Ustad Zakir Hussain : जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं काल आजारपणामुळे (Zakir Hussain) निधन झालं. प्रकृती संबंधी समस्या जाणवत असल्याने अमेरिकेतीस सॅन फ्रॅन्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, काल आजारपणाशी त्यांची झुंज अपयशी ठरली. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी सोमवारी (१६ डिसेंबर) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. वडीलांकडून तबला वादनाचं बाळकडून मिळाल्यानंतर लहान वयातच त्यांनी तबला वादनाला सुरुवात केली आणि जगभरात प्रसिद्धी मिळवली. उस्ताद झाकीर हुसैन यांच्याबाबत काही गोष्टी जाणून घेऊया..
दिवंगत उस्ताद झाकीर हुसैन यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत झाला होता. त्यांचे वडील प्रसिद्ध तबला वादक होते. मुंबईतील सेंट मायकल हायस्कूल येथून त्यांनी शालेय शिक्षण घेतलं. नंतर सेंट जेवियर्स कॉलेजमधून पदवी घेतली. अगदी लहानपणीच त्यांनी वडिलांकडून तबला वादन शिकून घेतले होते. कमी वयातच तबला वादनाचे कार्यक्रमही आयोजित केले. फक्त १२ वर्षांच्या वयातच थेट अमेरिकेत पहिला परफॉर्मन्स सादर केला. यासाठीचा मोबदला म्हणून झाकीर हुसैन यांना पाच रुपये मिळाले होते.
Zakir Hussain Died : मोठी बातमी! तबला वादक झाकीर हुसैन यांचे निधन
झाकीर हुसैन यांच्या नेटवर्थची माहिती घेतली असता उस्ताद झाकीर हुसैन जवळपास ८.४८ कोटी रुपयांची संपत्ती मागे सोडून गेले आहेत. तबला वादन कॉन्सर्ट आणि अन्य माध्यमांतून त्यांना उत्पन्न मिळत होते. झाकीर हुसैन २२ वर्षांचे असताना सन १९७३ मध्ये त्यांनी लिविंग इन द मटेरियल वर्ल्ड हा पहिला अल्बम लाँच केला होता. हा अल्बम लोकांच्या पसंतीस उतरला होता.
उस्ताद झाकीर हुसैन यांच्या उत्पन्नातील मोठा हिस्सा तबला वादनातूनच येत होता. या व्यतिरिक्त त्यांनी अभिनयातही नशीब आजमावलं. त्यांनी एकूण १२ चित्रपटांत काम केलं. फक्त पाच रुपयांपासून सुरुवात केल्यानंतर पुढील काळात त्यांनी अमाप प्रसिद्धी मिळवली आणि अनेक पुरस्कारांनाही गवसणी घातली. झाकीर हुसैन यांनी ५ ग्रॅमी अवॉर्ड्स मिळवले होते. तसेच १९८८ मध्ये पद्मश्री आणि २००२ मध्ये पद्मभूषण तर २०२३ मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं.
दिवंगत तबला वादक झाकीर हुसैन यांच्या मागे पत्नी अँटोनिया मिनेकोला आणि दोन मुली आहेत. त्यांची पत्नी इटालियन-अमेरिकन आहे. तसेच नृत्यांगणा आहे. तसेच शिक्षक आणि मॅनेजर म्हणूनही अँटोनिया मिनेकोला यांनी काम केलं आहे.
सन २०१६ मध्ये झालेल्या ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी उस्ताद झाकीर हुसैन यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलं होतं. व्हाईट हाऊसमध्ये कला सादरीकरण करणारे ते पहिले कलाकार ठरले. पंडित रवी शंकर, उस्ताद अमजदअ अली खान, जॉर्ज हॅरिसन, जॉन मॅक्लॉफ्लिन आणि मिकी हार्ट ऑफ द ग्रेटफुल डेड यांसारख्या दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी काम केलं. १९७० मध्येच त्यांनी जॉन मॅक्लॉफ्लिनसोबत शक्ती फ्यूजन ग्रुपची स्थापना केली. यामाध्यमातून भारतीय शास्त्रीय संगीत आणि जॅझ यांचं एकत्रीकरण करून नवीन शैली सादर करण्यात आली.