Download App

अमेरिकेने जपानची विकेट पाडली! दोन्ही देशांत मोठा व्यापार करार; जपान टॅरिफही देणार, भारताचं काय?

या करारानुसार जपान अमेरिकेत 550 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तसेच अमेरिकेत येणाऱ्या जपानी वस्तूंवर 15 टॅरिफही देणार आहे.

US Japan Big Deal : अमेरिका आणि जपान यांच्यात एक मोठी व्यापारी डील (US Japan Deal) पक्की झाली आहे. या कराराची घोषणा खुद्द राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलच्या माध्यमातून केली. या करारानुसार जपान अमेरिकेत 550 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तसेच अमेरिकेत येणाऱ्या जपानी वस्तूंवर 15 टॅरिफही देणार आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी जपानला इशारा दिला होता की जर 1 ऑगस्टच्या आधी करार झाला नाही तर जपानी वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ आकारण्यात येईल. यानंतर घाबरलेल्या जपान सरकारने दोन पावले मागे येणेच पसंत केले. दोन्ही देशांत मोठी ट्रेड डील झाली आहे.

अमेरिकेचा डबल फायदा

या करारानुसार जपान अमेरिकेत अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीचा 90 टक्के लाभ अमेरिकेला मिळणार आहे असे ट्रम्प यांनी सांगितले. या डीलमुळे अमेरिकेत लाखो रोजगार नव्याने उपलब्ध होणार आहेत. या करारामुळे अमेरिकेला विदेशी गुंतवणूकर तर मिळणार आहेच शिवाय जपानच्या वस्तूंवर टॅरिफ देखील मिळणार आहे. जपानच्या साडेपाचशे अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीने जागतिक अर्थकारणावर परिणाम होणार आहे.

Japan : 33 हजारांहून अधिक घरांची ‘बत्ती’ गुल; भारताकडून आपत्कालीन हेल्पलाईन नंबर्स जारी

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर जपाननेही प्रतिक्रिया दिली आहे. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी सांगितले की या कराराला पूर्णपणे समजून घेण्याची गरज आहे. अमेरिकेने या कराराला अंतिम रुप दिले आहे. जपानला मात्र फारसा विचार न करता या करारात सहभागी व्हावे लागले. अमेरिकेच्या कुटनितीपुढे जपानला शरणागती पत्करावी लागली. या कराराचा एक फायदा म्हणजे जपानला टॅरिफ कमी करून मिळाला आहे.

फिलीपीन्स, इंडोनेशियलाही दणका

जपानच्या आधी फिलीपीन्स आणि इंडोनेशिया या देशांशी याच पद्धतीचे करार झाले आहेत. या करारांतर्गत अमेरिकेने या दोन्ही देशांसाठी 19 टक्के टॅरिफ निश्चित केला आहे. पण अमेरिकेच्या वस्तूंना या देशांच्या बाजारात मात्र करात सवलत मिळणार आहे. या धोरणाच्या आधारे ट्रम्प सरकार विकसनशील देशांत एकतर्फी फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. या माध्यमातून देशांतर्गत अर्थव्यवस्थेला आधार देण्याचे काम ट्रम्प सरकारकडून केले जात आहे.

आता भारत काय करणार?

भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय व्यापार करारावरील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. भारत सरकार एक अंतरिम मुक्त व्यापार कराराला अंतिम रुप देण्याची तयारी करत आहे. लवकरच घोषणा होऊ शकते अशी स्थिती आहे. कारण अमेरिकेने भारताला सुद्धा 1 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. यानंतर भारतीय वस्तूंवरही टॅरिफ आकारला जाणार आहे. भारताला स्टील, अॅल्यूमिनियम आणि ऑटो पार्ट्सवर टॅरिफपासून बचाव करण्यासाठी वेळेआधीच डील करावी लागणार आहे.

अमेरिकेची भारतासह काही देशांना उघड धमकी; रशियाकडून तेल खरेदी करू नका, अन्यथा…

follow us