दहा हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अर्थव्यवस्थेला अब्जावधींचा फटका; नेपाळमध्ये आंदोलनाचे दुष्परिणाम
Gen Z आंदोलना दरम्यान झालेली हिंसा, जाळपोळ आणि तोडफोडीमुळे अब्जावधींचे नुकसान झाले. 10 हजार लोक बेरोजगार झाले.

Nepal Gen Z Protest : नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी आंदोलनाचे दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. या आंदोलनाचा सर्वात मोठा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. Gen Z आंदोलना दरम्यान झालेली हिंसा, जाळपोळ आणि तोडफोडीमुळे अब्जावधींचे नुकसान झाले. इतकेच नाही 10 हजार लोक बेरोजगार झाले. दरबार स्क्वेअर, पोखरा, भैरहवा आणि चितवन यांसारखे मुख्य पर्यटन स्थळे आता निर्मनुष्य झाली आहेत. कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या कमालीची घटली आहे. नेपाळमध्ये आताचा काळ हा पर्यटक येण्याचा काळ आहे. या दिवसात पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत असतात. यामुळे देशात रोजगार वाढीस लागतो तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळते. परंतु, आता असं काहीच होताना दिसत नाही याचं कारण काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये झालेलं हिंसक आंदोलन.
अर्थव्यवस्थेला अब्जावधींचा फटका
काठमांडू पोस्टच्या रिपोर्टनुसार नेपाळच्या अर्थव्यवस्थेला (Nepal GenZ Protest) जवळपास 3 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. सरकारी आणि खासगी संपत्तीचेही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे देशाचा आर्थिक वाढीचा दर 1 टक्क्यांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. तसेच आगामी निवडणुकीमुळे सरकारच्या तिजोरीवर आणखी 30 अब्ज रुपयांचा भार पडणार आहे.
उद्योग क्षेत्रालाही आंदोलनाचा तडाखा
नेपाळमधील मोठे व्यावसायिक समूह आणि करदात्यांना या आंदोलनाचा फटका बसला. भट भटेनी सुपरमार्केट आणि चौधरी समुहाला कोट्यावधींचा फटका बसला. एनसेल टेलिकॉम कंपनीलाही मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. हॉटेल असोसिएशन नेपाळनुसार हॉटेल व्यवसायाला 25 अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. ऑटो सेक्टरला 15 अब्ज रुपयांचा फटका बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नेपाळचे माजी पीएम केपी ओली यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल; नक्की काय घडलं?
पर्यटन उद्योगाला उतरती कळा
नेपाळच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन उद्योगाचा मोठा वाटा आहे. सणासुदीच्या आणि सु्ट्ट्यांच्या दिवसात या क्षेत्रात मोठी उलाढाल होते. परंतु, यावेळी परिस्थिती एकदम उलट आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, एअरलाइन्स आणि ट्रॅव्हल एजन्सींची कार्यालये ओस पडली आहेत. दरबार स्क्वेअर आणि पोखरा यांसारख्या ठिकाणी शुकशुकाट आहे. पर्यटकांची संख्या घटल्याने लाखो लोकांच्या रोजगारांवर विपरीत परिणाम झाला आहे.