काबूल : अफगानिस्तानमध्ये (Afghanistan)पुन्हा एकदा भूकंपाचे (earthquake)धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार (NCS), आज गुरुवारी सकाळी 7:06 वाजता झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगानिस्तानमधील फैजाबाद (Faijabad)येथे होता. सध्या या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून अफगानिस्तानमध्ये सतत भूकंपाचे धक्के बसत आहेत. गेल्या सात दिवसांमध्ये भूकंपानं हॅट्रीक केली आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) च्या माहितीनुसार यापूर्वी मंगळवारी अफगानिस्तानमध्ये 4.1 तीव्रतेचा भूकंप झाला होता. दुसरीकडे, 2 मार्च रोजी अफगानिस्तानच्या फैजाबाद भागात 4.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. दोन्ही भूकंपात कोणतीही हाणी झालेली नाही.
तुर्कस्तानमध्ये फेब्रुवारी महिन्यातच मोठा भूकंप झाला होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. या भूकंपात अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या तर 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.8 तीव्रता होती.
या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कस्तानच्या दक्षिणेकडील गाझियानटेप होता. यातून सावरल्यानंतर काही वेळातच दुसरा भूकंप झाला, त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 तीव्रता होती.
भारतालाही भूकंपाचा धोका
एका फ्रेंच शास्त्रज्ञानं भारतात येत्या काळात भूकंप होणार असल्याचं भाकित केलं आहे. याच शास्त्रज्ञानं तुर्की आणि सीरियाच्या भूकंपाचा अंदाज वर्तवला होता आणि तो अंदाज खराही ठरला आहे. त्यामुळं भारतीयांची धाकधूक वाढली आहे.
भूगर्भशास्त्रज्ञ आणि डच संशोधक फ्रँक हूगरबीट्स (Frank Hoogerbeets) यांनी भारतातही भूकंप होणार असल्याचं सांगितलं आहे. हूगरबीट्स यांनी भारताबद्दल भाकित करत सांगितलंय की, भारताला मोठ्या भूकंपाचा धक्का बसणार आहे. हिंदी महासागर क्षेत्रातील देश भारत, पाकिस्तानसह अफगानिस्तानलाही या भूकंपाचा झटका बसणार आहे. त्यातच आज गुरुवारी सकाळीच चीन आणि अफगानिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत.