मी कुठेच नाही तर, मोदींकडे जाईल; भुजबळांच्या मनात काय?
नाशिक येथे आज मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध राजकीय, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर भाष्य केले.

Minister Chhagan Bhujbal Press Conference : नाशिक येथे आज मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध राजकीय, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर भाष्य केले. त्यांनी युतीच्या समीकरणांपासून ते मराठा आरक्षण, ओबीसी आंदोलन, ठाकरे बंधूंची भेट आणि स्थानिक राजकारणापर्यंत अनेक विषयांवर स्पष्ट भूमिका मांडली.
स्थानिक पातळीवरील युतीबाबत…
भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, मी वर्तमानपत्रातून वाचले की, तिन्ही पक्षांची (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) युती होईल. पण वास्तव वेगळं आहे. प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. काही ठिकाणी भाजप आणि अजित पवार गट एकत्र येतील, तर काही ठिकाणी शिंदे आणि अजित पवार गट युती करतील. काही भागात भाजप (BJP) बाजूला राहू शकतो. स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहूनच निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री प्रश्नावर …
पत्रकारांनी विचारले की, महाजन आणि भुसे हे डोनाल्ड ट्रम्पकडे (Dolald Trump) जाणार आहेत का? त्यावर भुजबळ हसत म्हणाले, मी काही एवढं लांब जाणार नाही. मी अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत जाईन. फार फार तर मोदींपर्यंत (PM Modi) जाईन, पण त्यापलीकडे नाही.
पडळकर यांच्या विधानावर भुजबळ म्हणाले, ‘असे काही वाक्य नाही. मी ते पुस्तक वाचणार आहे.’ ते पुढे म्हणाले, मी टप्प्यात आणून कार्यक्रम करतो. सुधाकर नाईक हे शिकारी होते तेव्हापासून हे वाक्य चालत आलंय. ‘टप्प्यात आणून कार्यक्रम करायचा’ हा त्यांचा छंद होता. सांगली हे लोकल वादळ आहे.
ओबीसी आंदोलन आणि जरांगे
भुजबळ म्हणाले, आंदोलन संपल्यावर जरांगे यांची विखे पाटील यांच्याशी भेट झाली, त्यावर आम्ही काहीच बोललो नाही. पण जरांगे माझं नाव घेतात, त्यामुळे उत्तर द्यावंच लागतं. आम्ही मराठा आरक्षण विरोधी नाही. उलट मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं, हीच आमची भूमिका आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. मात्र स्टेजवर कोण जाईल हे कोण ठरवणार?
जैन मुनी कबूतर प्रकरण
भुजबळ विनोदी शैलीत म्हणाले, आता सगळीकडे हत्ती, कुत्रे, कबूतर अशाच चर्चा आहेत. मला वाटतं सरकारने ‘चिमणी पार्क’ आणि ‘पोपट पार्क’ सुरू करावेत. एक ‘कावळा पार्क’ आहे. तो दहाव्याच्या दिवशी लागतो, त्याचंही पार्क करावं. ठाकरे कुटुंब एकत्र आलं ही चांगली गोष्ट आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला त्याचा आनंद आहे. माझ्या पत्नी या उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मैत्रिणी आहेत. ठाकरे घराण्यात ज्येष्ठ म्हणून कुंदा वहिनींचा आदर आहे, असे भुजबळ म्हणाले.