Download App

अमेरिकेने युक्रेनला धक्का दिलाच! संयुक्त राष्ट्रांत चक्क रशियाला साथ; नेमकं काय घडलं?

प्रस्तावावर मतदान घेण्याची गरज पडली तेव्हा अमेरिकेने चक्क रशियासोबत असल्याची घोषणाच करुन टाकली.

USA Stand in Russia Ukraine War : रशिया यु्क्रेन युद्धात आतापर्यंत युक्रेनची (Russia Ukraine War) बाजू घेणाऱ्या शस्त्रास्त्रे आणि आर्थिक मदत करणाऱ्या अमेरिकेने जोरदार पलटी मारली आहे. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत (Donald Trump) येताच त्यांनी युक्रेनला धक्के देणारे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. याची प्रचिती संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) नुकत्याच झालेल्या मतदानात दिसून आली. संयुक्त राष्ट्रांत आणल्या गेलेल्या एका प्रस्तावात युक्रेनमधून रशियन सैन्याची वापसी आणि युद्धाची निंदा करण्याची शिफारस करण्यात आली होती. या प्रस्तावावर मतदान घेण्याची गरज पडली तेव्हा अमेरिकेने चक्क रशियासोबत असल्याची घोषणाच करुन टाकली.

युरोपातील अनेक देशांकडून हा प्रस्ताव आणण्यात आला होता. या प्रस्तावावर मतदानावेळी भारताने अलिप्त राहणे पसंद केले. या प्रस्तावाला एकूण 93 देशांनी समर्थन दिले तर 18 देशांनी या विरोधात मतदान केले. यामध्ये अमेरिका, रशिया, बेलारुस, उत्तर कोरिया यांसारख्या देशांचा समावेश होता. भारतासह 65 देशांनी मतदानात भागच घेतला नाही. मतदानानंतर अमेरिकी राजदू डोरोथी शी यांनी प्रतिक्रिया दिली. हा प्रस्ताव शांततेच्या दिशेने एक पाऊल आहे. आता आपल्याला पुढे होऊन युक्रेन, रशिया आणि जागतिक समुदायासाठी एक शांततापूर्ण भविष्य तयार करावे लागेल. युरोपीय देशांनी अमेरिकेच्या या निर्णयावर टीका केली आहे.

जमिनीचा ताबा, हजारोंचा मृत्यू अन् युक्रेनची कोंडी; 3 वर्षांच्या यु्द्धाचा कटू हिशोब

अमेरिकेने अचानक का घेतला यू टर्न ?

अमेरिकेने युक्रेनला धक्का देणारा निर्णय घेण्यामागचे कारण म्हणजे रशियाशी थेट चर्चा करून त्या माध्यमातून युद्धावर तोडगा काढणे आहे असे जाणकारांना वाटते. याआधी डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्यात चर्चा झाली होती. यावर युक्रेनचे अध्यक्ष वोलिदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी मात्र नाराजी व्यक्त केली होती.

रशियाला चीनचीही मिळतेय मदत

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी सोमवारी फोनवरून चर्चा केली. युद्ध समाप्त करण्यासाठी रशियाने अमेरिकेशी चर्चा सुरू करण्याचा प्रयत्न केला ही चांगली बाब असल्याचे जिनपिंग म्हणाले. सीसीटीव्हीच्या वृत्तानुसार पुतिन यांनी अमेरिकेबरोबर नेमकी काय चर्चा झाली याची माहिती शी जिनपिंग यांना दिली. क्रेमलिनकडून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की चीनने अमेरिका आणि रशियात सुरू असलेल्या चर्चांना पाठिंबा दर्शवला. शांततापूर्ण मार्गांनी युद्धावर तोडगा काढण्यासाठी चीनही मदत करण्यास इच्छुक आहे असे या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या दुसऱ्या कार्यकाळाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी युक्रेनवर दबाव वाढवला आहे. त्यांनी झेलेन्स्की यांच्यावर टीका करत त्यांना हुकूमशहा म्हणून संबोधित केले. या युद्धासाठी युक्रेनच जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे होते. यानंतर युक्रेनची मोठी कोंडी होताना दिसत आहे.

Russia Ukraine War : बायडन ते डोनाल्ड ट्रम्प.. युक्रेनला मित्रांनीच दिला दगा

follow us