पेपरफुटीच्या धक्क्यानंतर एनटीए सतर्क; देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आज नीट पुनर्परीक्षा

नीट-यूजी पुनर्परीक्षा कोणत्याही गैरप्रकाराशिवाय पार पडावी यासाठी शनिवारी देशभरातील परीक्षा केंद्रांवर व्यापक मॉक ड्रील घेण्यात आली.

  • Written By: Published:
Untitled Design 27

NEET re-examination today amidst tight security arrangements : देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या नीट-यूजीच्या पुनर्परीक्षेसाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. पेपरफुटीच्या वादानंतर रद्द करण्यात आलेली ही परीक्षा रविवारी देशभरात पार पडणार असून, परीक्षा सुरक्षित, पारदर्शक आणि सुरळीत व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेसह केंद्र आणि राज्य यंत्रणा सज्ज झाली आहे. नीट-यूजी पुनर्परीक्षा कोणत्याही गैरप्रकाराशिवाय पार पडावी यासाठी शनिवारी देशभरातील परीक्षा केंद्रांवर व्यापक मॉक ड्रील घेण्यात आली. राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएच्या दिल्लीतील मुख्यालयातही सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.

पेपरफुटी, कॉपी, तांत्रिक अडचणी किंवा व्यवस्थापनातील त्रुटी टाळण्यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. यंदा तब्बल 22 लाख 79 हजारांहून अधिक विद्यार्थी या पुनर्परीक्षेला सामोरे जाणार आहेत. भारतातील 551 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 शहरांमध्ये दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजून 15 मिनिटांपर्यंत परीक्षा होणार आहे. दिव्यांग उमेदवारांना अतिरिक्त वेळ देण्यात आला असून त्यांना सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांपर्यंत परीक्षा देता येणार आहे.

उमेदवारांनी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजून 30 मिनिटांच्या दरम्यान परीक्षा केंद्रावर पोहोचणे बंधनकारक आहे. एकदा केंद्राचे प्रवेशद्वार बंद झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नसल्याचे एनटीएने स्पष्ट केले आहे. परीक्षेच्या सुरक्षेसाठी देशभरात दोन लाखांहून अधिक कर्मचारी, पोलिस आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी अनेक केंद्रांवर जॅमर बसविण्यात आले असून, प्रत्येक परीक्षा कक्ष सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली असणार आहे.

RTI कायद्यातील बदलांवर अण्णा हजारे आक्रमक; शुल्कवाढ आणि नव्या नियमांविरोधात फडणवीस सरकारला उपोषणाचा इशारा

यावर्षीची पुनर्परीक्षा इंग्रजीसह 12 भारतीय भाषांमध्ये घेतली जाणार असून, त्यासाठी 95 हजारांहून अधिक परीक्षा कक्ष तयार करण्यात आले आहेत. दरम्यान, पेपरफुटी प्रकरणावरून राजकीय वातावरणही तापले आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी मंत्री राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, नागपूरमधील एका विद्यार्थ्याला चुकून अबूधाबी येथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याची घटना चर्चेचा विषय ठरली होती. अनंतनगर येथील अब्दुल्लाह मोहम्मद तालिब या विद्यार्थ्याने नागपूर, वर्धा किंवा भंडारा परिसरातील केंद्राची निवड केली होती. मात्र, त्याच्या प्रवेशपत्रावर थेट अबूधाबी, संयुक्त अरब अमिराती येथील केंद्र नमूद करण्यात आले होते.

या प्रकरणाची दखल घेत एनटीएने तातडीने आपली चूक सुधारली असून संबंधित विद्यार्थ्याला नागपुरातील परीक्षा केंद्रासह सुधारित प्रवेशपत्र जारी केले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पेपरफुटीच्या वादानंतर देशभराचे लक्ष लागलेल्या नीट-यूजी पुनर्परीक्षेची विश्वासार्हता टिकवण्याचे मोठे आव्हान एनटीएसमोर आहे. त्यामुळे सुरक्षा, पारदर्शकता आणि काटेकोर नियोजनाच्या कसोटीवर ही परीक्षा कितपत खरी उतरते, याकडे विद्यार्थी, पालक आणि संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

follow us