Angela Rayner Resignation : युरोपातील ब्रिटेन देशात एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. कर वाचवण्याचा प्रयत्न करणे देशाच्या उपपंतप्रधान आणि लेबर पार्टीच्या उपनेत्या एंजेला रेयनर यांना चांगलच महागात पडलं आहे. या एका गोष्टीमुळे त्यांना थेट उपपंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. रेयनर यांनी आज राजीनामा दिला. खरंतर हे प्रकरण त्यांनी खरेदी केलेल्या एका अपार्टमेंटशी संबंधित आहे. दरम्यान, पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी रेयनर यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांना स्वहस्ताक्षरातील पत्र पाठवले आहे. या घडामोडीची ब्रिटनच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे.
या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात (Angela Rayner) आली. यात रेयनर यांनी मंत्र्यांसाठीच्या आचारसंहितेचे पालन केले नसल्याचे दिसून आले. रेयनर यांनी प्रामाणिकपणा आणि समर्पणाच्या भावनेनं काम केलं मात्र त्यांनी तज्ज्ञांकडून टॅक्स संदर्भात मार्गदर्शन (Britain News) घ्यायला हवे होते असेही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
काय सांगता! फक्त तांदळावर काय बोलले मंत्र्याची खुर्चीच गेली; जपानमध्ये नेमकं काय घडलं?
रेयनर यांनी घेतली जबाबदारी
अपार्टमेंट खरेदी करताना टॅक्स कमी प्रमाणात दिला गेला ही बाब रेयनर यांनी मान्य केली. रिपोर्टनुसार रेयनर जवळपास 47 लाख रुपयांचा टॅक्स बचत करू शकल्या. मला या गोष्टीचा प्रचंड खेद आहे की मी कर सल्लागारांकडून योग्य मार्गदर्शन घेतलं नाही. चुकीच्या पद्धतीने टॅक्स भरण्याचा माझा कोणताच विचार नव्हता. मी या प्रकाराची पूर्ण जबाबदारी घेते. हा निर्णय फक्त अहवालांच्या आधारे नाही तर कुटुंबावर होणाऱ्या परिणामांचा विचार करून घेतल्याचे रेयनर यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात लिहिले आहे.
पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी रेयनर यांचा राजीनामा स्वीकारला आणि रेयनर यांना एक पत्र पाठवले. मला दुःख आहे की तुमचा कार्यकाळ अशा पद्धतीने समाप्त झाला. तुम्ही बरोबर होतात ज्यावेळी तुम्ही स्वतःला स्वतंत्र सल्लागाराच्या हाती सोपवलं. सल्लागाराच्या शिफारसी स्वीकारून त्यावर अंमल केला हे देखील योग्य केलं असे स्टार्मर यांनी या पत्रात म्हटले आहे.
नवा उपनेता शोधावा लागणार
रेयनर लेबर पार्टीच्या सरकारमध्ये उपपंतप्रधान होत्या. तसेच त्यांच्याकडे पक्षाचे उपनेतेपद देखील होते. हाउसिंग विभागाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे होती. पक्षातील सर्वाधिक आक्रमक नेत्यांत त्यांची गणना होत होती. विरोधी कंजर्वेटिव्ह पक्षातील नेत्यांवर टॅक्स अनुपालनाच्या मुद्द्यावर कठोर टीका करत होत्या. आता रेयनर यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे लेबर पार्टीला नवा उपनेता निवडावा लागणार आहे.