Iran Protest against Khamenei Regime : इराणमध्ये सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या सरकारविरोधात जनतेचा तीव्र आक्रोश उफाळून आला असून देशभरात आंदोलन हिंसक वळणावर पोहोचले आहे. वाढती महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या आंदोलनावर सरकारने सुरक्षा दलांना कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सुरक्षा दलांच्या गोळीबारात आतापर्यंत 538 आंदोलकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता मानवाधिकार संघटनांनी व्यक्त केली आहे. अनेक शहरांमध्ये रस्त्यावर मृतदेह पडल्याचे चित्र असून रुग्णालयांमध्ये मृतदेह ठेवण्यासही जागा उरलेली नाही, अशी माहिती समोर येत आहे.
या कारवाईदरम्यान 10 हजारांहून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली असून त्यांना अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आंदोलन दडपण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या कारवाईमुळे सरकारविरोधातील रोष आणखी तीव्र झाला असून, हे आंदोलन आता सत्तापालटाच्या दिशेने जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, परिस्थितीची माहिती बाहेर पोहोचू नये यासाठी इराण सरकारने 8 जानेवारी 2026 पासून देशभरात इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत घडामोडींबाबत स्वतंत्र माहिती मिळणे कठीण झाले आहे. मात्र सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यामध्ये सुरक्षा दलांकडून आंदोलकांवर गोळीबार होत असल्याचे दृश्य दिसत आहे. हे व्हिडिओ पाहून आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान; मतदानासाठी सुट्टी न दिल्यास कारवाईचा इशारा
अमेरिका आणि इस्रायलवर आरोप
या पार्श्वभूमीवर इराणचे अध्यक्ष मसूद पेझाश्कियान यांनी देशातील हिंसक परिस्थितीसाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे. त्यांनी या दोन्ही देशांवर इराणमध्ये अराजकता पसरवल्याचा आरोप केला असून, अमेरिकेने दहशतवादी घटकांना फूस दिल्याचा दावा इराण सरकारकडून करण्यात आला आहे. इराणच्या संसदेनेही आक्रमक भूमिका घेत म्हटले आहे की, अमेरिकेने इराणविरोधात कोणतीही लष्करी कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिकन तळ आणि इस्रायलवर कठोर प्रत्युत्तर दिले जाईल.
अमेरिकेचा आंदोलकांना पाठिंबा
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील आंदोलकांना उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. इराणच्या जनतेला स्वातंत्र्य हवे असून त्यासाठी अमेरिकेची मदत करण्याची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगितले आहे. इराणमधील सध्याच्या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
