एवढेच आपण पटकन पाहतो. त्यातही आपले लक्ष प्रामुख्याने असते, ते फीचर फिल्म्सकडे. नॅान फीचरकडे आपलं लक्ष उशीराच जाते. हा मला स्वतंत्र फिल्ममेकर्सवरचा अन्याय तर वाटतोच, वर एकूण चित्रपटसृष्टीतल्या विविधतेकडे त्यामुळे दुर्लक्ष होते. हे खरंय की यावेळी फीचर विभागात आपल्याला खूप पुरस्कार मिळाले नाहीत. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट या विभागात वाळवी चित्रपटाला पुरस्कार घोषित झाला, पण वाळवीदेखील एक वेगळा दृष्टिकोन मांडणारा, विनोदाच्या आवरणाखाली सामाजिक भाष्य करणारा सिनेमा होता. त्यामुळे त्याचा सन्मान होणं ही चांगली गोष्ट आहे. परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांनीही आपल्या कामात सातत्य दाखवल्याचं त्यांच्या चित्रपटांना मिळत राहिलेल्या पुरस्कारांवरुन दिसतं.

लगेच काही निष्कर्ष काढण्याची गरज नाही

याखेरीज नॅान फीचर विभागात आपल्या तीन फिल्म्सना मिळून चार पुरस्कार मिळाले आहेत. अशोक राणे याआधी त्यांच्या पुस्तकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते ठरले आहेत. मुंबईतल्या गिरणीसंघर्षाबद्दलच्या त्यांच्या ‘आणखी एक मोहेंजोदारो’ या माहितीपटाला पुरस्कार आहे. सचिन बाळासाहेब सूर्यवंशींच्या ‘वारसा’ ला कला/संस्कृती संबंधातल्या फिल्मचा पुरस्कार आहे. सोहिल वैद्यच्या ‘आदिगुंजन’ या आदिवासी आणि जंगलं यांच्या नात्याबद्दलच्या फिल्मला सर्वोत्कृष्ट माहितीपट आणि निवेदन ( सुमंत शिंदे ) असे दोन पुरस्कार आहेत. या पुरस्कारांचंही तेच महत्व आहे, जे फीचर फिल्मला मिळालेल्या. त्याबरोबर आणखी एक खास बाब म्हणजे हे केवळ त्या भाषेतला बेस्ट असे पुरस्कार नाहीत, तर त्या त्या विभागात सर्व भाषांमधून त्यांची निवड झालेली आहे. त्यामुळे त्यांचं थोडं अधिक कौतुक असायलाही हरकत नाही. आपल्या देशात इतक्या भाषात इतक्या फिल्म बनत असतात, कधी एखाद्या भाषेत थोडे अधिक पुरस्कार जाणार, कधी थोडे कमी. त्याने लगेच काही निष्कर्ष काढण्याची गरज नाही. सर्व विजेत्यांचं अभिनंदन करणं हे पुरेसं आहे.चित्रपट विश्लेषक गणेश मतकरी आणि दिलीप ठाकूर यांनी मांडलेले त्यांचे मत आणि मराठी चित्रपटाचे पुढचे भवितव्य तेवढेच महत्वाचे आहे असं बोलायला काही हरकत नाही.

follow us