सोनिया गांधींच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ पुस्तकाचे प्रकाशन; अनेक आठवणींचा उलगडा!
Sonia Gandhi’s book Belonging सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : ए जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे सोमवारी अधिकृत प्रकाशन झाले.
shruti letsupp
Sonia Gandhi Book Belonging
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : ए जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे सोमवारी अधिकृत प्रकाशन झाले.
या पुस्तकाच्या माध्यमातून सोनिया गांधी यांनी आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा, कौटुंबिक आठवणींचा आणि संघर्षमय प्रवासाचा उलगडा केला आहे.
या प्रकाशन सोहळ्याला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते.
हार्पर कॉलिन्स इंडिया या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेले हे पुस्तक ५४४ पानांचे आहे.
यात सोनिया गांधी यांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येनंतरचा कठीण काळ, स्वतःची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज, तसेच २००४ मध्ये पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार देण्यामागील भूमिका अशा अनेक महत्त्वाच्या घटनांवर भाष्य केले आहे.
पुस्तक लेखनामागील भूमिका स्पष्ट करताना सोनिया गांधी म्हणाल्या, “राहुल आणि प्रियंका यांनी मला हे पुस्तक लिहिण्यासाठी प्रेरित केले. सुरुवातीला पुस्तक लिहिणे खूप अवघड वाटत होते. मात्र, एकदा लेखनाला सुरुवात केल्यानंतर त्यात आनंद मिळू लागला.
पुस्तकाच्या शीर्षकाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, ‘बिलॉन्गिंग’ हा शब्द पुस्तकात वारंवार येतो. एखाद्या व्यक्तीशी नाते जोडणे, नव्या वातावरणात स्वतःला सामावून घेणे आणि स्वीकारले जाण्यासाठी केलेला प्रयत्न, असा या शब्दाचा अर्थ आहे.
हिंदुस्थानात कुटुंबव्यवस्थेतील महिलांच्या अनुभवाशी या शीर्षकाचा संबंध जोडताना सोनिया गांधी म्हणाल्या की, हिंदुस्थानात लग्नानंतर मुलीला नव्या घरात जाऊन जुळवून घ्यावे लागते.
नव्या माणसांशी नाती जोडावी लागतात आणि त्या घराचा भाग होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हिंदुस्थानात आल्यानंतर आपल्यासाठीही हा असाच आपलेपणा शोधण्याचा प्रवास होता.
दरम्यान या प्रकराळन सोहळ्यामध्ये बोलताना राहुल गांधी यांनी सांगितले की, आज, ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त, माझ्या बालपणीच्या आईच्या आठवणी माझ्या मनात ताज्या झाल्या.
तिची ऊबदार वृत्ती, तिचे हास्य, तिची जिद्द आणि तिच्या आयुष्याला आकार देणारे ते अफाट प्रेम—या सर्व गोष्टी आठवल्या.
तसेच पुढे ते म्हणाले की, आजच्या कार्यक्रमात सहभागी होऊन, आईवर भरभरून प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव करणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनापासून आभार! तुमच्या उपस्थितीमुळे हा क्षण खरोखरच खास बनला. आमच्यासाठी हे खूप मोलाचे होते.