आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खळबळ! टॅरिफचा जाच संपला; ट्रम्पची माघार, जपानवर फक्त 15% कर

US Japan Trade Deal : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी गुरुवारी अमेरिका-जपान व्यापार करार लागू करणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. हा करार ‘अमेरिका-जपान व्यापार संबंधांमध्ये नव्या युगाची सुरुवात’ असल्याचे ट्रंप यांनी स्पष्ट केले.
15% बेसलाइन टॅरिफ लागू
या आदेशानुसार, आता जपानमधून अमेरिकेत येणाऱ्या जवळपास सर्वच (US Japan Trade Deal) आयातींवर 15 टक्के बेसलाइन टॅरिफ लावण्यात आले आहे. ऑटोमोबाईल व ऑटो पार्ट्स, एरोस्पेस उत्पादनं, जेनेरिक औषधे आणि देशांतर्गत उपलब्ध नसलेले नैसर्गिक संसाधन या क्षेत्रांना विशेष सवलत देण्यात आली आहे. याआधी ट्रंप प्रशासनाने (Donald Trump) जपान आणि दक्षिण कोरियावर 25 टक्के टॅरिफ (Tariff) लावण्याचा विचार केला होता. चर्चेच्या अनेक टप्प्यांनंतर अखेर 15 टक्के बेसलाइन टॅरिफवर शिक्कामोर्तब झाले.
550 अब्ज डॉलर गुंतवणुकीचे जपानचे आश्वासन
या करारातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे, जपानने अमेरिकेत तब्बल 550 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे वचन दिले आहे. व्हाईट हाऊसच्या माहितीनुसार, हा आकडा अमेरिकेच्या इतिहासातील इतर कोणत्याही करारापेक्षा वेगळा आणि मोठा आहे. या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मिती होईल, उत्पादन क्षेत्राचा विस्तार होईल तसेच अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
अमेरिकन उत्पादनांसाठी नवी संधी
या कराराअंतर्गत जपानने अमेरिकन व्यावसायिक विमानं, संरक्षण उपकरणं, तसेच कृषी उत्पादनं खरेदी करण्याची बांधिलकी दर्शवली आहे. विशेष म्हणजे, टोकियोने अमेरिकन तांदुळ आयातीमध्ये 75% वाढ करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे अमेरिकेचा कृषी निर्यात व्यवसाय दरवर्षी सुमारे 8 अब्ज डॉलर्सने वाढेल.
व्हाईट हाऊसची भूमिका
व्हाईट हाऊसच्या निवेदनानुसार, हा करार परस्पर सहकार्याच्या तत्त्वावर आधारित असून दोन्ही देशांच्या राष्ट्रीय हितासाठी उपयुक्त आहे. यामुळे अमेरिकन उत्पादनांना अधिक संधी मिळेल, व्यापार तूट कमी होईल आणि निर्यात व गुंतवणुकीवर आधारित उत्पादनात वाढ होईल. दरम्यान, जपानचे प्रमुख प्रतिनिधी अकाझावा रयोसेई हे वॉशिंग्टनमध्ये याच आठवड्यात झालेल्या चर्चेत सहभागी झाले होते, आणि त्याच वेळी ट्रंप यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली.