California Wild Fire : अमेरिका सध्या भीषण आगीच्या विळख्यात सापडला आहे. लॉस एंजेलिसच्या (California Wild Fire) जंगलात भीषण आग लागली असून ही आग थेट रहिवासी परिसरात पोहोतली आहे. या वणव्यामुळे आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या वणव्यात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजारांहून अधिक इमारती जळून खाक झाल्या आहेत.
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातील लॉस एंजेलिसच्या (Los Angeles) अनेक जंगलात ही आग लागली आहे. सर्वात आधी पॅसिफिक पॅलिसेड्सच्या जंगलात वणवा भडकला. हा वणवा वेगाने पसरला. या वणव्याने नंतर ईटन आणि हर्स्टच्या जंगलांनाही कवेत घेतलं. आता लीडिया, वुडली आणि सनसेट या आसपासच्या जंगलातही आग पसरली आहे. इतकेच नाही तर येथील रहिवासी परिसरांनाही या आगीच्या झळा बसू लागल्या आहेत.
हॉलीवूड हिल्समध्येही (Hollywood Hills) आगीचं तांडव सुरू आहे. या आगीने शेकडो एकर परिसरातील जंगलं नष्ट झाली आहेत. येथील सगळाच परिसर भस्मसात झाला आहे. लॉस एंजेलिस प्रशासनाने संपूर्ण शहरात आणीबाणी लागू केली आहे. या भागात दाट लोकसंख्या आहे. जवळपास एक कोटी लोक या भागात राहतात.
Video : बॉलिवूड गायक शान राहत असलेल्या इमारतीला भीषण आग; रहिवाशांची पळापळ
एपीच्या रिपोर्टनुसार, या आगीत अनेक हॉलीवूड सेलिब्रिटीजची घरे जळून खाक झाली आहेत. बिली क्रिस्टन,मँडी मूर, जेमी ली कर्टिस, पॅरिस हिल्टन यांसारख्या सेलिब्रिटी अभिनेत्यांची घरे आगीत जळाली आहेत. या आगीमुळे हॉलीवूडमध्ये हाहाकार उडाला आहे कारण या भागात अनेक मोठ्या कंपन्या आहेत. त्यांनाही याचा फटका बसला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
जंगली जनावरांनाही या आगीचा मोठा फटका बसला आहे. येथील परिस्थिती अशी झाली आहे की लोकांनी जीव वाचविण्यासाठी वाहने सोडून पायी चालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सगळीकडेच लोकांची गर्दी दिसू लागली आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्नही अपयशी ठरताना दिसत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी येथे अग्निशमन वाहने विक्रमी संख्येने दाखल झाली आहेत. रेस्क्यू पथके जोरदार प्रयत्न करत आहेत. हेलिकॉप्टर आणि विमानांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, आग वाढतच चालली आहे. जोरदार वारा वाहत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. वारा दिशा बदलत असल्याने आगीचा फैलावही वाढत चालला आहे.
INS ब्रह्मपुत्रा जहाजाला भीषण आग; एक खलाशी बेपत्ता, युद्धनौकाही एका बाजूला झुकली
या घटनेमुळे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी आपला विदेश दौरा रद्द केला आहे. तर नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरवर चांगलेच भडकले आहेत. त्यांनी गव्हर्नर गॅविन न्यूसम आणि राष्ट्रपती जो बायडन या दोघांवरही टीका करत जबाबदार धरलं आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत बायडन यांच्यावर घणाघाती टीका केली.