Announced the closure of the Strait of Hormuz : पश्चिम आशियातील संघर्ष आणखी तीव्र होताना दिसत आहे. लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या ताज्या हवाई आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये किमान 17 जणांचा मृत्यू झाला आहे. युद्धबंदीच्या घोषणा होत असतानाच प्रत्यक्षात मात्र हल्ले सुरूच असल्याने अमेरिका, इराण आणि इतर मध्यस्थ देशांच्या शांतता प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा इराणने केली आहे.
लेबनॉनमध्ये इस्रायलच्या नव्या हवाई आणि ड्रोन हल्ल्यांनी परिस्थिती पुन्हा एकदा चिघळली आहे. लेबनॉनच्या नाबतीह जिल्ह्यात शनिवारी झालेल्या हल्ल्यांमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले आहेत. टायर जिल्ह्यातील बारीश गावात एका कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये आई-वडिलांसह दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच हे हल्ले झाल्याने शांतता प्रक्रियेला मोठा धक्का बसला आहे. लेबनीज सैन्याने आरोप केला आहे की, इस्रायल जाणीवपूर्वक देशातील स्थैर्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. इस्रायलकडून मात्र या कारवाईचे समर्थन करण्यात आले आहे. हिजबुल्लाहने दक्षिण इस्रायलवर 50 हून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल हे हल्ले करण्यात आल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. याआधी शुक्रवारी झालेल्या चकमकीत लेबनॉनचे 47 आणि इस्रायलचे 4 सैनिक ठार झाले होते.
पेपरफुटीच्या धक्क्यानंतर एनटीए सतर्क; देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आज नीट पुनर्परीक्षा
दरम्यान, या संघर्षामुळे अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नांनाही मोठा धक्का बसला आहे. स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या उच्चस्तरीय चर्चेसाठी अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर दाखल झाले आहेत. मात्र लेबनॉनमधील वाढत्या तणावामुळे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचा दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इराणने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, लेबनॉनमधील युद्धबंदी हा चर्चेच्या यशाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. त्याचवेळी इस्रायली हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या इराणने होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जागतिक तेलपुरवठा आणि ऊर्जा बाजारावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या संकटातून मार्ग काढण्यासाठी रविवारी स्वित्झर्लंडमधील बर्गेनस्टॉक येथे तांत्रिक स्तरावरील चर्चा होणार असून त्यात कतारचे मध्यस्थही सहभागी होणार आहेत. तसेच 23 आणि 25 जून रोजी वॉशिंग्टन डीसीमध्ये इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात नव्या फेरीची चर्चा आयोजित करण्यात आली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी लेबनॉनचे अध्यक्ष जोसेफ औन यांच्याशी संवाद साधत हिंसाचाराचे हे चक्र थांबवण्यासाठी चर्चाच एकमेव मार्ग असल्याचे स्पष्ट केले आहे.
युद्धबंदीच्या घोषणा आणि शांतता चर्चांचे प्रयत्न सुरू असतानाच जमिनीवर मात्र संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. त्यामुळे पश्चिम आशियात दीर्घकालीन शांतता प्रस्थापित होणार की संघर्षाचे नवे पर्व सुरू होणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
